2024 मधील शेवटच्या दोन रविवारी Defence Mantra च्या दोन भागांच्या मालिकेतील पहिल्या भागात नितीन ए. गोखले आणि नीलंजना बॅनर्जी यांनी धोरणात्मक भागीदारी, तांत्रिक प्रगती आणि धोरणात्मक सुधारणांसह 2024 मध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्राने झालेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींबद्दल चर्चा केली आहे.
या चर्चेतील काही महत्त्वाचे मुद्दे –
धोरणात्मक भागीदारी आणि करार –
- भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य : ऑक्टोबरमध्ये, भारत आणि अमेरिकेने 31 एमक्यू-9बी प्रिडेटर ड्रोनच्या खरेदीसाठी अंदाजे 32,000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यामुळे भारताची पाळत ठेवण्याची आणि हेरगिरी करण्याची क्षमता वाढेल.
- भारत-जर्मनी संरक्षण सहकार्य : ऑक्टोबरमध्ये, जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी भारताला भेट दिली, ज्यात सहयोगी लष्करी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले गेले.
- भारत -रशिया संरक्षण संबंध : डिसेंबरमध्ये, दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याला अधोरेखित करत, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मॉस्को येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली.
- पंतप्रधान मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी वडोदरा येथे भारताच्या पहिल्या खाजगी लष्करी विमान प्रकल्पाचे उद्घाटन केले, ज्यामुळे नवी दिल्लीच्या संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगांमध्ये स्थानिक उत्पादन वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षांना चालना मिळाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स या उत्पादन केंद्राचा शुभारंभ केला. एअरबस स्पेनच्या सहकार्याने एअरबस सी-295 वाहतूक लष्करी विमानाचे उत्पादन या ठिकाणी करण्यात येईल आणि भारतीय हवाई दलाद्वारे त्याचा उपयोग केला जाईल.
केवळ पाकिस्तान आणि चीनच नव्हे, तर आता आपल्याला बांगलादेशच्याही शत्रुत्वाचा सामना करावा लागणारा आहे, ही वस्तुस्थिती अधोरेखित करत, अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन आक्रमक पाणबुड्यांच्या बांधकामाला भारताने दिलेल्या मंजुरीचा उल्लेख नितीन गोखले यांनी केला. याशिवाय इतर संरक्षण मंचांना लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
धोरणात्मक सुधारणांच्या बाबतीत, भारताने अंगीकारलेल्या ‘आत्मनिर्भरता’ साठी समर्पित प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची संरक्षण निर्यात वाढून 6 हजार 915 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाच्या दिशेने देशाचे सुरू असणारे प्रयत्न त्यातून प्रतिबिंबित होतात.
संरक्षण खरेदीसाठी देशांतर्गत खाजगी कंपन्यांवर अधिक अवलंबून राहण्याचे आवाहन केले जात आहे, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी संरक्षण उत्पादनात कार्यक्षमता आणि नावीन्य वाढविण्यासाठी धोरणात्मक सुधारणांचे समर्थन केले आहे.
या घडामोडी धोरणात्मक भागीदारी, तांत्रिक नवकल्पना आणि संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग याद्वारे आपली संरक्षण क्षमता वाढवण्याची भारताची बांधिलकी अधोरेखित करतात.
टीम भारतशक्ती