HAL 2025 च्या अखेरीस Tejas Mk – 1A या हलक्या लढाऊ विमानांचे (LCA) वितरण सुरू करणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष डी. के. सुनील यांनी दिली. तोपर्यंत पहिली 11 विमाने तयार होणे अपेक्षित आहे, ज्यांना आधीच विलंब झाला असला तरी आता त्यात लक्षणीय प्रगती सुरू आहे.
बेंगळुरू येथे सुरू असणाऱ्या एरो इंडियामध्ये बोलताना सुनील यांनी जाहीर केले की अमेरिकन एरोस्पेसमधील दिग्गज कंपनी जीई मार्च 2025 पासून एफ 404 इंजिनांचा पुरवठा सुरू करणार असून पहिली 12 इंजिने यावर्षी वितरीत करण्याचे नियोजन झाले आहे. “जीईने एफ 404 इंजिनसाठी त्याची उत्पादन प्रक्रिया स्थिर केली आहे. पूर्वीच्या सौद्यांमधील राखीव इंजिने वापरून आम्ही आधीच तीन विमाने तयार केली आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस, 11 Tejas Mk – 1A तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.
11 Tejas Mk – 1A च्या वितरणाला आधीच एक वर्ष उशीर झाला आहे. इंजिन पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे पूर्वी विलंब झाला होता, परंतु जीईने आम्हाला आश्वासन दिले आहे त्यामुळे आता उत्पादनचे वेळापत्रक पुन्हा रुळावर आले आहे, असे एचएएलच्या प्रमुखांनी सांगितले. “आम्ही सुरुवातीच्या आव्हानांवर मात केली आहे आणि आता पूर्ण गतीने काम करत आहोत. सध्याच्या क्रमानुसार सर्व 83 Tejas Mk – 1A विमाने 2031-32 पर्यंत वितरित केली जातील,” असेही सुनील पुढे म्हणाले.
“आम्ही ही विमाने तयार करण्यास सुरुवात केली आहे. इंजिन पुरवठ्याबाबत आम्हाला धक्का बसला होता, परंतु आता जीईने आम्हाला आश्वासन दिले आहे की यापुढे असे होणार नाही. ते आम्हाला या वर्षी 12 इंजिने देतील आणि सध्याच्या कामानुसार सर्व 83 Tejas Mk – 1A 2031-32 पर्यंत वितरित केली जातील,” असे ते म्हणाले.
अडथळ्यांनंतरही Tejas Mk – 1A ची प्रगती
एरो इंडिया दरम्यान उड्डाण केलेली पहिली तीन Tejas Mk – 1A विमाने ‘ब श्रेणी’ इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखीव इंजिनांनी उडवली जात होती. पूर्वीच्या जीई करारात नमूद न करता वापरलेली ही इंजिने होती. सुनील यांनी स्पष्ट केले की, “आता जीईने ठराविक कालावधीत इंजिन वितरण होईल हे सुनिश्चित केले आहे, त्यामुळे आमचा अनुशेष दूर होईल आणि भारतीय हवाई दलाला (आयएएफ) लवकरच त्यांचे वितरण सुरू होईल.”
HAL आणि GE यांच्यात 2021मध्ये झालेल्या करारानुसार, ही अमेरिकन कंपनी मार्च 2023 पासून 99 इंजिने वितरित करणार होती. जी HAL च्या वार्षिक 16 विमानांच्या उत्पादन वेळापत्रकाशी सुसंगत होती. मात्र, पुरवठ्यात व्यत्यय आल्याने इंजिनच्या वितरणाला विलंब झाला. जीई ने आता HAL च्या कालमर्यादेची पूर्तता करण्यासाठी इंजिन वितरणाला गती देण्याचे वचन दिले आहे.
F414 इंजिन करार
जीईच्या प्रगत F414 इंजिनांच्या संयुक्त उत्पादनाबाबत भारतात चर्चा सुरू आहे. ही इंजिने आगामी Tejas Mk -2 आणि प्रगत मध्यम लढाऊ विमानांसाठी (AMCA) महत्त्वपूर्ण आहेत. तंत्रज्ञान हस्तांतरणासह (टीओटी) अटींना अंतिम रूप देण्यासाठी अमेरिकेचे एक शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस भारताला भेट देणार असल्याच्या वृत्ताला सुनील यांनी दुजोरा दिला.
“या करारामध्ये 80 टक्के तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे. मात्र HAL केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित रेखाचित्रे स्वीकारण्याऐवजी संपूर्ण तांत्रिक ज्ञानासाठी प्रयत्न करत आहे. टीओटी आराखड्याला अंतिम रूप मिळाल्यानंतर खर्चासंबंधीच्या वाटाघाटी होतील,” असे ते म्हणाले.
F 414 इंजिन, त्याची उत्कृष्ट शक्ती आणि कार्यक्षमतेसह, भारताच्या पुढच्या पिढीतील लढाऊ विमानांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. या भागीदारीमुळे संरक्षण उत्पादनात भारताची आत्मनिर्भरता लक्षणीयरीत्या वाढेल.
HAL कडे 2030 पर्यंत ऑर्डर्स आरक्षित
HALकडे सध्या 1.20 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचं बुकिंग आहे आणि पुढील वर्षात या करारांमध्ये आणखी 1 लाख कोटी रुपयांच्या करारांची जोड मिळेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. या नवीन सौद्यांमध्ये आणखी 97 Tejas Mk -2 विमाने आणि 156 हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स (एलसीएच) प्रचंड यांच्या मागणीचा समावेश आहे, ज्यावर पुढील सहा महिन्यांत स्वाक्षऱ्या होणे अपेक्षित आहे. या करारांचे एकूण मूल्य 1.3 लाख कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
“आमची उत्पादन क्षमता सध्या वर्षाला 24 विमाने इतकी आहे आणि भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याचे प्रमाण वाढवण्यास तयार आहोत,” असे सुनील म्हणाले. नवीन ऑर्डर HAL च्या वचनबद्धतेला 2030 पर्यंत चांगल्या प्रकारे घेऊन जातील, ज्यामुळे येणाऱ्या वर्षांसाठी भरघोस उत्पादन वेळापत्रक सुनिश्चित व्हायला मदत होईल.
इंजिन तंत्रज्ञानातील प्रगती आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासह, स्वदेशी संरक्षण उत्पादनावर भारताचा वाढता भर आणि जागतिक एरोस्पेस हब बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा, हे Tejas Mk -2 चा कार्यक्रम अधोरेखित करतो.
रवी शंकर