‘कटलास एक्सप्रेस-२४’: ‘आयएनएस तीर’ने केले नेतृत्त्व
दि. ११ मार्च: ‘कटलास एक्सप्रेस-२४’ या सेशेल्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या बहुपक्षीय नौदल कवायतीत भारतीय नौदलाने सहभाग नोंदविला असून, भारताच्या ‘आयएनएस तीर’ने या कवायतीचे नेतृत्त्व केले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. ‘आयएनएस तीर’ हे भारताच्या पहिल्या ट्रेनिंग स्क्वाड्रनमधील (१टीएस) लढाऊ जहाज आहे.
सेशेल्समधील पोर्ट विक्टोरिया येथे सेशेल्सच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत या कवायतींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारत, अमेरिका व आफ्रिकी देशांतील मान्यवर उपस्थित होते. भारताचा पुढाकार असलेल्या या नौदल कवायतीत १६ मित्रदेशांचा सहभाग आहे. या कवायतीत सागरी प्रतिबंध, प्रत्यक्ष जहाजावर जाऊन शोध घेणे व जहाज ताब्यात घेणे, खोल समुद्रातील ‘डायव्हिंग’ याबाबतचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण यांचा समावेश आहे. तर, कवायतीच्या सागरी टप्प्यादरम्यान सेशेल्स तटरक्षक दलाच्या ‘एलई व्हिजिलन्ट’ या नौकेवर प्रत्यक्ष जहाजावर जाऊन शोध घेणे व जहाज ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
‘कटलास एक्सप्रेस-२४’ कवायती दरम्यान भारत, सेशेल्स व अमेरिकी नौदलाच्या ‘डायव्हर्सनी’ खोल समुद्रात बुडी घेण्याचे प्रात्यक्षिक केले. त्यासाठी त्यांना एक आठवड्याचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले होते, असे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. अमेरिकी नौदलाच्या सहाव्या तुकडीचे उपप्रमुख रिअर ॲडमिरल केल्विन फोस्टर यांनी सागरी सहकार्याबाबतच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच, हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल बजावत असलेल्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. प्रत्यक्ष कवायत सुरू होण्यापूर्वी एक ते तीन मार्चदरम्यान ‘आयएनएस तीर’ने सेशेल्सच्या तटरक्षकदलाबरोबर त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे सर्वेक्षणही केले.
भारत व सेशेल्समधील नौदल सहकार्य दीर्घकालीन प्रशिक्षण तैनातीचा एक भाग आहे. या कालावधीत सेशेल्सच्या नौदलाबरोबर व्यावसायिक अनुभवांची देवाणघेवाण, परस्परांच्या जहाजांना भेटी, विविध क्रीडा स्पर्धा आदी माध्यमातून सहकार्य व क्षमतावृद्धीसाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच, त्यांच्या संरक्षणदलांबरोबर सहकार्य व समन्वय साधण्याचा या कवायतीत सहभागी होण्यामागचा उद्देश आहे, असेही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. हिंदी महासागर क्षेत्राची सागरी सुरक्षा बळकट करणे व त्यासाठी परस्पर सहकार्य करणे, हा या नौदल कवायतींचा उद्देश होता. २६ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान झालेल्या या कवायतीत भारतासह अमेरिका, युरोप व आफ्रिकी देशांच्या नौदलांचा समावेश होता. या कवायतीचा समारोप सेशेल्सच्या संरक्षण अकादमीत झाला. भारतीय नौदल या कवायतीत २०१९पासून सहभागी होत आहे.
विनय चाटी