भारत आणि मालदीव यांच्यात शुक्रवारी संरक्षण संवादाची नवी फेरी पार पडली. हिंद महासागरातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून आणि सध्या सुरू असलेल्या संरक्षण प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यावर यात चर्चा करण्यात आली. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यानंतर महिनाभराच्या कालावधीत दिल्लीत या चर्चेचे आयोजन करण्यात आले. चीन समर्थक अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीकडून करण्यात आलेला तो पहिलाच उच्चस्तरीय दौरा होता.
“चर्चेची संपूर्ण फेरी फलदायी ठरली, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांच्या सामायिक हितसंबंधांना चालना मिळेल तसेच हिंद महासागर प्रदेशात स्थिरता आणि समृद्धी आणेल,” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
Strengthening the defence ties, India and Maldives held 5th Defence Cooperation Dialogue in New Delhi today. Discussions were on expediting ongoing projects, high-level exchanges, capability development & bilateral military exercises.
More: https://t.co/3UNmS0C7er… pic.twitter.com/Mt8X96K8He
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) September 6, 2024
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी केले, तर मालदीवच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाचे प्रमुख, जनरल इब्राहिम हिल्मी यांनी केले.
या भेटीत दोन्ही बाजूंना द्विपक्षीय संरक्षण सहकार्याशी संबंधित विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. यावेळी इतर मुद्द्यांबरोबरच, दोन्ही बाजूंनी उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि क्षमता विकास प्रकल्प यासारख्या सामायिक हिताच्या इतर काही मुद्द्यांवरही चर्चा केली.
आगामी द्विपक्षीय लष्करी सरावातील सहभागाच्या पैलूंवरही चर्चा झाली.
मालदीव हा हिंद महासागर प्रदेशातील भारताच्या प्रमुख सागरी शेजारी देशांपैकी एक आहे. मालदीवमधील आधीच्या सरकारच्या काळात, संरक्षण आणि सुरक्षेसह द्विपक्षीय संबंधांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले होते.
टीम भारतशक्ती