भारताकडून स्पष्टोक्ती
दि. ०३ मार्च : ‘शेजारी देशाकडून भारतासह दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य परिषदेतील (सार्क) इतर देशांमध्ये दहशतवाद पसरवण्याचे कृत्य करण्यात येत आहे. विविध ‘टूलकिट्स’च्या माध्यमातून दहशतवाद पोसला जात आहे, त्यामुळे नजीकच्या काळात ‘सार्क’ चे पुनर्जीवन पुनरुज्जीवन शक्य वाटत नाही, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी दिली. ‘सार्क’मधील एक सदस्य देश सातत्याने विविध माध्यमातून दहशतवाद पसरविण्याचे व पोसण्याचे काम करीत आहे, त्यामुळे मला ‘सार्क’चे भवितव्य संकटात वाटते, असेही ते म्हणाले. एका थिंक टॅंक ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते
‘प्रश्न ‘सार्क[च्या भवितव्याबद्दल नाही, तर एका विशिष्ट देशाच्या भवितव्याबद्दल आहे. कारण हा देश दहशतवाद हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग मानतो. त्यांनी हे उद्योग बंद केले नाहीत तर, ‘सार्क’चे सोडा; त्या देशाचे भवितव्य काय असेल, याचा विचार करा,’ असेही जयशंकर म्हणाले. शेजारी देश भारताकडे दादागिरी करणारा ‘बिग ब्रदर’ दृष्टिकोन असणारा एक देश म्हणून पाहतात, यावर तुमची भूमिका काय, असे विचारले असता जयशंकर म्हणाले, ‘दादागिरी करणारा देश कधीही आपल्या शेजारी देशांना साडेचार अब्ज डॉलरची मदत करत नाही किंवा ‘कोरोना’च्या काळात मोफत लसही पुरवत नाही.’ ‘वेळप्रसंगी आम्ही आमच्या देशांतर्गत मागणीकडे काणाडोळा करून शेजारी देशांना अन्नधान्य, औषधे, इंधन, खते आदी आवश्यक बाबींचा पुरवठा केला आहे. त्यांच्या भूमीपासून लांब कुठेतरी सुरू असलेल्या युद्धामुळे हे देश अडचणीत सापडले होते. त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भारतानेच पुढाकार घेतला होता.’ असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले
‘एका क्षेत्रीय संघटनेतील एक सदस्य देश सातत्याने दहशतवादाची पाठराखण करत आहे आणि या संघटनेचे सदस्य असणाऱ्या इतर देशांमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे असताना “सार्क’ किंवा इतर कोणतीही क्षेत्रीय संघटना कशी काय कार्यरत राहू शकते,’ असा सवालही जयशंकर यांनी याप्रसंगी केला. भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान हे दक्षिण आशियाई देश ‘सार्क’चे सदस्य आहेत. ‘दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या ‘त्या’ देशाच्या भूमिकेत एक सातत्य आहे आणि ‘तो’ देश हे का करीत आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आमच्यातीलच एक सदस्य देश दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची केंद्रे चालवीत असेल, ते प्रशिक्षित दहशतवादी तुमच्या देशात पाठविण्याचे प्रयत्न करीत असेल, वेगवेगळ्या मार्गाने या दहशतवाद्यांना मदत करीत असेल,’ तर अशी क्षेत्रीय संघटना चालविण्यात कर अर्थ आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘सार्क’ची शेवटची द्वैवार्षिक परिषद २०१४ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाली होती. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे ती २०१६ मध्ये होणार होती. मात्र, त्याच दरम्यान १८ सप्टेंबर रोजी उरी येथील भारतीय लष्करच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही परिषद झालेली नाही.
विनय चाटी