सरकारकडून घोषणा: एप्रिलअखेर कार्यभार स्वीकारणार
दि. १९. एप्रिल: नौदलाचे विद्यमान उपप्रमुख व्हाइस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची सरकारने नवे नौदलप्रमुख म्हणून शुक्रवारी घोषणा केली. विद्यमान नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असून, त्याच दिवशी दुपारपासून व्हाइस ॲडमिरल त्रिपाठी नौदलप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
व्हाइस ॲडमिरल त्रिपाठी यांना नौदलाच्या कार्यकारी विभागात (एक्झिक्यूटिव्ह ब्रांच) मध्ये एक जुलै १९८५ मध्ये कमिशन मिळाले. ते ‘कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक’ युद्धात विशेषज्ञ मानले जातात. आपल्या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ वर्षाच्या नौदल सेवेत व्हाइस ॲडमिरल त्रिपाठी यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. नौदलच्या उपप्रमुखपदी नियुक्त होण्यापूर्वी ते नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून काम करीत होते. त्यांनी नौदलाच्या ‘आयएनएस विनाश,’ ‘आयएनएस किरच व ‘आयएनएस त्रिशूल’ या युद्धनौकांचे कमांडंट म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर नौदलाच्या पश्चिमी ताफ्याचे प्रमुख (फ्लीट ऑपरेशन ऑफिसर-वेस्टर्न फ्लीट), नौदल कारवाईचे संचालक, नौदलाच्या ‘नेटवर्क सेंट्रिक ऑपरेशन्स’ विभागाचे प्रधान संचालक, नौदलाच्या योजना विभागाचे प्रधान संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
रिअर ॲडमिरल पदावर असताना त्रिपाठी यांनी सहायक नौदलप्रमुख (धोरण आणि योजना), पश्चिम ताफ्याचे प्रमुख म्हणून काम पहिले. व्हाइस ॲडमिरल पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी एझिमला येथील नौदल अकादमीचे प्रमुख, नौदल कारवाईचे महासंचालक, पश्चिम विभागाचे प्रमुख या पदांवर काम केले. व्हाइस ॲडमिरल त्रिपाठी यांचे शालेय शिक्षण रेवा येथील सैनिकी शाळेत झाले असून, ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, ‘हायर कमांड कॉलेज,करंजा,’ नेव्हल कमांड कॉलेज व नेव्हल वॉर कॉलेज, अमेरिका येथूनही प्रशिक्षण घेतले आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी