रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात झाल्यापासून युक्रेनने मॉस्कोवर आजवरचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. मंगळवारी पहाटे युक्रेनने रशियाच्या राजधानी मॉस्कोवर भीषण ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये किमान एक व्यक्ती ठार झाल्याचे, जागोजागी आग लागल्याचे आणि या प्रदेशातील हवाई तसेच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त, एका संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेे.
“आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास, मॉस्को प्रदेशावर मोठा ड्रोन हल्ला सुरू झाला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत,” असे मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, “शहराच्या दिशेने, एकामागून एक लाटांसारखे येत असलेले किमान 69 ड्रोन्स नष्ट करण्यात आले.”
सुमारे 2.1 कोटी लोकसंख्या असलेले मॉस्को आणि त्याच्या आसपासचे क्षेत्र, इस्तंबूलसह युरोपमधील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे.
रशियाच्या विमान निगराणी संस्थेने सांगितले की, “हल्ल्यांनंतर हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मॉस्कोच्या चारही विमानतळांवरील उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. मॉस्कोच्या पूर्वेकडील यारोस्लाव्हल आणि निझनी नोव्हगोरोड या प्रदेशातील इतर दोन विमानतळांवरील वाहतूकही त्वरित बंद करण्यात आली आहेत.”
क्रेमलिनच्या आग्नेयेस सुमारे ५० किमी (३१ मैल) अंतरावर असलेल्या, मॉस्कोच्या रामेन्स्कोये जिल्ह्यातील एका बहुमजली इमारतीमधील किमान सात अपार्टमेंटचे नुकसान झाले असून, रहिवाशांना स्थलांतर करण्याच्या काम सुरु असल्याचे, मॉस्कोचे गव्हर्नर व्होरोब्योव्ह यांनी सांगितले.
मॉस्कोपासून सुमारे ३५ किलोमीटर दक्षिणेकडे असलेल्या, डोमोडेडोवो जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावरील, रेल्वे पायाभूत सुविधा ड्रोनच्या ढिगाऱ्याखाली आल्याने खराब झाल्याचे वृत्त, RIA वृत्तसंस्थेने दिले आहे.
रशियाच्या सुरक्षा सेवांशी जवळीक असलेल्या, बाझा या न्यूज टेलिग्राम चॅनेलने आणि इतर काही रशियन न्यूज टेलिग्राम चॅनेलने, मॉस्कोभोवती विविध भागांत लागलेल्या आगींचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यात त्यांनी या आगी ड्रोन हल्ल्यामुळे लागल्या असल्याचा दावा केला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये, रशियाने युक्रेनवर आक्रमण करून सुरू केलेल्या युद्धाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. दीर्घकाळ सुरु असलेल्या युद्धाचा अंत करण्यासाठी, अमेरिका प्रयत्न करत असतानाच हे हल्ले झाल्यामुळे, मंगळवारी अमेरिका आणि युक्रेनियन संघ सौदी अरेबियामध्ये शांतता चर्चेसाठी भेटणार आहेत.
मॉस्को प्रदेशाच्या आग्नेयेस असलेल्या रियाझान प्रदेशाच्या आणि युक्रेनच्या सीमेवर असलेल्या बेल्गोरोड प्रदेशाच्या राज्यपालांनीही, त्यांच्या प्रदेशांवर ड्रोन हल्ले झाल्याचे सांगितले. या हल्ल्यांमुळे बेल्गोरोड प्रदेशातील अनेक वस्त्यांवर वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे, प्रादेशिक राज्यपालांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात मॉस्कोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे, जो त्या क्षणीचा युद्धातील सर्वात मोठा हल्ला होता, त्यात किमान 34 ड्रोन नष्ट झाले होते. त्या हल्ल्यात किमान एका नागरिकाचा मृत्यू झाला होता आणि राजधानीच्या आसपास अनेक घरांचे नुकसान झाले होते.
कीव यांनी नेहमीच असा दावा केला आहे की, “रशियामध्ये केलेले हल्ले मॉस्कोच्या युद्धाच्या एकूण प्रयत्नांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांचा नाश करण्यासाठी आणि रशियाच्या युक्रेनवर होणाऱ्या सततच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून केले जात आहेत.”
दरम्यान दोन्ही बाजू हल्ल्यामध्ये नागरिकांना लक्ष्य करण्याचा मुद्दा नाकारतात, परंतु आतापर्यंत या संघर्षात हजारो नागरिक मरण पावले आहेत, त्यापैकी बहुसंख्य लोक हे युक्रेनचे असल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)