चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्या 4 ते 7 मार्च या कालावधीत झालेल्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण आस्थापनांशी भारताचे धोरणात्मक संवाद आणि लष्करी संबंध मजबूत झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर, हा दौरा इंडो-पॅसिफिकमधील प्रादेशिक सुरक्षा सहकार्य आणि लष्करी सहकार्य बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
जनरल चौहान यांनी ऑस्ट्रेलियाचे संरक्षणदल प्रमुख ॲडमिरल डेव्हिड जॉन्स्टन आणि चीफ ऑफ स्टाफ कमिटी यांच्याशी सागरी सुरक्षा वाढवणे, संयुक्त सराव, क्षमता बांधणी, संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि नवीन द्विपक्षीय संरक्षण उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विस्तृत चर्चा केली.
हेडक्वार्टर, जॉइंट ऑपरेशन्स कमांड (एचक्यूजेओसी), येथे जनरल चौहान यांनी ऑस्ट्रेलियाच्या ऑपरेशनल कमांड स्ट्रक्चर्सचा अभ्यास केला आणि संयुक्त ऑपरेशन्समध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणते मार्ग अवलंबता येतील यावर चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियन लष्कराच्या फोर्स कमांड मुख्यालय आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीच्या फ्लीट मुख्यालयाला दिलेल्या भेटींचा देखील समावेश होता. या ठिकाणी त्यांनी सागरी सुरक्षा आणि धोरणात्मक मोहिमांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, या चर्चेतून इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिरता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सामायिक वचनबद्धता अधोरेखित होते.
व्यावसायिक लष्करी प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी भारताच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, जनरल चौहान यांनी ऑस्ट्रेलियन संरक्षण महाविद्यालयाला भेट दिली, आणि या महाविद्यालयाचे कमांडंट रिअर ॲडमिरल जेम्स लायब्रँड यांच्याशी व्यावसायिक लष्करी शिक्षण वाढवण्याबाबत चर्चा केली. जनरल चौहान यांनी भारत – प्रशांत क्षेत्रातील धोरणात्मक आव्हानांवर संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास या विषयावरील अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित केले. ऑस्ट्रेलियन संरक्षण महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला, तसेच द्विपक्षीय लष्करी समज आणि व्यावसायिक देवाणघेवाण वाढविण्यात या प्रशिक्षणार्थींच्या भूमिकेची प्रशंसा केली.
बौद्धिक आणि धोरणात्मक देवाणघेवाण पुढे नेत, सीडीएस जनरल चौहान यांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख थिंक टँक असलेल्या लोवी इन्स्टिट्यूटमध्ये गोलमेज चर्चेचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी एअर चीफ मार्शल (निवृत्त) सर अँगस ह्युस्टन तसेच प्रसिद्ध धोरण तज्ज्ञ डॉ. मायकेल फुलिलोव्ह आणि सॅम रोगवीन यांच्याशी चर्चा करून भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्य, बहुपक्षीय सुरक्षा आराखडा आणि भारत -प्रशांत क्षेत्रातील धोरणात्मक एककेंद्राभिमुखता याबाबतच्या मौल्यवान दृष्टिकोनांची देवाणघेवाण केली.
याशिवाय, त्यांना प्रगत नेव्हिगेशन प्रणालीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी युद्धभूमीबद्दलची जागरुकता, अचूक लक्ष्य निर्धारण आणि जटिल कार्यान्वयन वातावरणात परिस्थितीजन्य जागरूकता वाढवणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले. जनरल चौहान यांनी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या संरक्षण उद्योग सुविधांनाही भेट दिली, तसेच ऑस्ट्रेलियाचे प्रगत संरक्षण उत्पादन, संशोधन आणि विकास आणि तांत्रिक नवोन्मेषाबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली.
या भेटीमुळे भारत – ऑस्ट्रेलिया संरक्षण भागीदारी आणखी दृढ झाली, परस्पर विश्वास आणि सामंजस्य वाढले तसेच भारत – प्रशांत क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक हितसंबंधांच्या वाढत्या एककेंद्राभिमुखतेला बळकटी दिली.
टीम भारतशक्ती