इस्रायलचे लेबनॉनमधील हल्ले रविवारी आणखी तीव्र झाले. गेल्या दोन आठवड्यांमध्ये अधिक तीव्र झालेल्या हवाईहल्ल्यांमध्ये हिजबुल्लाचे प्रमुख नेते ठार झाले असून लाखो नागरिक निर्वासित झाले आहे.
इस्रायलचे लष्करी प्रमुख हर्झी हलेवी म्हणाले, “त्यांनी आपले डोके (निर्णयक्षमता) गमावले आहे आणि आपल्याला हिजबुल्लाहवर अधिक जोरदार आक्रमण करणे आवश्यक आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली हल्ल्यांमध्ये रविवारी दक्षिणेकडील ऐन डेलेबमध्ये 32 आणि पूर्वेकडील बालबेक-हर्मेलमध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला.
इस्रायली ड्रोन बैरूतवर रात्रभर आणि रविवारी बराच वेळ घिरट्या घालत होते. याशिवाय लेबनॉनच्या राजधानीभोवती नवीन हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू येत होते.
इस्रायलने दोन आठवड्यांपूर्वी हिज्बुल्लाहवर वेगाने हल्ले करायला सुरूवात केली. रहिवाशांना त्यांच्या घरी परतण्यासाठी उत्तरेकडील भाग सुरक्षित बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून हिज्बुल्लाहचे बहुतेक नेते मारले. इस्रायलचे संरक्षणमंत्री आक्रमण अधिक तीव्र करण्याबाबत चर्चा करत आहेत.
Bunker busters in action — video reportedly from the scene of the attack that eliminated Nasrallah from on the ground in Beirut, Lebanon. 😮 pic.twitter.com/v6Uh8nX45k
— Emily Schrader – אמילי שריידר امیلی شریدر (@emilykschrader) September 29, 2024
हिजबुल्लाहचे 32 वर्षे नेतृत्व केलेल्या नरसल्लाच्या मृत्यूने हिजबुल्लाहला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर नव्याने रॉकेट हल्ला केला, तर दुसरीकडे त्याच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल असे इराणने जाहीर केले आहे.
शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी नरसल्लाहचा मृतदेह सापडल्याचे वैद्यकीय आणि सुरक्षा सूत्रांनी रविवारी रॉयटर्सला सांगितले. त्याचे अंत्यसंस्कार कधी केले जातील हे हिजबुल्लाहने अद्याप जाहीर केलेले नाही.
अमेरिकेने लेबनॉनमधील संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे, मात्र वाढत्या संघर्षाचा विचार करून आपले सैन्य या प्रदेशात हजर असेल याचीही काळजी घेतली आहे.
मध्यपूर्वेतील संपूर्ण युद्ध टाळता येईल का, असे विचारले असता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, “ते व्हायलाच हवे”. ते म्हणाले की ते इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी आपण बोलणार आहोत. मात्र त्यांनी यासंदर्भात कोणताही तपशील दिलेला नाही.
सिनेटच्या सशस्त्र सेवा उपसमितीचे अध्यक्ष सिनेटर मार्क केली म्हणाले की, नरसल्लाहला ठार मारण्यासाठी इस्रायलने वापरलेला बॉम्ब म्हणजे अमेरिकेने तयार केलेले 2 हजार पौंडचे (900 किलो) मार्गदर्शित शस्त्र होते.
1980 च्या दशकाच्या सुरुवातीला हिजबुल्लाहच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरसल्लाहच्या सोबत मारल्या गेलेल्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या एका वरिष्ठ सदस्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तर तेहरानने इस्रायलच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आहे.
नरसल्लाच्या हत्येनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले.
अनेक वर्षे दक्षिण लेबनॉनवर कब्जा केलेल्या इस्रायलशी लढण्याच्या नरसल्लाच्या भूमिकेचे कौतुक करणाऱ्या हिजबुल्लाह आणि इतर लेबनॉनच्या समर्थकांनी रविवारी त्याला श्रद्धांजली वाहिली.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गेल्या दोन आठवड्यांत हजारांहून अधिक लेबनी लोक मारले गेले असून 6 हजार जखमी झाले, त्यातले नागरिक किती होते याचा मात्र कुठेही उल्लेख केलेला नाही.
दहा लाख नागरिक- एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश- त्यांची घरे सोडून पळून गेल्याचे सरकारने सांगितले आहे.
या संघर्षामुळे प्रभावित झालेल्यांना अन्न पुरवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने आपत्कालीन मदत सुरू केली आहे.
रविवारी इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमधील प्रक्षेपक आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्यांबरोबरच इतर डझनभर लक्ष्यांवर हल्ला केला आहे, तर इस्रायलच्या नौदलाने लेबनॉनकडून येणारी आठ आणि लाल समुद्रातून येणारे एक अशी एकंदर नऊ क्षेपणास्त्रे अडवली.
इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट म्हणालेः “आमचा संदेश स्पष्ट आहे-आमच्यासाठी कोणत्याही जागी पोहोचणे अशक्य नाही.”