लष्कर उपप्रमुखांची संरक्षण उद्योग व संशोधन संस्थांना भेट
दि. ०३ मे: संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि संशोधन व विकास संस्थांना प्रोत्साहन देण्याची भूमिका लष्कराने घेतली असून, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या पुणे दौऱ्यात विविध संरक्षण उत्पादन संस्थांना दिलेल्या भेटीकडे याच दृष्टीकोनातून पहिले जात आहे.
लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल द्विवेदी सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात लष्करी गुप्तचर प्रशिक्षण संस्था व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट दिली. या दोन लष्करी प्रशिक्षण संस्थांबरोबरच लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी पुण्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या संस्था आणि संशोधन व विकास प्रक्रियेत योगदान देणाऱ्या संस्थांना भेट दिली. या प्रसंगी त्यांनी लार्सन अँड टुब्रो, भारत फोर्ज या खासगी, तसेच खडकी दारुगोळा कारखाना या सार्वजनिक क्षेत्रांतील संस्थांना भेट दिली. त्याचबरोबर ‘अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ (एआरडीई) व प्रेडिक्टिव्ह टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी या दोन संशोधन व विकास क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळानाही त्यांनी भेट दिली. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी (एडीजी-पीआय) ‘एक्स’ हँडलवर याची माहिती दिली आहे.
लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी या भेटींत विविध भागधारकांशी संवाद साधला. भविष्यातील युद्धासाठी सज्ज आणि सक्षम सैन्य उभारण्यासाठी संरक्षण उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले. तसेच, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या यशस्वितेसाठी लष्कराकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. लष्कराने २०२४ हे वर्ष तंत्रज्ञान समावेशन वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
लष्करची क्षमता वाढविणे आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योग जगताशी समन्वय व सहकार्य साधण्याच्या उद्देशाने लेफ्टनंट जनरल द्विवेदी सध्या देशभरातील महत्त्वाच्या लष्करी आस्थापना, सार्वजनिक आणि खाजगी संरक्षण उत्पादन संस्था, राष्ट्रीय महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांना भेट देत आहेत. . लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी अलीकडेच कानपूर आणि चेन्नईचा दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी रायफल उत्पादन प्रकल्प, अदानी यांच्या क्षेपणास्त्र आणि दारूगोळा प्रकल्पाव्यतिरिक्त लष्करी आणि औद्योगिक संस्थांना भेट दिली होती.
विनय चाटी