अभ्यासकांच्या मते, युक्रेनमधील रशियाच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरिया आपले सैन्य 1 लाखापर्यंत वाढवू शकते, ज्यामुळे वाढत्या प्रादेशिक अस्थिरतेबद्दल आणि त्या बदल्यात प्योंगयांगने मॉस्कोकडून प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे संभाव्य अधिग्रहण करण्याची आखलेली योजना धोक्याची घंटा वाजवणारी आहे.
“जेव्हा उत्तर कोरियाने सुरुवातीला सुमारे 10 हजार सैनिक पाठवले, तेव्हा हे स्पष्ट होते की कमी झालेल्या रशियन तुकड्यांची भरपाई करण्यासाठी आणखी बरेच सैनिक तिथे पाठवावे लागेल,” असे आसन इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजचे वरिष्ठ विश्लेषक यांग यू. के. यांनी ‘द वीक इन एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “सैन्याची एकूण संख्या अखेरीस त्या संख्येच्या दहापट झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असेही ते म्हणाले.
यांग यांनी नमूद केले की उत्तर कोरिया आपल्या लष्करी दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी युक्रेन संघर्षातील आपल्या सहभागाचा फायदा घेत आहे, ज्यामुळे दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानच्या दृष्टीने सुरक्षिततेबाबतची जोखीम वाढली आहे.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि रशियन तंत्रज्ञान
या आठवड्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने हायपरसॉनिक इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली, जी मॉस्को आणि प्योंगयांग यांच्यातील व्यापक कराराचा भाग म्हणून रशियन क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सूचित करणारी होती. विश्लेषकांच्या मते, या करारामध्ये उत्तर कोरियाच्या सैन्याची तैनाती आणि इतर गोष्टींना दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याच्या बदल्यात लष्करी आणि आर्थिक लाभांचा समावेश आहे.
बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत, अमेरिकेच्या उप राजदूत डोरोथी केमिली शिया यांनी उत्तर कोरियाच्या वाढत्या लष्करी क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली. “रशिया-युक्रेन युद्धातील उत्तर कोरियाच्या सहभागामुळे तो आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध युद्ध करण्यात अधिक पारंगत होत आहे”, असे सांगत, प्योंगयांग आपल्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीचा विस्तार करण्यासाठी आणि फायदेशीर लष्करी प्रशिक्षण सौदे सुरक्षित करण्यासाठी युद्धकाळातील अनुभवाचा फायदा घेऊ शकेल, असा इशारा त्यांनी दिला.
धोरणात्मक आणि प्रादेशिक परिणाम
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सोमवारी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यादरम्यान, रशिया अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी उत्तर कोरियासोबत आपले सहकार्य वाढवू शकेल अशी चिंता व्यक्त केली. या सहकार्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे प्योंगयांग स्टील्थ बॉम्बर्स आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालींमुळे अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या महत्त्वपूर्ण मालमत्तेला लक्ष्य करण्यास सक्षम होऊ शकते.
उत्तर कोरिया आपली मिग-29 ही लढाऊ विमाने अद्ययावत करत असल्याचे आणि रशियाच्या मदतीने 3 हजार टन वजनाची युद्धनौका तयार करत असल्याचे दिसते. या घडामोडींमुळे प्योंगयांगची लष्करी स्थिती आणखी मजबूत होत असल्याचे आणि मॉस्कोसोबतच्या त्याच्या भागीदारीची धोरणात्मक सखोलता अधोरेखित होते.
किम जोंग-उनच्या 2023 च्या रशियाच्या दौऱ्यात, ज्यात लष्करी सुविधा, एक अंतराळ बंदर आणि रशियन पॅसिफिक फ्लीट कमांडचा समावेश होता, त्याने अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या आपल्या इच्छेचे संकेत दिले. विश्लेषकांचे म्हणणे आहे की उत्तर कोरियाच्या सैन्याने रशियाला कुर्स्कसारख्या भागातील प्रदेश परत मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र, यामुळे उत्तर कोरियाच्या सैन्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे.
एक नाजूक युती
वाढती लष्करी भागीदारी असूनही, तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की रशिया-उत्तर कोरिया युती अल्पकाळच टिकू शकते. रशियाशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे उत्तर कोरियाचे चीनसोबत असलेले संबंध ताणले गेले आहेत. युद्ध संपल्यानंतर उत्तर कोरिया आपला पारंपरिक आणि अपरिहार्य सहकारी असलेल्या चीनशी संबंध सुधारण्यावर भर देईल.
उत्तर कोरिया जसजशी आपली लष्करी क्षमता आणि त्यामुळे भू-राजकीय गुंतागुंत वाढवत आहे, तसतसे त्याचे शेजारी आणि व्यापक आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सुरक्षा आव्हाने वाढतच चालली आहेत.
टीम भारतशक्ती