सीमेवर सर्व लष्करी कारवाया सुरु करण्याची दक्षिण कोरियाची घोषणा
दि. ०४ जून: उत्तर कोरियाकडून कचऱ्याने भरलेले फुगे दक्षिण कोरियात सोडले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणातणी पुन्हा वाढली असून, सीमेवरील सर्व लष्करी कारवाया पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिली आहे.
दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांत २०१८ मध्ये झालेल्या करारानुसार उत्तर व दक्षिण कोरिया आणि वायव्येकडील बेटांना वेगळे करणाऱ्या सीमेवर लष्करी कारवाया थांबवण्यास दोन्ही देशांनी मंजुरी दिली होती. दोन्ही देशांच्या लष्कारांदरम्यान झालेल्या या कराराला केराची टोपली दाखविण्याचा निर्णय दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांनी मंगळवारी घेतला. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाच्या लष्कराने तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि सीमारेषेवर दक्षिण कोरियाकडून सर्व लष्करी कारवाया पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, उत्तर कोरियाकडून सोडण्यात येत असलेल्या कचऱ्याच्या फुग्यांपासून दक्षिण कोरियातील नागरिकांचे रक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. या फुग्यांमधून उत्तर कोरियाकडून कचरा पाठविला जात आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे आणि मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे, असे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले.
उत्तर आणि दक्षिण कोरियात सीमेवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये सीमेवरील सर्व लष्करी कारवाया आणि चौक्या काढून टाकण्याबाबत करार झाला होता. बऱ्याच महिन्यांच्या वाटाघाटी आणि चर्चेनंतर या करारावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले होते. त्यानुसार सीमेवर होणारी लष्करी कवायतही थांबविण्यात आली होती. त्यामुळे उभय देशांत सीमेवर असणारा तणावही बराच कमी झाला होता. मात्र, उत्तर कोरियाकडून कचरा भरलेले फुगे दक्षिण कोरियावर सोडण्यात आल्यानंतर हा तणाव पुन्हा वाढला आहे. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये उत्तर कोरियाने दोन्ही देशांमधील करार संपुष्टात आणत असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर उत्तर कोरियाकडून पुन्हा सीमेवर चौक्या आणि रक्षक तैनात करण्यात आले होते. दक्षिण कोरियाकडूनही करार मोडीत काढल्यची घोषणा करण्यात आल्यानंतर मंगळवारी उत्तर कोरियाकडून सीमेवर कुंपण घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही देशांतील हा करार मोडीत निघाल्यामुळे कोरियन द्विपकल्पात पुन्हा संघर्ष भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
विनय चाटी
(रॉयटर्स ‘इनपुट्स’सह)