
10 हजारांहून अधिक भारतीय नागरिक सध्या विविध परदेशी तुरुंगात असून त्यापैकी 49 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली.
सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक 2 हजार 633 भारतीय कैदी आहेत, तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यु. ए. ई.) 2 हजार 518 कैदी आहेत.
परदेशी तुरुंगात असलेल्या भारतीयांसह परदेशातील भारतीयांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, यावर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी भर दिला.
ते म्हणाले की, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची कार्यालये अशा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी सक्रियपणे संवाद साधतात. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययूएमएल) खासदार अब्दुल वहाब यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंग यांनी ही माहिती दिली.
मंत्र्यांच्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या क्रमांकावर नेपाळ असून तिथे 1 हजार 317 भारतीय कैदी आहेत. त्यानंतर कतार (611), कुवेत (387), मलेशिया (338), पाकिस्तान (266), चीन (173), अमेरिका (169), ओमान (148), आणि रशिया तसेच म्यानमारमध्ये प्रत्येकी 27 भारतीय कैदी आहेत.
फाशीची शिक्षा
अहवालात असेही उघड झाले आहे की 2020 पासून कुवेतने 25 भारतीयांना फाशी दिली आहे, जी शिक्षा भोगणाऱ्या देशांमधील सर्वाधिक संख्या आहे.
त्यानंतर सौदी अरेबियाने नऊ, झिम्बाब्वेने सात, मलेशियाने पाच आणि जमैकाने एका भारतीय कैद्याला फाशी दिल्याची नोंद आहे.
यूएईने फाशी दिलेल्यांची आकडेवारी उघड केलेली नाही परंतु 2020 ते 2024 दरम्यान कोणत्याही भारतीयाला फाशी देण्यात आलेली नाही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील एक परिचारिका आणि केरळमधील एका व्यक्तीसह तीन भारतीयांना फेब्रुवारी 2024 मध्ये तेथे फाशी देण्यात आली.
सध्या फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 49 भारतीयांपैकी संयुक्त अरब अमिरातीमध्ये 25, सौदी अरेबियामध्ये 11, मलेशियामध्ये सहा आणि कुवेतमध्ये तीन भारतीय आहेत. याव्यतिरिक्त, इंडोनेशिया, कतार, अमेरिका आणि येमेनमध्ये प्रत्येकी एका भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मायदेशी आणण्याचे प्रयत्न
परदेशी तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा सरकारने पुनरुच्चार केला.
कायदेशीर कार्यवाही आणि तपासाला गती देण्यासाठी राजनैतिक अधिकारी नियमितपणे स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधतात. याव्यतिरिक्त, भारतीय कैद्यांना कॉन्सुलर प्रवेश, कायदेशीर मदत आणि अपील किंवा दया याचिका दाखल करण्यासाठी सहाय्य प्रदान केले जाते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)