कानपूर ‘आयआयटी’सह अदानी प्रकल्पाचीही पाहणी
दि. २५ एप्रिल: लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कानपूर येथील विविध संरक्षण उत्पादन व शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्पांना भेट देऊन तेथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. या भेटीत त्यांनी संरक्षण उद्योगांबरोबरच शिक्षण संस्थांनाही भेट दिली, अशी माहिती लष्करी माहिती अतिरिक्त महासंचालकांच्या (एडीजी-पीआय) ‘एक्स’ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
भारतीय लष्कराने २०२४ हे वर्ष तंत्रज्ञान समावेशी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर लष्कराच्या विद्यमान व्यवस्थेत बदल करून ते तंत्रज्ञानस्नेही, चपळ व तत्पर आणि भविष्यदर्शी आधुनिक लष्कर म्हणून पुढे यावे यासाठीही लष्कराकडून अनेक उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लेफ्टनंट जनरल द्विवेदी सध्या देशातील विविध संरक्षण उत्पादन प्रकल्पांना आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थांना भेट देत आहेत. कानपूरयेथील भेटीतही जनरल द्विवेदी यांनी ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ (आयआरआरपीएल) या रायफल उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. तसेच, कोरवा येथील दारुगोळा उत्पादन प्रकल्पालाही तयंनी भेट दिली. या दोन्ही प्रकल्पांत अत्याधुनिक युद्धसाहित्याचे उत्पादन करण्यात येते.
लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी या वेळी दक्षिण आशियातील सर्वांत मोठा दारुगोळा आणि क्षेपणास्त्र उत्पादन प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदानी ॲम्युनिशन कॉम्प्लेक्सला भेट दिली. त्यानंतर जनरल द्विवेदी कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला (आयआयटी-कानपूर) भेट देण्यासाठी रवाना झाले. तेथे त्यांनी ‘आयआयटी-कानपूर’चे संचालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी या संस्थांकडून देण्यात येत असलेल्या योगदानाची जनरल द्विवेदी यांनी प्रशंसा केली. तसेच, ‘आत्मनिर्भर भारत’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
विनय चाटी