संशोधन व नवीनतम तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर सहकार्य करणार
दि. २० मार्च: भारतीय नौदल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था-खरगपूर (आयआयटी-खरगपूर) यांच्यात नुकताच परस्पर सहकार्याचा करार करण्यात आला. तंत्रज्ञान विकास व नवीनतम तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन व विकासकार्यात सहकार्य करणे अशा बाबींवर या करारात भर देण्यात आला आहे. नौदल मुख्यालयात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सैन्यदलांसाठी आवश्यक असलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाच्या विकासासाठी देशांतर्गत तंत्रज्ञान विषयक संस्था, खासगी उद्योगांबरोबर परस्पर सहकार्य करण्याचे धोरण सरकार व सैन्यदलांनी अवलंबले आहे. या माध्यमातून संरक्षणदलांसाठी आवश्यक ‘क्रिटिकल’ तंत्रज्ञानाचा देशांतर्गत विकास करता येणे शक्य आहे, संभावनांवरही सध्या लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यातूनच ‘आयआयटी’सारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाबरोबर सहकार्य करण्यात येत आहे, असे नौदलाच्यावतीने सांगण्यात आले. नुकताच ‘बोईंग’ या विमान उत्पादन क्षेत्रातील संस्थेने आयआयटी-मुंबईबरोबर परस्पर सहकाऱ्याचा करार केला होता.
नौदलाच्या सामग्री विभागाचे सहप्रमुख रिअर ॲडमिरल के. श्रीनिवास व आयआयटी-खरगपूरच्या संशोधन व विकास विभागाच्या अधिष्ठाता रिंतू बॅनर्जी यांनी या परस्परसहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी आयआयटी-खरगपूरचे संचालक प्रा. वीरेंद्रकुमार तिवारी उपस्थित होते. या करारानुसार उभय संस्थांमध्ये वेगवेगळ्या स्तरावरील संयुक्त संशोधन आणि विकास कार्याच्या बाबतीत व्यूहात्मक भागीदारी करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत. यासाठी लोणावळा येथील ‘आयएनएस शिवाजी’ ही नौदलाची प्रशिक्षण संस्था ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम करणार आहे. या सहकार्य करारामुळे शिक्षण संस्था व संरक्षणदलांतील यांच्यातील परस्पर सहकार्य वाढीस लागणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
विनय चाटी
स्रोत: भारतीय नौदल संकेतस्थळ