दि. ०१ मे: भारत आणि नेदरलँड्सच्या नौदलाने मुंबईलगतच्या सागरी किनारपट्टीवर संयुक्त नौदल सराव केल्याची माहिती नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालाच्यावतीने देण्यात आली आहे. भारतीय नौदलाची ‘आयएनएस त्रिशूल’ हे गायडेड क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका व नेदरलँड्सच्या नौदलाचे ‘एचएनएलएमएस ट्रॉम्प’ ही युद्धनौका सरावात सहभगी झाले होते.
उभय देशांतील सागरी कवायतीदरम्यान सामरिक व व्यूहात्मक हालचाल, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि सागरी रसद पुरवठ्याबाबत सराव करण्यात आला. या सरावाचा दोन्ही नौदलांमधील कौशल्य आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून उपयोग होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की ‘रॉयल नेदरलँड्स नेव्हीचे’ उपप्रमुख रिअर ॲडमिरल हॅरोल्ड लिब्रेग्स भारताच्या दौऱ्यावर असतानाच ‘डी झेव्हन प्रोव्हिन्सियन क्लास फ्रिगेट’ ‘एचएनएलएमएस ट्रॉम्प’चे या कवायतीसाठी मुंबईत आगमन झाले होते.
रिअर ॲडमिरल लिब्रेग्स यांनी त्यांच्या दौऱ्यात नौदलच्या पश्चिम विभाग मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल एस. जे. सिंग यांची भेट घेतली आणि उभय देशांतील परस्पर नौदल सहकार्य व संयुक्त उपक्रमाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. या दौऱ्यावर आलेल्या नेदरलँड्सच्या शिष्टमंडळाला पश्चिम विभागाच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. तसेच, त्यांनी भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र विध्वंसक नौकेलाही भेट दिली. या भेटीत व्यावसायिक आणि सामाजिक संवाद आणि दोन्ही नौदलाच्या कर्मचाऱ्यांमधील अनुभवांची देवाणघेवाणही करण्यात आली.
विनय चाटी