अमेरिकी दबावाचा परिणाम: महंमद मुस्तफा नवे पंतप्रधान
दि. १५ मार्च: गाझापट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेतृत्व बदल करावा, या अमेरिकेने केलेल्या सूचनेला अनुसरून पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी पॅलेस्टाईनचे (पॅलेस्टाईन ऑथॉरिटी) नवे पंतप्रधान म्हणून महंमद मुस्तफा यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती पॅलेस्टाईनमधी ‘वाफा’ (डब्ल्यूएएफए) या वृत्तसंस्थेने दिली आहे.
अमेरिकी सिनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य चक शूमर यांनी गुरुवारी सिनेटमध्ये बोलताना, गाझात दीर्घकालीन शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी पायउतार व्हावे आणि नव्या नेतृत्त्वाला काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले होते. त्यापूर्वी या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लींकेन यांनीही जानेवारी महिन्यात अब्बास यांची भेट घेतली होती, त्यामुळे नेतृत्त्व बदलाच्या अमेरिकी दबावाच्या पार्श्वभूमीवर अब्बास यांनी हा निर्णय घेतला असावा, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. नवनियुक्त पंतप्रधान मुस्तफा यांनी अमेरिकी विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली असून, त्यांच्या माध्यमातून सरकारवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न अब्बास यांच्याकडून करण्यात येतील, असेही अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मात्र, या नव्या नियुक्तीमुळे अमेरिकेकडून मदत मिळविण्याचे निकष पूर्ण होणे अवघड दिसत आहे. त्याचबरोबर पॅलेस्टाईनमधील जनता कसे स्वागत करेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
पॅलेस्टाईनमधील नेतृत्व बदलाबाबत ‘टाइम्स ऑफ इस्त्राईलने’ गेल्या डिसेंबरमध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्याला प्रतिसाद देणाऱ्या १२३१ पॅलेस्टिनी नागरिकांपैकी ९० टक्के नागरिकांनी अब्बास यांनी राजीनामा द्यावा, असे मत व्यक्त केले होते. तर, ‘हमास’ने सात ऑक्टोबर रोजी इस्राईलवर केलेला हल्ला योग्यच होता, असे मत ७२ टक्के नागरिकांनी व्यक्त केले होते. त्यामध्ये ‘वेस्ट बँक’मधील ८२ टक्के, तर गाझामधील ५७ टक्के नागरिकांचा सहभाग होता.
विनय चाटी