युद्धामुळे निर्णय: लढाऊ दलातील भरतीसाठी वयोमर्यादा २७ ऐवजी २५
दि. ०३ एप्रिल: आघाडीवर लढण्यासाठी सैनिकांची कमतरता भासत असल्यामुळे लढाऊ विभागातील सैन्य भरतीची वयोमर्यादा २७ वरून २५ वर्षे करण्याचा निर्णय युक्रेनच्या सरकारने घेतला आहे. गेल्या दोन वर्षापासून युक्रेन रशियाच्या आक्रमणाच्या विरोधात लढत आहे. या युद्ध आघाडीवर लढाऊ सैनिकांची गरज भासत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दर्शविला आहे.
युक्रेनच्या लष्करात लढाऊ सैनिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सैनिकांच्या संख्येतील ही घट तातडीने भरून काढण्याची गरज आहे. त्यासाठी अतिरिक्त पाच लाख सैनिकांची लष्करात भरती कलावी लागेल, असा अहवाल युक्रेनच्या लष्कराने अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडे दिला होता. झेलेन्स्की यांच्याकडे २०२३ पासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. आघाडीवर लढण्यासाठी सैनिकांची कमतरता असल्याचे सिद्ध करून दर्शविल्यास आपण या प्रस्तावावर सकारात्मक मत देण्यास तयार आहोत असे, झेलेन्स्की यांनी म्हटले होते. अखेर, लष्करांकडून विषद करण्यात आलेल्या परिस्थितीतील सत्य जाणून घेतल्यानंतर झेलेन्स्की यांनी भरतीचे वय २७ वरून २५वर्षे करण्यास मान्यता दिली. दरम्यान, लष्करभरतीबाबतचे नियम अधिक सुसूत्र करण्याचे कामही युक्रेनच्या संसदेकडून करण्यात येत आहे.
रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला दिवसेंदिवस अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आघाडीवर लढणाऱ्या सैनिकांची कमतरता, शस्त्रांचा व दारुगोळ्याचा तुटवडा या आघाडीवरही युक्रेनला झुंज द्यावी लागत आहे. त्याचबरोबर अमेरिका, युरोप व इतर ‘नाटो’ सदस्यांकडून अपेक्षेप्रमाणे मदतही मिळत नाही. अमेरिकेने जाहीर केलेल्या ६० अब्ज डॉलरच्या मदतीच्या पॅकेज पैकी केवळ सहा अब्ज डॉलर्स आतापर्यंत युक्रेनला मदत म्हणून देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणामुळे व डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षाच्या परस्परांवर सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे अमेरिकी काँग्रेसने ही मदत रोखून धरली आहे. त्यामुळे युक्रेनसमोरील पेचप्रसंगात वाढ झाली आहे.
दरम्यान, युक्रेन आणि रशियाच्या तेराशे किलोमीटरच्या सीमेवरील रशियाच्या बाजूच्या तार्तारस्तान या भागात युक्रेनकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १२ जण जखमी झाल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियात एक हजार किलोमीटर खोलपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे ड्रोन विकसित केल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्याने केले होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला. रशियाच्या विविध भागातील रसद पुरवठा केंद्रांवर यापूर्वीही युक्रेनकडून हल्ले करण्यात आले आहेत. रायटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रानुसार तार्तारस्तानमधील तानेको तेल शुद्धीकरण प्रकल्पाला ड्रोनने लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विनय चाटी