मीडिया उद्योजक म्हणून गेल्या 10 वर्षांमध्ये मी शिकलेल्या 10 गोष्टी

0
उद्योजक
1. अतिआत्मविश्वास कामाचा नसतो. 

2015 पर्यंत, पत्रकारितेत माझी 32 वर्षे पूर्ण झाली होती आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर मी स्वतःला एक सुप्रसिद्ध विश्लेषक-भाष्यकार म्हणून समजत होतो. त्यामुळे संरक्षण आणि सुरक्षा विषयक वेबसाइट सुरू करणे हा एक नवा बदल असेल, असे माझा विचार होता. अशोक अतलुरी सारख्या मित्रांनीही यासाठी प्रोत्साहित केले, ज्यांच्या अनेक वर्षांनी मी  पुन्हा संपर्कात आलो होतो. भारत-केंद्रित म्हणता येईल अशा संरक्षण व्यासपीठाच्या मूलभूत संकल्पनेवर त्वरित एकमत झाले, तिथेच भारतशक्तीची संकल्पना मांडण्यात आली. संरक्षण  विषयासाठी म्हणून भारतात त्यावेळी कोणतेही डिजिटल व्यासपीठ नव्हते, त्यामुळे याबाबत आमचा ठसा उमटवू असा विश्वास होता. अतलुरींनी सुरुवातीची मदत देण्याचे मान्य केले.

या प्लॅटफॉर्मसाठी मी पहिल्यांदाच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (गोवा ते दिल्ली असा लष्करी विमानातून प्रवास करताना) यांची एक खास मुलाखत घेतली होती. त्यामुळे उत्साह होता. पण चिंताही तेवढीच होती.

भारतशक्ती हे एक दर्जेदार उत्पादन असावे अशी माझी इच्छा असल्याने, या साइटसाठी वाचकांनी सबस्क्राईब करावे असा निर्णय घेण्यात आला. 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री आम्ही नियोजन केल्याप्रमाणे लाईव्ह केले, या साइटवर येणाऱ्या वाचकांना त्यांचे ईमेल आणि फोन नंबर देऊन सबस्क्राईब करावे लागले (पण पैसे द्यावे लागू नयेत). संरक्षण क्षेत्राशी निगडीत उत्साही वाचक कुतूहलापोटी सबस्क्राईब करण्याची तसदी घेतील असे मला वाटले होते. अर्थात त्यांनी काही दानधर्म केला  नसला तरी . दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता फक्त एकच सबस्क्राइबर होता! मी घाबरून गेलो. ताबडतोब आमच्या बॅकएंडची जबाबदारी सांभाळणाऱ्या रमेशला फोन केला आणि घाईघाईने वॉल काढून टाकली! माझ्या अति आत्मविश्वासामुळे, मी भारतीय वाचकांबाबत चुकीचा अंदाज लावला होता. वाचक दर्जेदार गोष्टी वाचू इच्छितात पण पैसे न देताही सबस्क्राइब करण्यासाठी दोन अतिरिक्त पावले उचलण्यास तयार होत नाहीत. ग्राहकांना यापुढे कधीही गृहीत धरायचे नाही हा धडा मी लवकरच शिकलो.

2. पत्रकारितेपेक्षा माध्यम उद्योजकता ही अधिक महत्त्वाची आहे

1983 ते 2014 दरम्यान मी ज्या सात माध्यमांमध्ये काम केले होते त्यापैकी पाच माध्यमांमध्ये लाँचिंग टीमचा भाग म्हणून सहभागी झालो होतो.  न्यूजरूममध्ये सुरूवातीला असणारा गोंधळ आणि संभ्रमावस्था माझ्यासाठी नवीन नव्हती. नोव्हेंबर 2015 च्या 25 तारखेला परत एकदा, ‘पोटात फुलपाखरे उडणे’ ही भावना प्रबळ असली तरी नैसर्गिक होती.

पण इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा, आतापर्यंत सतत माझ्यामागे असणारा माझ्या वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा यानंतर नसेल याची जाणीव झाल्याने मी घाबरलो. त्यापूर्वी तीन दशके, माझ्या पाठीशी नेहमीच कोणीतरी होते. इथे, माझ्यावर अंतिम जबाबदारी होती. संपादकीय मजकुरापासून ते आर्थिक निर्णयांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मी जबाबदार असणार होतो. महिन्याच्या शेवटी, आपल्या टीमला वेळेवर पगार मिळेल आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे पैसे आपण कमवू शकू याची मला खात्री करायची होती. आजपर्यंत हातात येणाऱ्या निश्चित मासिक पगाराचा आता कोणताही आधार नव्हता. संपादक, मार्केटिंग मॅनेजर, पीआर प्रोफेशनल या सर्व भूमिका मला एकट्यालाच निभावून न्यायच्या होत्या.

3. विश्वासार्हता हीच अंतिम ताकद आहे

तीन दशकांपासून, मी एक संतुलित, सुजाण आणि आघाडीच्या मीडिया संस्थांसाठी काम करणारा एक दृढनिश्चयी पत्रकार म्हणून प्रतिमा निर्माण केली होती. पण एक मीडिया उद्योजक म्हणून, मी केवळ माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेवर अवलंबून राहू शकत नव्हतो. आम्हाला असा ब्रँड तयार करायचा होता ज्यावर लोक विश्वास ठेवतील. माझे पहिले सहकारी, ब्रिगेडियर एस.के. चॅटर्जी (निवृत्त) आणि नीलांजना बॅनर्जी यांनी आम्ही सर्वोत्तम दर्जाचा कंटेंट सादर करू याची खात्री केली. ब्रिगेडियर चॅटर्जी यांनी त्यांचे विशाल नेटवर्क कामाला लावले. आमच्यापेक्षा खूपच लहान परंतु रेडिओ, टीव्ही आणि सुरुवातीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा व्यापक अनुभव असलेली नीलांजना वेबसाईटची  आमची रचना आणि प्लॅटफॉर्मचा एकंदर लूक सतत अपग्रेड करत होती. ती कायमच नवनवीन कल्पना मांडायची. आम्ही वेग वाढवत असताना, भारतशक्ती टीमच्या लक्षात आले की वाचक आणि ग्राहकांना अचूक (सर्वात जलद नाही) बातम्या आणि संतुलित विश्लेषण हवे आहे. त्यामुळे विश्वासार्हता हे आमचे शस्त्र बनले. आम्हाला अधूनमधून अशा कमेंट्स येऊ लागल्या ज्यात उल्लेख असायचा की “जर भारतशक्ती एखाद्या बातमीवर अमुक म्हणत असेल तर ते योग्यच असेल”. त्यामुळे आम्हाला उत्साह तर आला पण आम्हाला अधिक जबाबदारही बनवले. आम्ही निर्णय घेण्याची घाई केली नाही किंवा आम्ही स्वतःला टेलिव्हिजनच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पर्धक म्हणूनही पाहिले नाही.

4. स्पेशलायझेशनचा मोठा फायदा

भारतशक्तीची रचना संरक्षण चर्चा, वादविवाद आणि विचारविनिमयासाठी एक व्यासपीठ म्हणून करण्यात आली होती. विषय तज्ज्ञ आणि अनुभवी लेखकांना एकत्र आणणे हे आमच्या कंटेंटचे मुख्य उद्दिष्ट होते. विविध अनुभव गाठीशी असणारे अनेक माजी अधिकारी, त्यांचे कौशल्य शेअर करण्यासाठी आणि सामान्य वेबसाइट्स किंवा वर्तमानपत्रांमध्ये सामान्यतः स्थान न मिळणाऱ्या विषयांवर लिहिण्यासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय पुढे आले. रिअर अ‍ॅडमिरल सुदर्शन श्रीखंडे (निवृत्त), लेफ्टनंट जनरल पीआर शंकर (निवृत्त), व्हीएडमिरल प्रदीप चौहान, ब्रिगेडियर सुनील गोखले (निवृत्त), मेजर जनरल पीके चक्रवर्ती ही त्यांपैकी काही नावे आहेत जी आमच्या सुरुवातीच्या नियमित लेखकांमधून लगेच लक्षात येतात. त्यांच्या विद्वत्तापूर्ण योगदानाशिवाय, भारतशक्ती आता जे विशेष व्यासपीठ आहे ते बनले नसते. निष्कर्ष: स्पेशलायझेशनची जागा सामान्य ज्ञानाने घेता येणार नाही.

5. संरक्षण क्षेत्र फक्त सशस्त्र दलांपुरते मर्यादित नाही

अनेक दशकांपासून, भारतात संरक्षण क्षेत्रातील चर्चा बहुतेकदा लष्करी बाबींभोवती फिरत होत्या: सिद्धांत, रणनीती, डावपेच, ऑपरेशन्स, पोस्टिंग, पदोन्नती, नेतृत्व. आणि हो, आयात लॉबी. भारतीय कंपन्या आणि एमएसएमईंना साउथ ब्लॉक भोवतीची तटबंदी फोडणे अशक्य आणि निर्णय घेणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण वाटत होते. मात्र मोदी सरकारचा दृष्टिकोन वेगळा होता. मेक इन इंडियाची घोषणा नुकतीच झाली होती. संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी साउथ ब्लॉकच्या गजबजलेल्या कॉरिडॉरमध्ये त्यांच्या मूलगामी विचारांनी वेगळे वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली होती.

अचानकपणे, लष्करी अधिकारी या क्षेत्रातील उद्योगांपर्यंत पोहोचू लागले; भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणांमध्ये सुधारणा केल्या जात होत्या. स्वाभाविकच, आम्ही हा ट्रेंड लवकर पकडला आणि खरेदी, अधिग्रहण आणि उद्योग क्षेत्राशी धिगडीत बातम्या आणि कार्यक्रमांसाठी आमचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. द्वैवार्षिक डिफएक्सपो आणि एअरो इंडिया शो आमच्या कॅलेंडरमध्ये अवश्य भेट देण्यासारखे कार्यक्रम बनले. भारतशक्ती हा फ्लॅटफॉर्म बदलत्या भारतासाठी आणि भारतीय उद्योगांसाठी आवाज बनण्यासाठी होता.

अर्थात आम्हीही नवखेच होतो आणि भारतीय संरक्षण उद्योग देखील सुधारणांच्या दिशेने लहान पावले उचलू लागला होता. त्यामुळे नैसर्गिकपणे आमच्यात स़ंबंध प्रस्थापित होणे अपरिहार्य  होते. त्यामुळे या व्यासपीठाची व्याप्ती वाढली. पहिल्या काही महिन्यांत केवळ लष्कर-केंद्रित पोर्टलवरून, आम्ही लष्कर-उद्योग-तंत्रज्ञान केंद्रित व्यासपीठापर्यंत प्रवास केला. म्हणूनच आमच्यासाठी संरक्षण हे केवळ लष्करापेक्षा बरेच काही बनले.

6. योगायोगाच्या गोष्टी

एक पोर्टल हे एक पोर्टल असते. राष्ट्रीय सुरक्षेवर नाही तर संरक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची आकांक्षा असलेले अनेक प्लॅटफॉर्म असू शकतात, हे आमच्या लवकरच लक्षात आले. या सगळ्यात भारतशक्तीचे वेगळेपण दिसण्यासाठी एका एक्स-फॅक्टरची आवश्यकता होती. आपण वेगळे कसे दिसू यावर आमचे मेंदू शिणवत असताना, एके दिवशी न्यूझीलंड हवाई दलाचे एअर कमोडोर शॉन क्लार्क जे नंतर भारतातील संरक्षण अटॅची होते (मात्र रहायला कॅनबेरा येथे) यांचा फोन आला. त्यांना भारताच्या संरक्षण आणि सुरक्षा धोरणांवर गप्पा मारायच्या होत्या. आम्ही भेटलो. गप्पा मारल्या. ते कॅनबेराला परत गेले आणि पुन्हा भारतात आले. यावेळी, मी त्यांना घरी ड्रिंकसाठी आमंत्रित केले. जिथे थोडे अधिक आरामात, आम्ही त्याच्या कुटुंबाबद्दल (जर मला बरोबर आठवत असेल तर मी एका माओरी महिलेशी लग्न केले आहे, असे त्यांनी सांगितले होते), हवाई दल सोडल्यानंतरच्या त्यांच्या स्वप्नांबद्दल गप्पा मारल्या.

आम्ही भारतशक्तीची कशी सुरूवात केली आणि माझ्या मुलांनी नुकताच कसा कॉलेज प्रवेश केला आहे याबद्दल मी त्यांना सांगितले. संध्याकाळ होत असताना, माझ्या पत्नीने बनवलेले स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेताना, शॉनने मला माहित नसलेली एक गोष्ट सांगितली. “आमच्याकडे नवी दिल्लीत परदेशी संरक्षण आणि लष्करी सल्लागार/संलग्नकांची एक संघटना आहे. आम्हाला, एक गट म्हणून, नेहमीच भारतीय संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती हवी असते. तुम्ही या गटाशी का सहकार्य करत नाही,” शॉनने त्या संध्याकाळी अनौपचारिक संभाषणादरम्यान सहज सांगितले. पण त्यांचा हेतू अनौपचारिक नव्हता. त्यांनी प्रत्यक्षात मला असोसिएशनच्या डीनशी (मला वाटते की त्यावेळी घानाचा अधिकारी) संपर्क साधला सांगितले.

मी त्यांना भेटायला गेलो आणि काही दिवसांतच, विविध भागधारकांना (लष्करी वापरकर्ते, खरेदी व्यावसायिक, संरक्षण उद्योग प्रतिनिधी, थिंक टँक आणि विश्लेषक) एकत्र आणणारी परिषद आयोजित करण्याची कल्पना जन्माला आली. आम्ही त्याला DAs’ Conclave  म्हणण्याचा निर्णय घेतला.

पहिली दोन वर्षे हे conclave माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. इथे त्यांचे जुने मित्र, लेफ्टनंट जनरल व्ही.जी. खंदारे, जे त्यावेळी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण गुप्तचर संस्थेचे (डीआयए) महासंचालक होते, ते आमच्या मदतीला धावले. महासंचालक म्हणून त्यांचे एक काम म्हणजे परदेशी संरक्षण अधिकाऱ्यांशी संवाद साधणे. त्यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, ज्यात कर्नल (आता ब्रिगेडियर) जसविंदर सिंग यांचा समावेश होता, परदेशी संरक्षण अधिकाऱ्यांना एकत्रित केले. मी भारतीय आणि परदेशी संरक्षण कंपन्यांशी संपर्क साधला, अगदी तात्पुरते. तोपर्यंत मनोहर पर्रीकर मित्र बनले होते. त्यांनी उत्साहाने या कल्पनेला पाठिंबा दिला आणि उद्घाटन करण्यासाठी आणि सहभागींशी संवाद साधण्यासाठी आले. ही पहिलीच अशी घटना होती ज्यात भारताचे संरक्षण मंत्री, उच्च लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परदेशी संरक्षण अधिकाऱ्यांशी आणि उद्योगांशी थेट संवाद साधत होते, संरक्षण खरेदी धोरणांच्या गुणवत्ते आणि तोट्यांवर चर्चा करत होते, वादविवाद करत होते.

अशाप्रकारे आमचा वार्षिक मार्की कार्यक्रम, DAs’ Conclave चे 2021 मध्ये इंडिया डिफेन्स कॉन्क्लेव्ह असे नामकरण करण्यात आले. योगायोग त्याच्या सर्वोत्तम टप्प्यात होता. सोलर एरोस्पेस अँड डिफेन्सचे श्री सत्यनारायण नुवाल आणि भारत फोर्जचे श्री बाबा कल्याणी, ज्यांना मी योगायोगाने भेटलो, ते  भारतशक्तीचे आधारस्तंभ राहिले आहेत. कोविडच्या कठीण काळातही आमचा प्रवास टिकवून ठेवण्यात ते प्रेरणादायी तसेच मोठा आधारस्तंभ होते.

मला आश्चर्य वाटते की जर मी शॉनला भेटलो नसतो तर काय झाले असते… मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री नसते तर काय झाले असते… जर आम्ही भारतशक्ती लाँच केली असती तेव्हा संरक्षण मंत्रालयातील संशयाचे वातावरण निवळून जो मोकळेपणा आला तो आला नसता तर काय झाले असते… जर मी अशोकशी पुन्हा संपर्क साधला नसता आणि श्री नुवाल आणि श्री कल्याणी यांना भेटलो नसता तर काय झाले असते… जर इतक्या लोकांनी या प्रवासात आम्हाला मदत केली नसती तर काय झाले असते? इतके काय झाले असते तर!

7. तुम्ही तुमच्या टीमइतकेच चांगले आहात

आमच्या 10 व्या वाढदिवसाच्या आणि वार्षिक कार्यक्रमाच्या 10 व्या आवृत्तीच्या निमित्ताने आम्ही तयार होत असताना, भारतशक्तीला आपले घर मानणारे आणि त्याच्या प्रवासात स्वतःला भागधारक मानणारे उत्साही, प्रतिभावान आणि कामाशी वचनबद्धता दखखवणारे सहकारी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.

वेबसाइटच्या दैनंदिन कामकाजाची काळजी घेणारे ब्रिगेडियर चॅटर्जी, विशेषतः आशय निवडणे आणि त्याची गुणवत्ता तपासणे, नीलांजना, जी या वार्षिक conclave ला व्यावहारिकरित्या तिच्या बाळासारखे मानते आणि रोहित (पंडिता), आदित्य (लेंका) यांच्यासह त्याच्या अंमलबजावणीचे संपूर्ण काम एकटीने मार्गदर्शन करत पूर्ण करवून घेते. मी फक्त चार जणांची नावे घेतली. मात्र जसजशी आमची प्रगती होत गेली त्याप्रमाणे या 10 वर्षांमध्ये एकामागून एक सहकारी यात सामील झाले. आज सुमारे 38 जणांची संपूर्ण टीम आमच्या यशात समान भागीदार आहे, तुम्ही तुमच्या टीमइतकेच चांगले आहात हे पुन्हा एकदा सिद्ध करत आहे. मी भारतशक्तीचा चेहरा असू शकतो पण माझ्या मागे चतुरस्त्र प्रतिभावान सहकाऱ्यांचा गट आहे जो दरवर्षी वार्षिक कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी कठोर परिश्रम करतो.  त्यांच्याशिवाय, भारतशक्ती आज आहे तशी नसती.

8. जुने नियम अजूनही कायम आहेत

गेल्या दशकाव्यतिरिक्त, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला फक्त माहिती मिळवायची होती आणि ती माझ्या वाचकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती ते देखील अचूकता आणि वेगाशी तडजोड न करता. माझे पत्रकारितेतील मार्गदर्शक श्री. एम. व्ही. कामथ यांनी चार दशकांपूर्वी माझ्या मनात रुजवलेले तीन प्रमुख नियम मला लागू करायचे होते: पहिले, गंभीरपणे काम करा पण स्वतःला कधीही जास्त गांभीर्याने घेऊ नका. दुसरे, तुम्ही तुमच्या शेवटच्या बाय-लाइनइतकेच चांगले आहात (म्हणजे तुम्ही काल जितके चांगले होतात तितकेच चांगले आहात) आणि तिसरे, तुम्ही काय लिहित नाही किंवा काय म्हणत नाही हे तुम्ही सांगता किंवा लिहिता त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे (राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींचे वृत्तांकन करण्याच्या क्षेत्रात विवेक आणि जबाबदारी ही गुरुकिल्ली आहे).

एक मीडिया उद्योजक म्हणून, मी त्याच मूलभूत नियमांचे पालन करत राहिलो, तात्पुरत्या झगमगाटाच्या किंवा ट्रेंडच्या मागे न धावता, ब्रँड स्थापित करण्यासाठी माझा पुरेसा वेळ दिला, अशी टीम तयार केली जी वारंवार विविध कल्पना मांडते आणि मान्य झालेल्रा योजना अचूकतेने अंमलात आणते. पत्रकारितेमध्ये आणि व्यवसायात, तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा जाणून घेणे, स्वतःच्या सीमा आखणे आणि दुप्पट जलद वेळेत चंद्रावर पोहोचण्याचे ध्येय न ठेवणे, लुप्त होणाऱ्या उल्केसारखे पडणे हे महत्त्वाचे आहे. संयम ही एक संपत्ती आहे, जबाबदारी नाही.

9. जर तुम्ही उत्साही असाल, तर काम हे ओझे वाटत नाही

मला अनेकदा विचारले जाते की मी माझ्या साठीत अजूनही व्यस्त इंटर्नसारखे का काम करतो? उत्तर सोपे आहे: ते काम नाही. ती उत्कटता आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल उत्साह असेल, तर ते कधीही ओझे वाटणार नाही. मी अजूनही उत्साहाने काम करू शकतो कारण मी जे करतो त्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे आपले काम एक उपयुक्त योगदान म्हणून पाहिले जाते की नाही, हे इतरांनी ठरवायचे आहे पण जोपर्यंत मी भारतशक्तीमध्ये आपण जे करतो त्याबद्दल उत्साही आहे, तोपर्यंत आपण पुढे जाऊ, देवाची इच्छा असेल.

10. कुटुंबाचा पाठिंबा अमूल्य आहे

माझ्या पत्रकारितेच्या 42 वर्षांच्या प्रवासात, असंख्य मार्गदर्शक, मित्र आणि सहकाऱ्यांनी मला व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या प्रगतीसाठी मदत केली आहे. त्यांच्या अचूक पाठिंबा आणि मार्गदर्शनाशिवाय, मी जे साध्य केले आहे त्याच्या अर्ध्याही गोष्टीही मी करू शकलो नसतो. सर्वोच्च स्तरावरील राष्ट्रीय सुरक्षा निर्णय घेणारे, लष्करी अधिकारी, या व्यवसायातील मित्र या सर्वांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि सल्ल्याने माझे पाय जमिनीवर ठेवले आहेत. माझे कुटुंब म्हणजे पत्नी नेहा आणि दोन मुले, हर्ष आणि उत्कर्ष, यांनीही मला माझ्या या प्रवासात भक्कम साथ दिली. माझे पहिले वाचक म्हणून काम केले आहे, माझ्यावर किंवा माझ्या कामावर टीका केली आहे, जेव्हा ग्लॅमर आणि ओळख यामुळे येणाऱ्या थोड्याशा प्रसिद्धीने वाहून जाणे सोपे झाले असते तेव्हा माझे पाय जमिनीवर ठेवण्यास त्यांची मदत झाली आहे. नेहाच्या बिनशर्त आणि अखंड पाठिंब्याशिवाय, मी माझ्या पन्नाशीच्या दशकाच्या मध्यात उद्योजक होण्याचे धाडस केले नसते. त्या ‘भक्कम पाठिंब्याशिवाय’, भारतशक्ती माझ्या मनात फक्त एक कल्पना म्हणूनच राहिली असती.

नितीन अ. गोखले

+ posts
Previous articleभविष्यातील युद्धांसाठी एकात्मता आणि नवोन्मेष आवश्यक – CDS चौहान
Next articleपरावलंबन नव्हे, तर ‘स्वावलंबन’ हेच आपले अंतिम ध्येय असावे: संजीव कुमार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here