मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या हल्ल्यात 40 लोक ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाल्याचे रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने म्हटले आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्याचा रशियन अधिकारी दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत आहेत. अलिकडच्या वर्षांत रशियातील हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे.
मॉस्कोमधील या कॉन्सर्ट हॉलमध्ये अनेक बंदूकधाऱ्यांनी प्रवेश करून स्फोट घडवून आणला आणि उपस्थितांवर स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. यामध्ये 40 लोक ठार आणि 100हून अधिकजण जखमी झाले. यावेळी लागलेल्या प्रचंड आगीमुळे हॉलचे छप्पर कोसळल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे.
रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी स्फोट घडवून आणल्याने प्रचंड आग लागली. 6हजारहून अधिक प्रेक्षकांना सामावून घेऊ शकणाऱ्या या इमारतीवर काळ्या धुराचे प्रचंड लोट उमटलेले समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले.
प्रसिद्ध रशियन रॉक बँड ‘पिकनिक’च्या कार्यक्रमासाठी गर्दी जमलेली असताना हा हल्ला झाला. रशियन वृत्तवाहिन्यांनी सांगितले की तिथे उपस्थित असलेल्यांना बाहेर काढले जात आहे, मात्र प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या आगीत अजूनही असंख्य लोक अडकले असावेत. प्रॉसिक्युटर ऑफिसकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्करी पोशाखात असलेल्या अनेक हल्लेखोरखंनी सभागृहात प्रवेश करून पाहुण्यांवर गोळीबार केला.
रशियन माध्यमे आणि टेलिग्राम वाहिन्यांवर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये गोळींच्या अनेक फैरी झाडल्याचे ऐकू येत आहे. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये हातात रायफल घेऊन हॉलमधून फिरणारे दोन हल्लेखोर दिसत आहेत तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सतत सुरू असणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोरांनी हॉलला आग लावल्याचे तिथे उपस्थित असलेला एकजण सांगत आहे. आणखी काही व्हिडिओंमध्ये असॉल्ट रायफल्ससह टोप्या घातलेले चार हल्लेखोर दिसले , जे आरडाओरड करणाऱ्या लोकांवर पॉइंट – ब्लँक रेंजने गोळीबार करत होते.
मॉस्को प्रांताचे राज्यपाल आंद्रेई व्होरोब्योव्ह यांनी सांगितले की ते या भागाला भेट देण्यासाठी निघाले असून ही परिस्थिती हाताळण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र यापेक्षा अधिक तपशील त्यांनी दिला नाही.
रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लोकांना बाहेर काढण्यात येत असल्याने तिथे दंगल हाताळणाऱ्या पोलिसांची पथके पाठवली जात आहेत. मॉस्कोच्या विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले, तर मॉस्कोच्या महापौरांनी आठवड्याच्या शेवटी नियोजित असणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी म्हणाले की आता लगेच या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया देणे कठीण आहे. पण “आलेले फोटो भयावह आहेत आणि हे पाहणे खूपच कठीण आहे.”
किर्बी म्हणाले , “या भयानक, भयावह गोळीबार हल्ल्यातील पीडितांसोबत आमच्या सहसंवेदना आहेत. ” काही आई आणि वडील, भाऊ आणि बहिणी, मुले आणि मुली आहेत ज्यांना अजूनही आपल्या जिवलगांचा काहीच ठावठिकाणा समजलेला नाही. हा खूपच अवघड दिवस असणार आहे.
दहशतवादी हल्ला होऊ शकतो हे लक्षात घेऊन अमेरिकन नागरिकांनी राजधानीतील गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन या महिन्याच्या सुरूवातीला मॉस्कोतील अमेरिकी दूतावासाने एका निवेदनाद्वारे केले होते. हाच इशारा नंतर इतर अनेक पाश्चात्य दूतावासांनी पुन्हा दिला होता.
टीम स्ट्रटन्यूज
(स्रोत एपी)