नौदलप्रमुखांच्या हस्ते नौसैनिकांचा सन्मान
दि. १५ एप्रिल: व्यावसायिक निष्ठा, उल्लेखनीय सेवा आणि उल्लेखनीय शौर्याबद्दल देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करण्याचा नौदलाचा अलंकरण सोहळा रविवारी नौदलाच्या गोवा येथील ‘आयएनएस हंसा’ या तळावर पार पडला. भारताच्या राष्ट्रपतींच्यावतीने नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांच्या हस्ते या वेळी अधिकारी व जवानांना गौरविण्यात आले.
नौदलाच्या अलंकरण समारंभात एकूण ३५ नौदल कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या मध्ये कमांडर मनीष सिंह कर्की, कमांडर कौस्तब बनर्जी, लेफ्टनंट कमांडर पन्नीरसेल्वम विष्णु प्रसन्ना व लेफ्टनंट कमांडर भास्कर यांचा नौसेनापदक (वीरता) देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी शस्त्रविकास आणि विद्युत अभियांत्रिकी विषयातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे लेफ्टनंट व्ही. के. जैन स्मृति सुवर्णपदक आणि उड्डाण सुरक्षेबाबतचे कॅप्टन रवी धीर स्मृति सुवर्णपदकही प्रदान करण्यात आले. तर, पर्यावरणपूरक कार्यशैलीबाबत औद्योगिक श्रेणीत मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड, गैर औद्योगिक श्रेणीत ‘आयएनएस वलसुरा’ यांना पुरस्कार देण्यात आले.
समारंभात गेल्यावर्षी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नौदलाच्या विविध शाखांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या मध्ये नौदलाच्या तेग, कोलकाता, कर्मुक, सुमेधा, सुमित्रा आणि शारदा या नौका, आयएनएस सिंधूकेसरी ही पाणबुडी, फ्लाइट स्क्वाड्रन आयएनएएस ५५० व आयएनएस चिल्का, सरकार, एक्सिला, द्रोणाचार्य हे नौदलतळ व नौदल जहाज दुरुस्ती यार्ड (कारवार) यांचा समावेश आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी