अधिसूचना जारी: आत्मनिर्भरता व व्यवसाय सुलभिकरणावर भर
दि. २९ मार्च: संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व व्यवसाय सुलभीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण महासंचालनालयाची (डीजीक्यूए) फेररचना करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्याबाबतची अधिसूचना ही जारी करण्यात आली आहे. या फेररचनेमुळे लष्कराच्या गुणवत्ता नियंत्रण व चाचणी प्रक्रियेतील अनावश्यक विलंब टाळता येणार आहे. त्याचबरोबर निर्णय प्रक्रियाही अधिक सुलभ होणार आहे. ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड’चे (ओएफबी) कार्पोरेटीकरण झाल्यामुळे ‘डीजीक्यूए’ व गुणवत्ता नियंत्रण पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक झाले होते.
‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड’चे कार्पोरेटीकरण होऊन त्यांना आता संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात खासगी उद्योगांचाही सहभाग वाढला आहे. सरकारच्या देशांतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्राला चालना देण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. त्यामुळे हे फेरबदल महत्त्वाचे ठरतात. या फेरबदलामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये अधिक परिणामकारक बदल होऊन ते कार्यक्षम होण्यास मदत होईल. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा केल्यानंतरच ‘डीजीक्यूए’मध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
‘डीजीक्यूए’तील नव्या बदलांमुळे कोणत्याही उपकरणाची अथवा शस्त्रास्त्रप्रणालीची चाचणी घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक मदत देणारी एक ‘सिंगल पॉईंट’ यंत्रणा उभी करण्यात येईल. तसेच एकाच पद्धतीच्या उत्पादनाच्या गुणवत्ता चाचणीमध्ये समानता आणण्यात येईल. या नव्या रचनेत संरक्षण उत्पादनाच्या चाचणीसाठी व त्यांना यासाठी सुविधा पुरविण्यासाठी, तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘संरक्षण चाचणी व मूल्यमापन महासंचालनालय’ या नावाने स्वतंत्र संस्था उभारण्यात येणार आहे.
नव्या रचनेत गुणवत्ता नियंत्रणाच्या संपूर्ण प्रक्रियेचे ‘ऑटोमेशन व डिजिटायझेशन’ करण्यात येणार असल्यामुळे संरक्षण उत्पादन उद्योग व ‘डीजीक्यूए’ यांच्यातील संबंध अधिक सुधारतील व त्याचा लाभ या क्षेत्रातील देशांतर्गत निर्मितीला बळ मिळवून देण्यासाठी, संरक्षण दलांना अधिक गुणवत्तापूर्ण शस्त्रे मिळण्यासाठी होईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी