दि. ०१ मार्च: विद्यमान सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत भारत आणि ओमानदरम्यान सोमवारी चर्चा करण्यात आली. उभय देशांदरम्यानच्या सामरिक भागीदारी विषयक नवव्या सत्राच्या बैठकीत ही भागीदारी अधिक उच्च स्तरावर नेण्याबाबत एकमत झाले. भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विवेक मिसरी यांनी ओमान मधील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी झालेल्या या भेटीत पश्चिम आशियातील विद्यमान परिस्थिती, तसेच भारत-ओमान सामरिक भागीदारी अशा विविध विषयांवर चर्चा केली. गाझा येथे सुरू असलेला इस्त्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष व हाऊती बंडखोरांकडून लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जागतिक व्यापारासमोर उभे राहिलेले संकट आदी विषयही या बैठकीत चर्चेस घेण्यात आले.
भारत आणि ओमान यांचे द्विपक्षीय संबंध अतिशय उत्तम असून, भारतात आयोजित करण्यात आलेल्या जी-२० शिखर परिषदेत ओमानने सहभाग नोंदविला होता. ओमानचे सुलतान हैतम बिन-तारीक यांनी त्यानंतर भारताला भेट देऊन भारतीय नेतृत्त्वाशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत चर्चा केली होती. भारत-ओमान परस्पर संबंध व प्रामुख्याने आर्थिक भागीदारी अतिशय महत्त्वाची असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. सामरिक व लष्करी सुरक्षा त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता हे विषय नवव्या सत्राच्या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. भारताकडून ओमानच्या बंदरांच्या देखभालीचे काम करण्यात येते. त्या बदल्यात या भागातील सुरक्षेसाठी व गस्तीसाठी आपल्या बंदरांचा वापर करण्यास ओमानाने भारताला परवानगी दिली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी ओमान ला भेट दिली होती. यावेळी मस्कत येथे झालेल्या भारत-ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समितीच्या बैठकीत उभय देशांदरम्यान परस्पर सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. संरक्षण उद्योग क्षेत्रात भागीदारी वाढविणे व संरक्षण सामग्रीच्या खरेदीबाबतची भागीदारी अधिक दृढ करणे, हा या संयुक्त बैठकीचा मुख्य उद्देश होता.
ओमान हा आखाती देशातील भारताचा एक जुना व विश्वासू सहकारी आहे. ओमानशी असलेल्या मैत्रीमुळे भारताचा पूर्व व दक्षिण आफ्रिकेतील प्रवेश अतिशय सुकर झाला आहे. त्यामुळे ओमानशी संबंध भारतासाठी सामरिकदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच ओमानला संरक्षण साहित्याच्या निर्यात्तीच्या शक्यताही भारत पडताळून पाहत आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या पुढील फेरीच्या सामरिक संवाद चर्चेत भारताकडून हा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. लाल समुद्रात घडत असलेल्या घटना व आखाती प्रदेश भारताला सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारत-ओमान संबंधालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
विनय चाटी