दि. ०४ मार्च : अत्याधुनिक ‘सी-हॉक’ एमएच ६० आर हे हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार असून, या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे नौदलाच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे केंद्र असलेल्या कोची येथील ‘आयएनएस गरुड’ या नौदल तळावर सहा मार्च रोजी ही हेलिकॉप्टर नौदलात समाविष्ट करण्यात येणार आहेत. अमेरिकेकडून घेण्यात आलेल्या ‘ब्लॅक-हॉक’ या हेलिकॉप्टरचे हे ‘मेरिटाइम व्हर्जन’ आहे. नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील हा एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल एक मोठे नौदल मानण्यात येते. या भागात घडणाऱ्या अनेक घटनांना भारताचे नौदल त्वरित प्रतिसाद देते. आता ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातही भारताच्या नौदलाच वावर वाढला आहे. या भागातील चीनच्या हस्तक्षेपालाही आळा घालण्याची जबाबदारी एक सक्षम नौदल म्हणून भारतीय नौदलाची आहे. या सर्व बाबींचा विचार करता ‘सी-हॉक’चा समावेश नौदलच्या क्षमतेत मोठी वाढ करणारा मानला जात आहे. ‘सी-हॉक’ नौदलात ‘इंडियन नेव्हल एअर स्क्वाड्रन-३३४’ (आयएनएएस-३३४) म्हणून समाविष्ट होईल.
‘सी-हॉक’ हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी युद्ध (एएसडब्लू), जमिनीवरील युद्ध (अँटी सरफेस वॉरफेअर-एएसयुडब्लू), शोध आणि बचाव, वैद्यकीय मदत पोहचवणे आणि ‘व्हर्टिकल रिप्लेनिशमेंट’ अशा विविध भूमिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. या हेलिकॉप्टरमधील अत्याधुनिक शश्त्रास्त्रप्रणाली, संवेदक व इतर उपयुक्त तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे भारतीय नौदलासाठी ‘सी-हॉक’ एक परिपूर्ण हेलिकॉप्टर ठरणार आहे. या हेलिकॉप्टरच्या भारतीय वातावरणातील चाचण्या पूर्ण झाल्या असून, सर्व निष्कर्ष समाधानकारक आहेत. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे खोल समुद्रात कारवाई करण्याची नौदलाची क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेची गरजही पूर्ण होणार आहे. तसेच, पारंपरिक व अपारंपरिक युद्धातही याची मोठी मदत होणार आहे. भारताच्या सागरी सुरक्षेबरोबरच क्षेत्रीय सुरक्षा व समृद्धीसाठी भारत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांनाही या मुळे मोठी मदत होणार आहे.
विनय चाटी