‘युद्धाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेणे गरजेचे’

0
संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांचे संग्रहित छायाचित्र

संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांचे मत

दि. ०७ एप्रिल: लष्करी नेतृत्वाला भविष्यातील युद्धाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी तिन्ही सैन्यदलातील समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे, असे मत संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. वेलिग्टन येथील ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मध्ये ७९ व्या अभ्यासक्रमातील अधिकाऱ्यांसमोर ते बोलत होते. या वेळी देशासमोरील सुरक्षा विषयक आव्हानांचाही त्यांनी आढावा घेतला.

भारताच्या तिन्ही सैन्यदलातील भविष्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तामिळनाडूतील वेलिंग्टन येथे असलेल्या ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मध्ये प्रशिक्षण दिले जाते. तिन्ही सैन्यदलातील भविष्यातील ‘स्टाफ ऑफिसर्स’ना प्रशिक्षण देण्यासाठी १९४७मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाली होती. या महाविद्यालयात सैन्यदलातील अधिकाऱ्यांबरोबरच निमलष्करी दले व प्रशासनातील निवडक अधिकारी, तसेच मित्रदेशांतील लष्करी अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षित केले जाते. या अधिकाऱ्यांसमोर बोलताना संरक्षणदल प्रमुखांनी भारत्समोर असलेल्या विविध सुरक्षा विषयक आव्हानांची चर्चा केली, तसेच या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय संरक्षण दलांमध्ये करण्यात येत असलेल्या फेरबदलांची माहितीही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

‘बदलत्या जागतिक भूराजकीय परिस्थितीचा परिणाम भारतावरही होत आहे. त्यामुळे भारतासमोरील सुरक्षा विषयक आव्हानेही वाढत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्यादालांचा मोठ्याप्रमाणात कायापालट होत आहे. एकीकडे सैन्यदलात बदल होत असताना. सैन्यदलातील अधिकाऱ्यांनीही आपली मानसिकता बदलावी व भविष्यातील युद्धाच्या स्वरुपाशी जुळवून घेण्यास सिद्ध व्हावे,’असे जनरल चौहान म्हणाले. या वेळी ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’चे कमांडंट लेफ्टनंट जनरल वत्स यांनी ७९ व्या अभ्यासक्रमाबद्दल जनरल चौहान यांना माहिती दिली. सैन्यदलातील समन्वय व एकजिनसीपणे  काम करण्यासाठी या अभ्यासक्रमात केलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी माहिती दिली.

‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मध्ये सुरु असलेला ७९ अभ्यासक्रम ४५ आठवड्यांचा असून, यात ४७६ अधिकारी सहभागी झाले आहेत. या मध्ये २६ मित्रदेशांतील ३६ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या वेळी प्रथमच आठ महिला अधिकारीही या अभ्यासक्रमात सहभागी झाल्या आहेत.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी  


Spread the love
Previous article‘आयएनएस शारदा’ला ‘ऑन द स्पॉट युनिट सायटेशन’
Next articleझापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर पुन्हा ड्रोन हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here