आगीमुळे स्फोट: बंगालच्या उपसागरात बोट उलटली
दि. ०७ एप्रिल: आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपासून ६५ किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरात आगीमुळे झालेल्या स्फोटाने बुडालेल्या मच्छीमार बोटीतून गंभीररीत्या भाजलेल्या नऊ भारतीय मच्छीमारांची भारतीय तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस वीरा’ या नौकेने सुटका केली. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
आंध्रप्रदेशचा नोंदणी क्रमांक असलेली दुर्गाभवानी हे मच्छीमार नौका २६ मार्च रोजी मच्छीमारी करण्यासाठी काकिनाडा येथून समुद्रात गेली होती. विशाखापट्टणम बंदरापासून सुमारे ६५ किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात या बोटीत आग लागली. या आगीमुळे बोटीतील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व बोट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या आगीमुळे बोटीतील काही कर्मचारी गंभीररीत्या भाजले. तुकडे झालेली ही बोट काही मिनिटांतच बुडाली. जीव वाचविण्यासाठी बोटीतील कर्मचाऱ्यांनी समुद्रात उडी घेतली. सुदैवाने जवळच असलेल्या दुसऱ्या एका बोटीने या सर्वाना वाचविले व या घटनेची माहिती तटरक्षक दलाला दिली. काही तासातंच तटरक्षक दलाचे वीरा हे जहाज घटनास्थळी पोहोचले आणि या नऊ कर्मचाऱ्यांची सुटका केली. गंभीर भाजलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार देऊन त्यांना पुढील उपचारासाठी तटरक्षक दलाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तटरक्षक दलाच्या जिल्हा क्रमांक सहाबरोबर समन्वयाने ही मोहीम पार पाडण्यात आली, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
सोने हस्तगत
दरम्यान, तटरक्षक दलाकडून करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत परदेशातून आणलेले सुमारे ५ किलो सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत ३. ४३ कोटी रुपये इतकी आहे. एका मच्छीमार बोटीतून श्रीलंकामार्गे परदेशी सोने भारतात चोरून आणले जात असल्याची महिती तामिळनाडूतील रामनाथपुरम येथील सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्यांनी तटरक्षक दलाच्या मदतीने खोल समुद्रात व किनारपट्टीनजीक टेहेळणी सुरु केली. या वेळी मंडपमजवळील वेधालाई किनाऱ्याजवळ त्यांना एक संशयीत बोट आढळली. या बोटीला अडवून तपासणी केली असता, हे परदेशी सोने सापडले. हे सोने जप्त करण्यात आले असून, बोटीवरील तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.
रविशंकर