लेबनॉनमध्ये शेकडो पेजरच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर हजारो जखमी

0
लेबनॉनमध्ये

लेबनॉनमध्ये मंगळवारी हिजबुल्ला अतिरेकी आणि वैद्यकीय सदस्यांनी वापरलेल्या पेजरचा एकाच वेळी स्फोट झाला. या स्फोटात किमान नऊ लोक मारले गेले असून सुमारे 3 हजार जखमी झाले. पेजर स्फोटांबद्दल आपल्याला आतापर्यंत काय माहिती मिळाली आहे?

स्फोट कुठे आणि कधी घडवून आणले गेले?

लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात स्थानिक वेळेनुसार दुपारी 3ः30 च्या सुमारास स्फोटांना सुरूवात झाली. बैरूतच्या दक्षिणेकडे असणारे उपनगर दहिया  आणि पूर्व बेका खोरे-हे सर्व हिजबुल्लाचे बालेकिल्ले आहेत.

या ठिकाणी झालेले हे स्फोट सुमारे एक तास चालले. रॉयटर्सचे प्रत्यक्षदर्शी आणि दहिया येथील रहिवाशांनी सांगितले की त्यांना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजताही स्फोटांचा आवाज ऐकू येत आहे.

सुरक्षाविषयक स्रोत आणि उपलब्ध फूटेजवरून असे दिसून आले की पेजर वाजल्यानंतर यातील काही स्फोट झाले. पेजरवरील मेसेज वाचण्यासाठी सशस्त्र दलाच्या काही सदस्यांनी पेजरवर हात ठेवले किंवा त्याचा स्क्रीन तपासण्यासाठी पेजर  चेहऱ्याजवळ आणले.

रॉयटर्सने पुन्हा पुन्हा तपासलेल्या फुटेजनुसार हे स्फोट बऱ्यापैकी आटोक्यात आले होते. सुपरमार्केटच्या सीसीटीव्ही फुटेजच्या दोन वेगवेगळ्या क्लिपनुसार, स्फोटांमध्ये केवळ अशाच व्यक्तींना दुखापत झाली ज्यांच्याजवळ पेजर आहे किंवा पेजर असलेल्या व्यक्तीजवळ ती व्यक्ती उभी आहे.

रुग्णालयांमध्ये चित्रित केलेल्या आणि समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आलेल्या फुटेजनुसार जखमींच्या चेहऱ्याला दुखापत झालेली दिसली किंवा त्यांची बोटेच स्फोटामुळे उडाली किंवा जिथे बहुधा पेजर लावले जातात अशा कंबरेवर तसेच नितंबांवर जखमा झालेल्या व्यक्ती बघायला मिळाल्या.

मात्र या स्फोटांमुळे मोठे नुकसान झाल्याचे किंवा कुठे आगी लागल्याचे वृत्त नाही.

कोणत्या प्रकारच्या पेजरचा स्फोट झाला?

या घटनेमध्ये ज्या पेजरचा स्फोट झाला त्यांचा रॉयटर्सने तपास केल्यानंतर, नष्ट झालेल्या पेजरच्या मागील बाजूस असलेले चित्र आणि स्टिकर्स तैवानस्थित पेजर उत्पादक गोल्ड अपोलोने बनवलेल्या पेजरशी जुळणारे होते.

या संदर्भात रॉयटर्सच्या प्रश्नांना कंपनीने कोणत्याही प्रकारची उत्तरे दिलेली नाही. याशिवाय पेजर कोणत्या कंपनीचे होते या रॉयटर्सने विचारलेल्या प्रश्नांना हिजबुल्लाहने उत्तर दिले नाही.

आपल्या ठिकाणांचा इस्रायलकडून मागोवा घेण्याचा प्रयत्न होऊ नये किंवा तो टाळण्यासाठी हिजबुल्लाच्या अतिरेक्यांनी फारसे प्रगत नसलेले साधन म्हणून पेजर वापरण्यास सुरुवात केली होती, असे या गटाच्या कारवायांशी परिचित असलेल्या दोन सूत्रांनी या वर्षाच्या सुरुवातीला रॉयटर्सला सांगितले होते.

तीन सुरक्षा सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की स्फोट झालेले पेजर हे अलीकडच्या काही महिन्यांत हिजबुल्लाने आणलेले नवीनतम मॉडेल होते.

पेजरचा स्फोट होण्यामागचे कारण काय?

हिजबुल्लाने सांगितले की ते स्फोटांच्या कारणांची “सुरक्षाविषयक आणि वैज्ञानिक चौकशी” करत आहेत.

मुत्सद्दी आणि सुरक्षा सूत्रांच्या अंदाजानुसार हे स्फोट उपकरणांच्या बॅटरीच्या स्फोटामुळे, बहुधा अतिउष्णतेमुळे झाले असावेत.

स्फोटांमुळे तज्ज्ञांसमोरचे गूढ वाढले आहे. मात्र रॉयटर्सशी बोलणाऱ्या अनेकांनी सांगितले की स्फोट घडवून आणण्यासाठी केवळ बॅटरी पुरेशी असेल का? अशी त्यांना शंका आहे.

न्यूकॅसल विद्यापीठातील लिथियम आयन बॅटरी सुरक्षेतील तज्ज्ञ पॉल क्रिस्टेंसन म्हणाले की, पेजर स्फोटांमुळे झालेल्या नुकसानाची पातळी पूर्वीच्या अशा बॅटरी अयशस्वी होण्याच्या ज्ञात प्रकरणांशी विसंगत आहे.

“आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत ती तुलनेने लहान बॅटरी आहे जी फुटली तर त्यातून लहान ज्वाळा येतात. आम्ही येथे प्राणघातक स्फोटाबद्दल बोलत नाही. मला बॅटरी ऊर्जेच्या घनतेबद्दल अधिक जाणून घेण्याची गरज आहे, परंतु माझे अंतर्ज्ञान मला सांगत आहे की ते अत्यंत अशक्य आहे,” असे ते म्हणाले.

लेबनॉनच्या एसएमईएक्स या डिजिटल हक्क संघटनेने रॉयटर्सला सांगितले की इस्रायलने पेजरमधील कमकुवतपणाचा फायदा घेत त्याचा स्फोट घडवून आणला असावा. हिजबुल्लापर्यंत या पेजरची डिलिव्हरी पोहोचण्यापूर्वीच ते अडवले गेले असावे आणि एकतर त्यांच्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने छेडछाड केली गेली असावी किंवा त्यात स्फोटक बसवली गेली असावीत, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली.

‘राईज अँड किल फर्स्ट “या पुस्तकातील आधीच्या अहवालानुसार, इस्रायली गुप्तचर दलांनी यापूर्वी शत्रूंना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक फोनमध्ये स्फोटके ठेवलेली आहेत. अशा वैयक्तिक उपकरणांमध्ये दुर्भावनायुक्त कोड टाकण्याची क्षमता देखील हॅकर्सनी सिद्ध केली आहे, ज्यामुळे ही उपकरणे जास्त गरम होतात आणि काहीवेळा त्यांचा स्फोट होतो.

अधिकाऱ्यांनी स्फोटांविषयी काय सांगितले आहे?

लेबनॉनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या स्फोटांना ‘इस्रायली सायबर हल्ला’ म्हटले आहे, परंतु ते त्या निष्कर्षाप्रत कसे पोहोचले याबद्दल कोणताही तपशील दिलेला नाही.
हा हल्ला म्हणजे लेबनॉनच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया लेबनॉनच्या माहितीमंत्र्यांनी दिली.
इस्रायलने मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleअटकेतील रशियन पत्रकाराने उपसले उपोषणाचे हत्यार
Next articleपेजरस्फोटांचा इस्रायलकडून बदला घेण्याचा हिजबुल्लाहचा निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here