ट्रम्प चर्चेनंतर गाझा युद्धविराम करार पुढे सरकेल : नेतान्याहू

0

सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या चर्चेमुळे गाझा युद्धबंदी आणि ओलिसांची सुटका यांच्यासंदर्भातील वाटाघाटी पुढे नेण्यास मदत होईल असा विश्वास इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांनी आठवडाभरात संभाव्य करार होण्याची शक्यता वर्तवली आहे.

रविवारी दोहा येथे पुन्हा सुरू झालेल्या युद्धबंदी चर्चेत सहभागी झालेल्या इस्रायलकडून वाटाघाटी करणाऱ्यांना इस्रायलने स्वीकारलेल्या अटींवर युद्धबंदी करार साध्य करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत, असे वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी नेतन्याहू यांनी रविवारी सांगितले.

“मला विश्वास आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या चर्चेमुळे याबाबतचा निर्णय निश्चितपणे पुढे सरकण्यास मदत होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले. गाझामध्ये असलेल्या ओलिसांना परत आणण्याची आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासकडून इस्रायलला असलेला धोका दूर करण्याबाबत ते दृढनिश्चयी आहेत.

ट्रम्प सहा महिन्यांपूर्वी सत्तेत परतल्यानंतर नेतन्याहू यांची व्हाईट हाऊसला ही तिसरी भेट असेल.

या आठवड्यात करार होणार?

ट्रम्प म्हणाले की त्यांना विश्वास आहे की या आठवड्यात ओलिसांची सुटका आणि युद्धबंदी यासंदर्भात करार होऊ शकतो, ज्यामुळे “बऱ्याच ओलिसांची” सुटका होऊ शकते.

“मला वाटते की आठवड्यात हमासशी करार होण्याची सर्वोच्च शक्यता आहे,” असे ट्रम्प यांनी न्यू जर्सीमध्ये आठवड्याच्या शेवटी गोल्फ खेळल्यानंतर वॉशिंग्टनला परतण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले.

नेतन्याहू यांच्यावर कायमस्वरूपी युद्धबंदी करणे आणि गाझामधील युद्ध संपवण्यासाठी सार्वजनिक दबाव वाढत आहे, या निर्णयाला त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या युतीतील काही कट्टर सदस्यांनी विरोध केला आहे. परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांच्यासह इतरांनीही पाठिंबा व्यक्त केला आहे.

‘सकारात्मक होकार’

पॅलेस्टिनी गट हमासने शुक्रवारी सांगितले की त्यांनी अमेरिकेच्या पाठिंब्याने गाझा युद्धबंदी प्रस्तावाला “सकारात्मक होकार” कळवला आहे, ट्रम्प यांनी सांगितले की इस्रायलने 60 दिवसांच्या युद्धबंदीला “अंतिम स्वरूप देण्यासाठी आवश्यक अटींवर सहमती दर्शविली आहे.”

परंतु दोन्ही बाजूंसमोरील संभाव्य आव्हानांचे चिन्ह म्हणून, हमासशी संबंधित असलेल्या एका अतिरेकी गटाच्या पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितले की मानवतावादी मदत, दक्षिण इस्रायलमधील रफाह क्रॉसिंगमधून इजिप्तला जाण्याचा मार्ग आणि इस्रायली सैन्याच्या माघारीच्या वेळापत्रकाबाबतची  स्पष्टता याबाबतची चिंता कायम आहे.

सोमवारी सकाळी कतारमध्ये झालेल्या अप्रत्यक्ष हमास-इस्रायल युद्धबंदी चर्चेचे पहिले सत्र अनिर्णीतपणे संपले, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन पॅलेस्टिनी सूत्रांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले आहे की इस्रायली शिष्टमंडळाकडे हमासशी करार करण्यासाठी पुरेसे अधिकार नव्हते.

नेतान्याहू यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की हमासने युद्धबंदी प्रस्तावात केलेले बदल “इस्रायलला मान्य नाहीत”. तथापि, त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की “इस्रायलने मान्य केलेल्या कतारच्या प्रस्तावावर आधारित आमच्या ओलिसांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी” शिष्टमंडळ परत कतारला जाईल.

नेतान्याहू यांनी वारंवार म्हटले आहे की हमास पूर्णपणे नि:शस्त्र झाले पाहिजे, या मागणीवर आतापर्यंत दहशतवादी गटाने चर्चा करण्यास नकार दिला आहे.

नेतान्याहू म्हणाले की त्यांना विश्वास आहे की ते आणि ट्रम्प गेल्या महिन्यात इराणसोबत झालेल्या 12 दिवसांच्या हवाई युद्धाच्या निकालांवर देखील चर्चा करतील आणि तेहरानकडे कधीही अण्वस्त्रे नसतील याची खात्री करण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी सांगितले की मध्य पूर्वेतील अलिकडच्या घडामोडींमुळे शांततेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची संधी निर्माण झाली आहे.

ओलिस

शनिवारी संध्याकाळी, तेल अवीवमधील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाजवळील सार्वजनिक चौकात युद्धबंदी करार आणि गाझामध्ये अजूनही असलेल्या सुमारे 50 ओलिसांना परत आणण्याचे आवाहन करण्यासाठी लोक जमले होते. निदर्शकांनी इस्रायली झेंडे फडकावून, घोषणाबाजी केली तसेच ओलिसांचे फोटो असलेली पोस्टर्स त्यांच्या हातात होती.

दशकांपूर्वीच्या इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षातील नवीनतम रक्तपात 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाला, जेव्हा हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे बाराशे लोक मारले गेले आणि 251 ओलिस ठेवले गेले, असे उपलब्ध इस्रायली आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायलने एन्क्लेव्हवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक लष्करी हल्ल्यात 57 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे, बहुतेक गाझाच्या आत असणारी जनता विस्थापित झाली असून संपूर्ण प्रदेश उद्ध्वस्त झाला आहे.

उर्वरित ओलिसांपैकी सुमारे 20जण अजूनही जिवंत असल्याचे मानले जाते. राजनैतिक वाटाघाटींद्वारे बहुतेक मूळ ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. तर काही ओलिसांची सुटका  इस्रायली लष्कराने केली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनची ताठर भूमिका, तर तिबेटी तरुणांचा दलाई लामा यांच्यावरच विश्वास
Next articleTexas floods: पूरातील मृतांचा आकडा 78 वर, ट्रम्प यांच्या भेटीची योजना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here