माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित व्यक्तीची ओळख सीएनएन, ओझोनफॉक्स न्यूज आणि द न्यूयॉर्क टाइम्सने पटवली आहे. हा संशयित हल्लेखोर हवाईचा 58 वर्षीय रायन वेस्ली रौथ असे सांगितले जात आहे. मात्र एफबीआयने यावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी करण्यास नकार दिला असून रॉयटर्स स्वतंत्रपणे त्याची ओळख पटवू शकलेले नाही. या संशयित हल्लेखोराबद्दल आपल्याला आतापर्यंत काय माहित आहे –
झाडांमागे दिसली बंदुकीची नळी
सिक्रेट सर्व्हिसने सांगितले की त्यांचे एजंट्स गोल्फ कोर्सवर ट्रम्प यांच्यासोबत होते. गोल्फ खेळणाऱ्या ट्रम्प या़ंच्या पुढे उभ्या असलेल्या एजंटला प्रॉपर्टी लाइनजवळील झाडांमध्ये बंदुकीची नळी दिसली.
ताबडतोब तिथे असलेल्या एजंट्सनी हल्लेखोराला रोखण्यासाठी त्याच्यावर किमान चार गोळ्या झाडल्या. त्यामुळे हल्लेखोराकडे असलेली त्याची एके-47 रायफल, दोन बॅकपॅक, गो प्रो कॅमेरा आणि इतर वस्तू खाली पडल्या. मात्र हल्लेखोर निसानच्या काळ्या कारमधून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पाम बीच काउंटीचे शेरीफ रिक ब्रॅडशॉ म्हणाले की, एका प्रत्यक्षदर्शीने संशयित हल्लेखोराच्या कारचा आणि लायसन्स प्लेटचा फोटो काढला होता. तो त्याने तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
त्यानंतर थोड्याच वेळात, शेजारच्या मार्टिन काउंटीमधील शेरीफच्या प्रतिनिधींना हल्लेखोराला आंतरराज्य 95 वर रोखण्यात यश आले आणि त्यांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेतले.
युक्रेन, लोकशाही या विषयांवर पोस्ट
रॉयटर्सला रायन रौथचे एक्स, फेसबुक आणि लिंक्डइनवरील प्रोफाइल सापडले. मात्र गोळीबारानंतर काही तासांत फेसबुक आणि एक्स प्रोफाइलमधील पब्लिक ॲक्सेस काढून टाकण्यात आला.
रौथचे नाव असलेल्या तीनही अकाऊंटवरून एक गोष्ट लक्षात येते की तो रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनचा उत्साही समर्थक होता.
21 एप्रिल रोजी रौथने एलन मस्क यांना एक्सवर संदेश पाठवला, ज्यामध्ये त्याने लिहिलेः “मला तुमच्याकडून एक रॉकेट विकत घ्यायचे आहे. मला पुतीनच्या काळ्या समुद्राच्या हवेलीच्या बंकरमध्ये त्याला संपवण्यासाठी एक वॉरहेड टाकायचे आहे. कृपया तुम्ही मला किंमत कळवू शकता का?”
न्यूयॉर्क टाइम्सने मते त्यांनी 2023 मध्ये युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या अमेरिकन लोकांवरील एका लेखासाठी रौथची मुलाखत घेतली होती. रौथने टाइम्सला सांगितले होते की त्याने युक्रेनचा प्रवास केला होता आणि 2022 मध्ये तिथे अनेक महिने घालवले होते. याशिवाय युक्रेनमध्ये लढण्यासाठी तालिबानमधून पळून गेलेल्या अफगाण सैनिकांची भरती करण्याचा तो प्रयत्न करत होता.
2020 मध्ये एक्सवर, रौथ याने डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार बर्नी सँडर्स यांना पाठिंबा व्यक्त केला होता आणि बायडेन यांची “स्लीपी जो” म्हणून खिल्ली उडवली होती.
या वर्षाच्या सुरुवातीला, रौथने एक्सवरील एका पोस्टमध्ये बायडेन यांना टॅग केलेः “@POTUS तुमच्या मोहिमेला केएडीएएफसारखे काहीतरी म्हटले पाहिजे. अमेरिकेत लोकशाही जागती ठेवा आणि अमेरिकेला कोणत्याही बंधनात अडकवू नका. ट्रम्प हे मासा (MASA) आहेत. म्हणजे अमेरिकन लोकांना पुन्हा गुलाम बनवायला त्यांना आवडेल. (make Americans slaves again master). या निवडणुकीत लोकशाहीची खरी कसोटी आहे आणि आपण हरू शकत नाही.”
संशयित हल्लेखोराचा मुलगा ॲडम हवाईमधील एका हार्डवेअर स्टोअरमध्ये काम करतो. रॉयटर्सने त्याच्याशी संपर्क साधला असता आपण अद्याप ट्रम्प यांच्या हत्येच्या आजच्या नवीन प्रयत्नाबद्दल ऐकलेले नाही आणि त्याबद्दल आपल्याला “कोणतीही माहिती नाही,” असे त्याने सांगितले.आपले वडील असं काही करतील यावर विश्वासच बसत नाही.
नंतर, पत्रकाराने पुन्हा दुकानात फोन केला असता त्याच्या एका सहकाऱ्याने सांगितले की ॲडम आपत्कालीन परिस्थितीमुळे घरी गेला आहे.
रौथचा आणखी एक मुलगा ओरान याने सीएनएनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “एक प्रेमळ आणि काळजी घेणारा पिता म्हणून आपण त्यांच्याकडे बघत आलो आहोत. यापलीकडे मला कोणतीही टिप्पणी करायची नाही. फ्लोरिडामध्ये नक्की काय घडले आहे याची मला कल्पना नाही. मात्र मला आशा आहे की या गोष्टी प्रमाणाबाहेर फुलवून सांगितल्या जात आहेत.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)
(रॉयटर्स)