पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन
पुणे, दि. १८ : संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुणे येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने लष्कर, हवाईदल व नौदल या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. यात दोनशेहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि २० हजारहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण-घेवाण करतील. महाराष्ट्रात ३९.८८ लाख एमएसएमईचे जाळे आहे. ज्यात उद्यम पोर्टलवर १०८.६७ लाख रोजगार आहेत. एमएसएमई डिफेन्स एक्स्पो अशा उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.
एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४ ची ठळक वैशिष्ट्ये:
-या एक्स्पोमध्ये २०० हून अधिक एमएसएमई प्रदर्शक त्यांची संरक्षण संबंधित उत्पादने, एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स याचे प्रदर्शन करतील.
– एमएसएमई आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील.
– नॉलेज सेमिनार : प्रख्यात तज्ञ आणि विचारवंत, संरक्षण क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड, संधी आणि आव्हाने यावर दृष्टीक्षेप टाकतील
– कौशल्य विकास कार्यशाळा : संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएसएमई कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्परसंवादी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
– सरकारी सहाय्य उपक्रम : संरक्षण उत्पादनात एमएसएमईंना समर्थन देण्यासाठी विविध सरकारी योजना, धोरणे आणि आर्थिक सहाय्य पर्याय प्रदर्शित करण्यात येतील.
– धोरणात्मक भागीदारी : संरक्षण क्षेत्रात एमएसएमईना व्यवसाय वाढविण्यासाठी संभाव्य खरेदीदार, सहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधता येईल.
– तज्ञांचे सेमिनार आणि कार्यशाळांद्वारे संरक्षण उद्योगातील नवीनतम घडामोडी आणि ट्रेंड्सवर अपडेट मिळू शकतील.
– आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील.
या डिफेन्स एक्स्पो २०२४ मध्ये एमएसएमईं, संरक्षण अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील २ हजारहून अधिक संस्था सहभागी होणार आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात संरक्षण एमएसएमई तयार झाल्या आहेत. खासगी उद्योगांसह महाराष्ट्रात १० ऑर्डंनंस फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पीएसयु आहेत. याची राज्यात इकोसिस्टिम तयार झाली आहे. टाटा, भारत फोर्ज, सोलार, एल ॲण्ड टी, अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात उपादने तयार करतात. या एक्स्पोमुळे विविध उत्पादक व संरक्षण दले यांच्यात परस्पर संवाद वाढीस लागेल.
विनय चाटी