रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये भारताचा दौरा करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अशातच भारतातील रशियाचे माजी राजदूत आणि क्रेमलिनचे सहकारी युरी उशाकोव्ह यांनी या चर्चेला दुजोरा देत, २०२५ पुतिन यांचा भारत दौरा होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरु केले होते. रशिया-युक्रेन युद्धानंतर पुतिन यांची ही पहिलीच भारत भेट असल्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
‘‘भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये प्रतिवर्षी एक बैठक घेण्याचा करार झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला भारत भेटीचे निमंत्रण दिले असून आम्ही नक्कीच याबाबत सकारात्मक विचार करु आणि भारत भेटीविषयी नियोजन करु’’, असे युरी उशाकोव्ह पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
‘’भारत आणि रशिया मधील हा वार्षिक भेटींचा करार दोन्ही देशातील राजकीय संबंध दृढ करतो. मोदी आणि पुतिन यांची भेट ही राजकीय औपचारिकतेच्या पलीकडे असते, त्यांच्यातील परस्पर संबंध हे दोन्ही देशांच्या भवितव्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकतात’, असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शवला.
या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची दोनवेळा भेट झाली होती. रशिया-भारत शिखर परिषदेनिमित्त मोदींच्या दोन दिवसीय मॉस्को भेटीदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती आणि त्यानंतर रशियातील कझान येथे ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये त्यांची दुसऱ्यांदा भेट झाली.
युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अन्य पाश्चात्य देशांसोबतचे रशियाचे संबंध काहीसे तणावपूर्ण झाले आहेत. अनेक राष्ट्रांनी मॉस्कोवर निर्बंध लादले आहेत. मात्र अशा परिस्थीतही भारताने आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली असून, दोन्ही देशातील परस्पर संबंधावर युद्धाचा कोणताही परिणाम होऊ दिला नाहीये. त्यामुळे २०२५ मधील पुतिन यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
पुतिन यांनी २०२१ साली शेवटचा भारत दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
ऐश्वर्या पारीख
(अनुवाद – वेद बर्वे)
रॉयटर्स