‘तारिणी’चे मायदेशी आगमन

0
महासागरी मोहीम पूर्ण करून परतलेल्या आयएनएसवी तारिणी’वरील महिला नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा.ए यांचे गोव्यातील तळावर नौदलातील अधिकारी व या दोघींच्या कुटुंबीयांनी स्वागत केले. छायाचित्र: पीआयबी
महासागरी मोहीम पूर्ण करून परतलेल्या आयएनएसवी तारिणी’वरील महिला नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा.ए यांचे गोव्यातील तळावर नौदलातील अधिकारी व या दोघींच्या कुटुंबीयांनी स्वागत केले. छायाचित्र: पीआयबी

नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक महासागर मोहिम यशस्वी

दि. २३ एप्रिल: भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्याची दोन महिन्यांची ऐतिहासिक महासागरी नौकानयन मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज (आयएनएसवी) तारिणी रविवारी गोव्यातील आपल्या तळावर परतले. या मोहिमेचे नेतृत्व नौदलातील महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर डिलना.के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा.ए यांनी केले. अशी मोहीम पूर्ण  करणाऱ्या त्या भारतातील पहिल्याच नाविक असल्यामुळे त्यांच्या या अद्वितीय प्रवासाचे महत्व विशेष आहे.

नौदलाच्या या ऐतिहासिक महासागरी मोहिमेला २८ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. या मोहिमेला प्रसिद्ध नाविक आणि त्यांचे मार्गदर्शक कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांनी गोव्यातून हिरवा झेंडा दाखवला. हिंदी महासागरातील अत्यंत कठीण अशा २२ दिवसांच्या जलप्रवासानंतर ‘आयएनएसवी तारिणी’ २१ मार्च रोजी मॉरिशस मध्ये पोर्ट लुईस येथे पोहोचली. या ठिकाणी या मोहिमेतील अधिकाऱ्यांना मॉरिशस तटरक्षक दल आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही सागरी राष्ट्रांमधील सद्भावना वाढवणे,या उद्देशाने सौहार्द व सहकार्याचे प्रतीक म्हणून, ‘आयएनएसवी तारिणी’ने मॉरिशस तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसह एक प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केला होता. पोर्ट लुईस येथील कार्यक्रमानंतर लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा या दोघी गोव्याला परतीच्या प्रवासासाठी सज्ज झाल्या. त्या ३०मार्च रोजी परतीच्या प्रवासाला निघाल्या. दरम्यानच्या प्रवासात त्यांना सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, जिद्द आणि दृढसंकल्पाच्या बळावर त्यांनी या आव्हानांवर मात केली.

महिला अधिकाऱ्यांच्या या अभियानाच्या माध्यमातून लैंगिक समानता आणि नौवहन क्षेत्रात महिला सक्षमीकरणाला चालना देण्याची भारतीय नौदलाची वचनबद्धता अधोरेखित होते, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. या मोहिमेदरम्यान आलेल्या संकटांनी खचून न जाता, या महिला अधिकाऱ्यांनी साहसी आणि शोध घेण्याच्या जिज्ञासेला मूर्त स्वरूप देत, अपवादात्मक नौवहन कौशल्य  आणि लवचिकतेचे दर्शन घडवले.  या यशस्वी मोहिमेनंतर या दोन्ही अधिकारी या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘आयएनएसवी तारिणी’वरून  जगभराची परिक्रमा (सागर परिक्रमा -४ मोहीम) करणार आहेत. या दोघींनीही त्याची तयारी सुरु केली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी भावी पिढीला विशेषतः भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांना नौवहनातील आव्हानात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी


Spread the love
Previous articleभारतीयांसाठी युरोपियन युनियनने शेंगेन व्हिसाचे नियम बदलले
Next article‘एएफएमएस’ व ‘आयआयटी-दिल्ली’ यांच्यात सामंजस्य करार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here