गाझामध्ये मदतीची वाट पाहत असलेले 67 पॅलेस्टिनी नागरिक ठार

0

रविवारी इस्रायली लष्कराने, UN च्या अन्नवाटप ट्रक्सची वाट पाहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये किमान 67 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याची माहिती, गाझा आरोग्य मंत्रालयाने दिली. ही घटना उत्तर गाझामध्ये घडली असून, यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले आहेत. याआधीही अनेकवेळा मदतीच्या आशेने आलेल्या नागरिकांवर अशाप्रकारे हल्ले झाले असून, शनिवारी अशाच एका घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला होता. दक्षिणेकडील एका मदत केंद्राजवळ आणखी 6 जण ठार झाले, असेही मंत्रालयाने सांगितले.

इस्रायली लष्कराने म्हटले की, “लोकांच्या गर्दीमुळे तात्काळ धोका निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी गोळीबार केला.” मात्र, मानवतावादी मदत पुरवणाऱ्या ट्रक्सना त्यांचा हेतू लक्ष्य करण्याचा नव्हता, असा दावा त्यांनी केला.

UN च्या जागतिक अन्न वाटप कार्यक्रमाने (WFP) सांगितले की, “गाझात प्रवेश केल्यानंतर, 25 ट्रक्सजवळ लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यानंतर गोळीबार झाला. मानवतावादी मदत घेण्यासाठी आलेल्या नागरिकांवर हल्ला पूर्णपणे अमान्य आहे.”

मरण आणि उपासमारीची दुहेरी झळ

रविवारी, इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे एकूण 90 लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

दिर अल-बालाह या मध्यवर्ती भागात, इस्रायली लष्कराने पुनरायुक्त केलेल्या लोकांना पुनः एकदा स्थलांतर करण्याची पत्रके वाटली (leaflets) वाटली गेली. त्यानंतर तीन घरांवर बॉम्बफेक झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शेकडो कुटुंबे पुन्हा आपली घरे सोडून जाताना दिसली.

इस्रायली लष्कराने सांगितले की, “त्यांनी या भागात प्रवेश केला नसला तरी “शत्रूची क्षमताशक्ती आणि दहशतवादी रचना उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर कारवाई सुरू ठेवली आहे.” काही इस्रायली सूत्रांचे म्हणणे आहे की, “या भागात अजूनही काही इस्रायली बंदीवान असू शकतात, जे थेट हल्ला टाळण्यामागचे कारण आहे.”

“या निर्णयामुळे आमच्यापैकी कोणी आपले प्रियजन गमावणार नाही, याची कुणी हमी देऊ शकतो का,?” असा सवाल बंदीवानांच्या कुटुंबीयांनी इस्रायली लष्कराकडे उपस्थित केला.

गाझामध्ये भीषण उपासमार – आरोग्य यंत्रणांचा इशारा

21 महिन्यांहून अधिक चाललेल्या या युद्धामुळे गाझाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “अन्नाअभावी शरीर खंगलेल्या शेकडो लोकांचा मृत्यू लवकरच होण्याचा धोका आहे.”

71 मुले कुपोषणामुळे मृत्यूमुखी पडली आहेत, तर 60 हजारांहून अधिक मुले कुपोषणाच्या लक्षणांनी त्रस्त आहेत.

रविवारी एका दिवसातच 18 जण उपासमारीमुळे मरण पावले, असेही मंत्रालयाने जाहीर केले.

गाझामध्ये आता पीठासारख्या अत्यावश्यक वस्तू उपलब्ध नाहीत. अनेक लोकांनी सांगितले की, त्यांनी मागील 24 तासांत फक्त एकदाच किंवा काहीच खाल्ले नाही.

“मी एक वडील म्हणून सकाळी उठल्यावर माझ्या पाच मुलांसाठी अन्न शोधतो, पण काहीही सापडत नाही,” असे झियाद नावाच्या एका परिचारकाने सांगितले. “बॉम्बनी नाही, तर उपासमारीने आमचे लोक मरत आहेत, आमच्या या यातना आता थांबवा,” असेही ते म्हणाले.

UN आणि पोप यांचे वक्तव्य

UNRWA (UN चा पॅलेस्टिनी शरणार्थी विभाग) ने, इस्रायलला अधिक मदत ट्रक्सना गाझामध्ये प्रवेश देण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, “तीन महिन्यांसाठी पुरेल इतके अन्न स्टॉकमध्ये आहे, परंतु आम्हाला प्रवेश दिला जात नाही.”

यावर इस्रायली लष्कराने उत्तर दिले की, “मानवतावादी मदतीचा प्रवेश ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधून त्यावर काम सुरू आहे.”

पोप लिओ यांनी, गाझामधील एकमेव कॅथोलिक चर्चवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. त्या हल्ल्यात तीन लोक ठार झाले. त्यांनी युद्धातील “क्रूरतेचा अंत” करण्याचे आवाहन केले.

तडजोडीचे प्रयत्न आणि युद्धाची पार्श्वभूमी

इस्रायल आणि हमास यांच्यात, कतारमध्ये 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहेत. मात्र, अजून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

युद्धाची सुरुवात 7 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती, जेव्हा हमासने इस्रायलमध्ये हल्ला करून 1,200 लोक ठार केले आणि 251 जणांना गाझामध्ये बंदीवान म्हणून नेले.

तेव्हापासून इस्रायली कारवाईत 58,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, गाझाची जवळपास संपूर्ण जनता विस्थापित झाली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articlePM मोदींच्या मालदीव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ‘INS Jatayu’ ची विशेष तैनाती
Next articlePM मोदींचा मालदीव दौरा: चीनच्या प्रादेशिक दबावादरम्यान धोरणात्मक पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here