भारत-ईयू संशोधन भागीदारी बळकट करणे आणि स्वच्छ ऊर्जा, पाणी, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि हवामान बदल संशोधन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील नवकल्पनांना चालना देणे हा या बैठकीचा उद्देश होता.
भारत आणि युरोपियन अधिकाऱ्यांच्या नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत क्वांटम कॉम्प्युटिंग, जैव-अर्थव्यवस्था, हरित हायड्रोजन, सागरी अर्थव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्स आणि बॅटरी तंत्रज्ञान, उच्च-कार्यक्षम संगणकीय आणि जबाबदार एआययासारख्या क्षेत्रातील भविष्यातील संधींचा शोध घेण्यात आला.
भारत सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयात विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्याबाबत भारत-युरोपियन युनियनच्या (ईयू) बैठकीत ही चर्चा झाली.
भारत सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, “युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित विविध क्षेत्रीय बैठकांचा हा एक भाग होता.”
या बैठकीच्या सह-अध्यक्षस्थानी भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद आणि स्टार्टअप, संशोधन आणि नवकल्पनांसाठी ईयूचेआयुक्त एकातेरिना झहरीवा होते.
बैठकीचा उद्देश
भारत-ईयू संशोधन भागीदारी बळकट करणे आणि स्वच्छ ऊर्जा, पाणी, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि हवामान बदल संशोधन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नवकल्पनांना चालना देणे हा या बैठकीचा उद्देश होता.
चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी दीर्घकालीन भारत-युरोपियन युनियन विज्ञान आणि तंत्रज्ञान कराराला मान्यता दिली, ज्यावर मुळात 2001 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या आणि 2015 तसेच 2020 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. या कराराला आता 2025-2030 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
भारत-ईयू संशोधन सहकार्य
जलसंपदा व्यवस्थापन, स्मार्ट ग्रिड, स्वच्छ ऊर्जा, लस विकास आणि हवामान बदल आणि ध्रुवीय संशोधनात संशोधन सहकार्याला चालना देण्यात या भागीदारीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या बैठकीत सांडपाणी प्रक्रिया, लसीच्या नवकल्पना आणि खोल समुद्रातील शोध यामधील महत्त्वपूर्ण कामगिरी अधोरेखित करण्यात आली, जी दोन्ही प्रदेशांमधील सहकार्याची प्रमुख क्षेत्रे म्हणून उदयाला आली आहेत.
स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीमध्ये जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या वेगाने वाढणाऱ्या नाविन्यपूर्ण परिसंस्थेला या सहकार्यामागील प्रेरक शक्ती म्हणून मान्यता देण्यात आली.
“नवीकरणीय ऊर्जा, बायोफार्मास्युटिकल्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोमॅन्युफॅक्चरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी इत्यादींमधील भारताच्या उदयोन्मुख कौशल्यावरही चर्चा केंद्रित होती,” असे निवेदनात म्हटले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएस)