पाणबुडीविरोधी नौका: उथळ पाण्यातही काम करण्याची क्षमता
दि. १६ मार्च: कमी खोली असलेल्या समुद्रात आणि किनारपट्टीनजीक काम करण्यास सक्षम असलेल्या दोन पाणबुडीविरोधी युद्धनौका नौदलच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या. या नौकांच्या समावेशामुळे भारताची किनारपट्टी व सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या हस्ते या युद्धनौकांचा नौदलात समावेश करण्यात आला.
गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई) यांनी बांधलेल्या आयएनएस आग्रय व आयएनएस अक्षय या दोन कमी खोली असलेल्या पाण्यात काम करण्यास सक्षम असलेल्या पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएस.डब्ल्यूएस.डब्ल्यूसी) या आठ नौकांच्या मालिकेतील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या नौका आहेत. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेतील चौथी नौका नौदलाकडे सोपविण्यात आली होती. ठराविक कालावधीत काम पूर्ण करून या नौका नौदलाकडे सोपविल्यामुळे ‘जीआरएसई’ची देशाच्या सुरक्षेबाबत असलेली वचनबद्धता स्पष्ट झाली आहे.
कमी खोलीच्या समुद्रात पाणबुडीविरोधी कारवाई करणे व कमी क्षमतेची सागरी कारवाई करणे (लिमो) यासाठी अश्या प्रकारच्या नौकांचा उपयोग होतो. त्याचबरोबर समुद्रतळाशी पाणसुरुंग पेरण्यासाठी या नौका वापरल्या जातात. किनारपट्टीची टेहेळणी, विमानांच्या समन्वयाने पाणबुडीविरोधी कारवाई आणि त्यासंबंधित विविध बाबींसाठी या नौकांचा उपयोग होतो. या नौकेची लांबी ७७.६ मीटर तर रुंदी १०.५ मीटर इतकी आहे. ‘वॉटरजेट प्रोपलशन सिस्टीम’च्या या नौकांच्या इंजिनाला गती देण्यात येते, तर समुद्रात या नौकांचा कमाल वेग तशी २५ नॉटस इतका असणार आहे. त्यांच्यावर हलके पाणतीर, पाणबुडीविरोधी युद्धासाठी उपयुक्त रॉकेट व पाणसुरुंग, ३० मिलीमीटर व्यासाची तोफ व १२.७ मिलीमीटर व्यासाची रिमोटच्या सहायाने नियंत्रित केली जाणारी बंदूक आदी अस्त्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक सोनार यंत्रणाही या नौकांवर बसविण्यात आली आहे.
हवाईदल प्रमुखांनी या प्रसंगी ‘जीआरएसई’च्या क्षमतेची प्रशंसा केली. तर, ‘जीआरएसई’ला लष्करी जहाजबांधणीच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची कंपनी बनायचे आहे, असे ‘जीआरएसई’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमोडोर पी. आर. हरि यांनी स्पष्ट केले. या दोन नौकांच्या समावेशामुळे केवळ भारतीय नौदलाचीच क्षमता वाढणार नाही, तर संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची भारताची क्षमताही सिद्ध होणार आहे.
विनय चाटी