संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांची उपस्थिती
दि. २२ एप्रिल: नौदलातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कॅडेट प्रशिक्षण जहाजाचा ‘स्टील कटिंग’ समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. कट्टुपल्ली येथील एल अँड टी शिपयार्डमध्ये आयोजित समारंभाला संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टिम’चे कार्यकारी उपाध्यक्ष अरुण रामचंदानी, तसेच भारतीय नौदल आणि ‘एल अँड टी’चे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी नौदल अधिकाऱ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना सागरी प्रशिक्षण देण्यासाठी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारच्या देशी बनावटीच्या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांचे आरेखन आणि उभारणीसाठी २०२३मध्ये संरक्षण मंत्रालय आणि एल अँड टी शिपयार्डदरम्यान करार करण्यात आला होता. त्या पैकी तिसऱ्या जहाजाच्या ‘स्टील कटिंग’ला शनिवारी प्रारंभ झाला. किनारपट्टीवर मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थी अधिकारी कॅडेट्सना समुद्रावरील प्रशिक्षण देण्यासाठी या कॅडेट प्रशिक्षण जहाजांचा वापर करण्यात येणार आहे. मित्र देशांच्या प्रशिक्षणार्थी कॅडेटना प्रशिक्षण देण्यासाठी देखील त्यांचा वापर होईल.
सप्टेंबर २०२६ मध्ये ही जहाजे भारतीय नौदलाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. स्वदेशी बनावटीच्या जहाजांच्या बांधणीमध्ये भारतीय नौदलासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मनाला जात आहे. सरकारचा आत्मनिर्भर भारत हा दृष्टीकोन आणि मेक इन इंडिया उपक्रम यांच्याशी हे सुसंगत आहे. भारतीय नौदलाच्या दीर्घकालीन एकात्मिक धोरणानुसार या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांची निर्मिती होत आहे. त्यामुळे नौदलाचे बळ वाढणार आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी