अफगाणिस्तानमध्ये 1.33 लाख मुलांसह 23.7 लाख लोकांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. यावर्षी आतापर्यंत गोवर या आजाराची 14 हजार 570 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 71जणांचा मृत्यू झाल्याचे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडने (युनिसेफ) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. युनिसेफच्या अहवालानुसार हवामान बदल, आर्थिक मंदी आणि बेरोजगारीमुळे अफगाणिस्तानमध्ये ददीर्घकाळापासून चालत आलेल्या गरिबीत आणखी वाढ झाली आहे. मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीची गरज असल्याचे सांगत युनिसेफने देशातील परिस्थितीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
अहवालानुसार, अफगाणिस्तान 12.3 लाख मुलांना तसेच 23.7 लाख लोकांना मानवतावादी मदतीची गरज आहे. तिथली परिस्थिती इतकी बिघडली आहे की यावर्षाच्या सुरुवातीपासून मार्चपर्यंत सुमारे 71 मृत्यूची नोंद झाली आहे, तर गोवरची 14 हजार 570 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 5 वर्षांखालील 11हजारहून अधिक मुले या आजाराने ग्रस्त असून 6000 हून अधिक महिलांनाही या आजाराची लागण झाली आहे.
गोवर या आजाराव्यतिरिक्त मार्च महिन्यात अफगाणिस्तानमध्ये तीव्र श्वसन संसर्ग (एआरआय) आणि दूषित पाण्यामुळे होणारा अतिसार (एडब्ल्यूडी) हे संसर्गजन्य आजारही बघायला मिळाले.
युनिसेफने आपल्या मानवतावादी भागीदारांना अफगाणिस्तानमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या केवळ 35 टक्के मुलांनापर्यंतच 1.4 अब्ज अमेरिकी डॉलर्सची सुरक्षा मदत पोहोचली आहे.
सेव्ह द चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय बिगर-सरकारी संघटनेने अलीकडेच अफगाणिस्तानमधील मुलांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. या संस्थेच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानातून परतणाऱ्या 2 लाख 50 हजार अफगाण मुलांना अन्न आणि निवाऱ्याची कमतरता भेडसावत आहे. 27 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या जागतिक अन्न अहवालानुसार, दरमहा 60 लाख लोकांना अन्न आणि रोख रक्कम दिली जात आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार ही परिस्थिती जर सुधारली नाही तर अफगाणिस्तानमधील सुमारे 1.5 कोटी लोकांना उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागेल.
अफगाणिस्तानमधील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक मानवतावादी उपक्रमांच्या योग्य समन्वयासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाने 3.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अंदाजपत्रक आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
आराधना जोशी