लष्करप्रमुख उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर रवाना

0
Army Chief, Gen Manoj Pande, Uzbekistan
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे.

उभय देशातील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करणार

दि. १५ एप्रिल: लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आज, सोमवारी, उझबेकिस्तानच्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात ते उझबेकिस्तानचे संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख व हवाईदल प्रमुखांशी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तानच्या लष्करामध्ये आजपासून ‘दस्तलिक-२०२४’ या द्विपक्षीय लष्करी सरावाला प्रारंभ होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

भारत आणि उझबेकिस्तानच्या लष्करांमध्ये २०१९ पासून ‘दस्तलिक’ या नावाने लष्करी सरावाचे आयोजन करण्यात येते. यंदा या सरावाचे हे पाचवे वर्ष आहे. उभय देशांदरम्यानच्या या सरावाची चौथी आवृत्ती उत्तराखंड येथील पिठोरागड येथे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. भारताकडून या सरावात गढवाल रायफल्स रेजिमेंटचे ४५ जवान व अधिकारी  सहभागी होणार आहेत.

आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जनरल पांडे उझबेकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्त्वाशी चर्चा करणार आहेत. त्यात उझबेकिस्तानचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल बाखोदीर कुर्बानोव, संरक्षण राज्यमंत्री व लष्करप्रमुख मेजर जनरल खालमुकामेदोव सुखरात गाय्रात्जानोवीच, दुसरे राज्यमंत्री व हवाईदल प्रमुख मेजर जनरल बुर्खानोव अहमेद जमालोवीच यांचा समावेश आहे. या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी होणारी चर्चा द्विपक्षीय दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर जनरल पांडे उझबेकिस्तानच्या लष्करी संग्रहालयालाही भेट देणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला भेट देऊन तेथे श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर व्हिक्टरी पार्क, सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीला भेट देणार आहेत.

तिसऱ्या दिवशी जनरल पांडे समरकंदला जाणार असून, तेथेही लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर १८ एप्रिलला लष्करप्रमुख जनरल पांडे तेर्मेझला भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तानच्या लष्करांत येथे ‘दस्तलिक-२०२४’ हा लष्करी सराव सुरु आहे. तेथील जवान व अधिकाऱ्यांना ते संबोधित करणार आहेत.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी


Spread the love
Previous articleArmy Chief Gen Manoj Pande Embarks On A Visit To Uzbekistan
Next articleनौदलाचा अलंकरण समारंभ ‘आयएनएस हंसा’वर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here