आता प्रतिक्षा इस्रायलच्या सर्वात लहान ओलिसांचे मृतदेह सोपवण्याची

0

 

7 ऑक्टोबर 2023 रोजीच्या हल्ल्यादरम्यान हमासने ताब्यात घेतलेल्या सर्वात लहान ओलिसांपैकी एक आणि त्या दिवसाच्या विध्वंसातील प्रतीकांपैकी एक असलेल्या लहानशा काफिर बिबास आणि त्याचा चार वर्षांचा भाऊ एरियल यांचे मृतदेह ताब्यात घेण्याची इस्रायलने गुरुवारी तयारी केली.

पॅलेस्टिनी दहशतवादी गटांनी सांगितले की, अमेरिकेच्या पाठिंब्याने आणि कतार तसेच इजिप्तच्या मध्यस्थीने गेल्या महिन्यात झालेल्या गाझा युद्धविराम कराराअंतर्गत, दोन मुले आणि त्यांची आई शिरी बिबास आणि चौथा ओलिस ओडेड लिफशिट्झ यांचे मृतदेह गुरुवारी इस्रायलला सुपूर्द केले जातील.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका संक्षिप्त व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की गुरुवार हा “इस्रायलसाठी अतिशय कठीण दिवस असेल. एक अस्वस्थ करणारा दिवस, दुःखाचा दिवस.”

सर्वात लहान ओलिस

7 ऑक्टोबर रोजी गाझामधून हमासच्या नेतृत्वाखालील हल्लेखोरांनी काबीज केलेल्या गाझाजवळच्या समुदायांपैकी एक असलेल्या किबुट्झ निर ओझ येथे, वडील यार्डन यांच्यासह बीबास कुटुंबाचे अपहरण झाले तेव्हा केफिर बीबास नऊ महिन्यांचा होता.

नोव्हेंबर 2023 मध्ये हमासने सांगितले की इस्रायली हवाई हल्ल्यात मुले आणि त्यांची आई ठार झाली होती, परंतु इस्रायली अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला नाही. शेवटच्या क्षणीही काहींनी ते मृत असल्याचे मान्य करण्यास नकार दिला.

“शिरी आणि मुले हे या युद्धाचे एक प्रतीक बनले”, निर ओझ येथील रहिवासी यिफ्ताच कोहेन म्हणाले. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात या भागातून सुमारे एक चतुर्थांश रहिवासी एकतर मारले गेले किंवा त्यांचे अपहरण केले. “मला अजूनही आशा आहे की ते जिवंत असतील”.

यार्डन बिबास या महिन्यात ओलिसांच्या बदल्यात कैद्यांची सुटका झालेल्या देवाणघेवाणीद्वारे परत आला. पण या आठवड्यात मुलांचे आणि त्यांच्या आईचे काय झाले याची अंतिम बातमी मिळेपर्यंत त्यांचा “प्रवास संपलेला नाही” असे कुटुंबीयांनी सांगितले.

ओलिसांचे मृतदेह येण्याची ही पहिलीच वेळ

सध्याच्या कराराअंतर्गत ओलिसांचे मृतदेह परत पाठवण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे संपूर्ण डीएनए तपासणी होईपर्यंत इस्रायलने त्यांच्या ओळखीची पुष्टी करणे अपेक्षित नाही.

दोन्ही बाजूंनी युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचे आरोप होऊनही,  इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैदी आणि गाझामधील  ओलिसांच्या देवाणघेवाणीच्या मालिकेतील पहिल्या टप्प्यापासून 19 जानेवारीपासून लागू झालेला हा करार  कायम आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना या कराराला सहमती दर्शविल्याबद्दल त्यांच्या अति-उजव्या आघाडीतील मित्रपक्षांकडून टीकेचा सामना करावा लागला आहे. इस्रायलमधील काहींच्या मते हा करार म्हणजे हमासला दिले गेलेले बक्षीस तर काहींना गाझामधील दहशतवादी गट हमासला देण्यात आलेली माफी वाटते.

मात्र लागोपाठ करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार  युद्धविरामाला जनतेने व्यापक पाठिंबा दर्शविला आहे. उर्वरित सर्व बंधक परत येईपर्यंत सरकारने या कराराला चिकटून राहण्याची मागणी करण्यासाठी हजारो इस्रायली रस्त्यावर उतरले आहेत.

इस्रायली आकडेवारीनुसार, हमासच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्ल्यात सुमारे 1 हजार 200 नागरिक ठार झाले आणि 251 लोकांचे अपहरण झाले. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत आपले युद्ध सुरू केले. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली लष्करी मोहिमेत सुमारे 48 हजार लोक मारले गेले आहेत आणि दाट लोकवस्ती असलेला गाझाचा भाग आता भग्नावस्थेत आहे.

जिवंत ओलिस

गुरुवारी मृतदेह सुपूर्द केल्यानंतर शनिवारी सहा जिवंत ओलिसांची सुटका केली जाईल, त्या बदल्यात आणखी शेकडो पॅलेस्टिनी महिला आणि अल्पवयीन मुले, ज्यांना युद्धादरम्यान गाझामध्ये इस्रायली सैन्याने ताब्यात घेतले आहे अशांची सुटका केली जाईल.

युद्धबंदी करारानुसार, गाझामधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेने मार्ग उघडण्याच्या उद्देशाने कराराच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 2 हजार पॅलेस्टिनी कैदी आणि त्या बदल्यात 33 ओलिसांची सुटका करण्यास हमासने सहमती दर्शवली होती.

आतापर्यंत 19 इस्रायली ओलिस आणि पाच थाई नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. थाई नागरिकांची सुटका हस्तांतरण करारात निर्धारित केलेले नव्हते.

दुसऱ्या टप्प्यातील वाटाघाटी

दुसऱ्या टप्प्यातील वाटाघाटींमध्ये सुमारे 60 उर्वरित ओलिसांच्या सुटकेचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. मात्र यात निम्म्याहून कमी जिवंत असल्याचे मानले जात असून युद्ध संपवण्यासाठी गाझा पट्टीतून इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार, येत्या काही दिवसांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

करार होण्याची शक्यता अनिश्चित आहे, मात्र, गाझाच्या भविष्यातील प्रशासनासह इतर मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झालेले नाही. इस्रायलने म्हटले आहे की हमास किंवा पाश्चिमात्य समर्थित पॅलेस्टिनी प्राधिकरणाद्वारे गाझातील सरकार चालवले जाऊ शकत नाही.

पॅलेस्टिनींचे गाझाबाहेर पुनर्वसन करण्याच्या अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनामुळे देखील हा मुद्दा अजूनही अस्पष्टच आहे. टीकाकारांचे मते हे पाऊल युद्ध गुन्हे आणि वांशिक शुध्दीकरण ठरेल आणि एन्क्लेव्हला अमेरिकेच्या नियंत्रणाखाली वॉटरफ्रंट मालमत्ता म्हणून विकसित केले जाईल.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here