उत्तर भारतातील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, किमान 7 जणांचा मृत्यू

0
महाकुंभ मेळ्यात
प्रयागराज किंवा पूर्वीचे अलाहाबाद येथे 29 जानेवारी 2025 रोजी कुंभमेळ्यातील दुसऱ्या शाही स्नानाच्या (भव्य स्नान) आधी चेंगराचेंगरी झाल्यानंतर सुरक्षा कर्मचारी एखाद्या व्यक्तीला मदत करताना. (रॉयटर्स/शराफत अली)

 

उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळ्यात बुधवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सात जणांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत सुमारे 10 जण जखमी झाले आहेत, मौनी अमावस्येनिमित्त लाखो लोक गंगा नदीत पवित्र स्नानासाठी इथे जमले होते.

महा कुंभमेळ्यातील सर्वात शुभ दिवसाच्या निमित्ताने पवित्र स्नान किंवा डुबकीसाठी पहाटेच्या अंधारात लाखो भाविकांची गर्दी रेटारेटी करत इच्छित स्थळी पोहोचताना ड्रोन फुटेजमध्ये दिसले.

चेंगराचेंगरीनंतरच्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये मृतदेह स्ट्रेचरवरून नेताना तसेच जमिनीवर बसून लोक आक्रोश करत असल्याचे दिसून आले. चेंगराचेंगरीतून सुटण्याचा प्रयत्न करताना लोकांच्या हातून सुटलेल्या वस्तूंचा सडा रस्त्यावर दिसून आला. या वस्तू पायदळी तुडवत लोक सैरावैरा धावत होते.

जिथे ही घटना घडली त्यावेळी नदीकाठी डझनभर रुग्णवाहिकांचा पाठलाग करताना रॉयटर्सच्या एका साक्षीदाराने अनेक मृतदेह पाहिल्याचे सांगितले.

कारण अजूनही गुलदस्त्यात

अधिकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक वेळेनुसार पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास (1930 GMT.) झालेली सुरुवातीची चेंगराचेंगरी “गंभीर नव्हती”, परंतु त्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

मात्र, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या चेंगराचेंगरीतून सुटण्याचा प्रयत्न करणारे भक्त बाहेर पडण्याच्या मार्गावर झालेल्या दुसऱ्या चेंगराचेंगरीत अडकले. त्यानंतर ते बाहेर पडण्याचा आणखी एखादा मार्ग शोधत ते तात्पुरत्या उभारलेल्या पुलांकडे गेले, मात्र अधिकाऱ्यांनी ते बंद केल्याचे त्यांना आढळले.

“मी अनेक लोकांना गर्दीत खाली पडताना आणि इतरांच्या पायदळी तुडवले जाताना पाहिले. अनेक मुले आणि स्त्रिया हरवून मदतीसाठी ओरडत होत्या,” असे केवळ आपले आडनाव सांगणाऱ्या आणि आर्थिक राजधानी मुंबईहून या उत्सवासाठी प्रवास करून तिथे पोहोचलेल्या रवीनने स्पष्ट केले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संकटकाळात बोलावले जाणारे रॅपिड एक्शन फोर्स (आरएएफ) हे विशेष पथक तैनात करण्यात आले असून बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आणि ‘तात्काळ मदतीसाठी उपाययोजना’ करण्याचे आवाहन केले.

जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा

जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या या हिंदू मेळ्याला दोन आठवड्यांपूर्वी सुरुवात झाल्यापासून सुमारे 14 कोटी 80 लाख लोकांची उपस्थिती नोंदवली गेली आहे. त्यामुळे दररोज इथे प्रचंड गर्दी होत आहे.

144 वर्षांनंतर आकाशातील ग्रहांच्या दुर्मिळ एका रेषेत येण्याच्या योगानंतर सर्वात शुभ मानला जाणाऱ्या पवित्र स्नानासाठी बुधवारी प्रयागराजमध्ये विक्रमी 10 कोटी लोकांची गर्दी होईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

हिंदूंचा असा विश्वास आहे की पौराणिकदृष्ट्या गंगा, यमुना आणि अदृश्य असणाऱ्या सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर डुबकी मारल्याने पापांपासून मुक्ती मिळते तसेच जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मोक्ष मिळतो.

या घटनेनंतर ‘शाही स्नान’ बंद करण्यात आले.

जेव्हा आम्हाला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आमचे सर्व संत आणि साधू स्नानासाठी तयार होते. त्यामुळे आम्ही ‘स्नान’ न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तपस्वी रवींद्र पुरी म्हणाले.

वाढीव सुरक्षा आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच विशेष गाड्या आणि बसेससह अधिकाऱ्यांनी प्रचंड गर्दीचे नियोजन  करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी एआय सॉफ्टवेअरचा देखील वापर करण्यात आला.

याआधी 2013 मधील कुंभमेळ्यातील सर्वात शुभ दिवशी अशाच प्रकारची चेंगराचेंगरी झाली होती, ज्यात किमान 36 यात्रेकरू ठार झाले, ज्यात बहुतांश महिला होत्या.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)

+ posts
Previous articleAero India 2025 मध्ये मल्टी-डोमेन प्रणालीचे दमदार प्रदर्शन
Next articleभारतीय लष्कराचा ‘ओडिशा स्टार्टअप’ सोबत, प्रगत ड्रोन्ससाठी विशेष करार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here