एअर इंडिया विमान अपघातापूर्वी कॅप्टन काय म्हणाला?

0
एअर
12 जून 2025 रोजी भारतातील अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच कोसळलेल्या लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भग्नावशेषासमोर एक पोलिस अधिकारी उभा आहे. (रॉयटर्स/अदनान आबिदी/फाईल फोटो) 
गेल्या महिन्यात अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील दोन्ही वैमानिकांमध्ये झालेल्या संभाषणाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले आहे की कॅप्टनने इंजिनांना केला जाणारा इंधन पुरवठा खंडित केला होता, असे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सुरुवातीच्या तपासाशी परिचित असलेल्या एका सूत्राने सांगितले.

फर्स्ट ऑफिसर बोईंग 787 च्या नियंत्रणाखाली होता आणि त्याने कॅप्टनला विचारले की त्याने इंधनाचे स्विचेस अशा स्थितीत का हलवले ज्यामुळे इंजिनांचा इंधन पुरवठा खंडीत झाला. या ऑफिसरने इंधन प्रवाह पूर्ववत करण्याची विनंती केली, असे एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कारण अद्याप हे प्रकरण तपासाधीन आहे.

अमेरिकेचा तपास हा औपचारिक दस्तऐवजात समाविष्ट नसल्याचे असे सूत्राने स्पष्ट केले. या दस्तऐवजात 12 जून रोजी भारतातील अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताचे कारण अधोरेखित करण्यात आले असून 260 लोकांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी अजून सुरू आहे.

सुरुवातीच्या तपासानुसार, कोणत्या पायलटने स्वीच बंद केले हे निश्चितपणे दाखवणारे कोणतेही कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डिंग नसले तरी, संभाषणातील पुरावे कॅप्टनकडे निर्देश करणारे आहेत.

गेल्या दशकभरात जगातील सर्वात प्राणघातक विमान अपघाताबद्दल वॉल स्ट्रीट जर्नलने बुधवारी पहिल्यांदा अशीच माहिती प्रसिद्ध केली आहे.

निष्कर्ष काढणे खूपच लवकर होईल

या अपघाताच्या चौकशीचे नेतृत्व करणाऱ्या भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून काही निवडक भाग आणि खोट्या अहवालांद्वारे वारंवार निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.” त्यांनी असेही म्हटले आहे की तपास सुरू आहे आणि निश्चित निष्कर्ष काढणे हे खूप लवकर होईल.

बहुतेक विमान अपघात अनेक कारणांमुळे होतात आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, अपघाताच्या एका वर्षाच्या आत अंतिम अहवाल अपेक्षित असतो.

AAIB ने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात म्हटले होते की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर एका पायलटने दुसऱ्याला इंधन का कमी केले असे विचारताना ऐकू आले आणि “दुसऱ्या पायलटने आपण असे केले नाही असे उत्तर दिले.”

कॅप्टन सुमित सभरवाल यांचे बोलणे कोणते होते आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी त्यावर कोणती प्रतिक्रिया दिली हे अद्याप तपास करणाऱ्यांना निश्चितपणे कळलेले नाही. सभरवाल यांच्याकडे  एकूण 15 तास 638 मिनीटांचा आणि कुंदर यांच्याकडे  3 तास 403 मिनीटांचा एकूण उड्डाणाचा अनुभव होता.

‘रन’ पासून ‘कटऑफ’ पर्यंत

AAIB च्या प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की टेकऑफनंतर काही सेकंदांच्या आतच इंधन स्विचेस “रन” वरून “कटऑफ” मध्ये हलविले गेले. मात्र ते कसे हलवले गेले हे त्यात सांगितलेले नाही.

विमान जमिनीवरून वर येताच, क्लोज-सर्किट टीव्ही फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाइन नावाचा बॅकअप ऊर्जा स्रोत तैनात झाल्याचे दिसून आले, जे इंजिनमधून इंधन पुरवठा कमी झाल्याचे दर्शविते.

लंडनला जाणाऱ्या विमानाचा उड्डाण जोर कमी झाला आणि 650 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर, जेट परत जमिनीच्या दिशेने यायला लागले.

दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा व्हावा यासाठी स्विचेस “रन” वर परत आणण्यात आले आणि विमानाने आपोआप इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, असे अहवालात म्हटले आहे.

परंतु विमान खूप खाली होते आणि त्याची गतीही मंद होती, त्यामुळे त्याला सावरायला वेळच मिळाला नाही, असे विमान सुरक्षा तज्ज्ञ जॉन नॅन्स यांनी सांगितले.

जवळच्या मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील इमारतीवर जाऊन  आदळण्यापूर्वी विमानाने काही झाडे आणि एक धूर सोडणारी चिमणी तोडली, असे अहवालात म्हटले आहे. या अपघातात सामान्य नागरिकांपैकी 19 जणांचा तर 787 विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला.

सुरक्षाविषयक कोणत्याही शिफारशी नाहीत

सोमवारी एका अंतर्गत निवेदनामध्ये एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, प्राथमिक अहवालात कोणतेही यांत्रिक किंवा देखभालविषयक दोष आढळले नाहीत आणि सर्व आवश्यक देखभाल पूर्ण करण्यात आली आहे.

AAIBच्या प्राथमिक अहवालात बोईंग किंवा इंजिन उत्पादक GE साठी कोणत्याही सुरक्षाविषयक शिफारसींचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि बोईंग यांनी खाजगीरित्या सूचना जारी केल्या की बोईंग विमानांवरील इंधन स्विच लॉक सुरक्षित आहेत, असे एका कागदपत्रात दिसल्याचे आणि या प्रकरणाची माहिती असलेल्या चार सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड एअर इंडियाच्या चौकशीत मदत करत आहे आणि त्यांच्या अध्यक्षा जेनिफर होमंडी यांना सर्व पैलूंबद्दल पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे, असे बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यामध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील सर्व तपशील समाविष्ट आहेत जे वाचण्यासाठी एनटीएसबी टीमने एएआयबीला मदत केली होती, असे प्रवक्त्याने पुढे सांगितले.

“आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाची सुरक्षितता या दुर्मिळ घटनांमधून आपण जितके शिकू शकतो तितके शिकण्यावर अवलंबून आहे जेणेकरून उद्योग आणि नियामक विमान वाहतूक सुरक्षितता सुधारू शकतील,” होमेंडी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. “आणि जर तात्काळ सुरक्षिततेच्या समस्या आढळल्या नाहीत, तर आपल्याला ते देखील जाणून घेणे आवश्यक आहे.”

परिस्थितीजन्य पुरावे असे दर्शवितात की एका क्रू सदस्याने इंजिन इंधन स्विच उलट केले, नॅन्स म्हणाले, कारण आजपर्यंत जाहीर केलेल्या माहितीशी सुसंगत असे “दुसरे कोणतेही तर्कसंगत स्पष्टीकरण” नव्हते.

तरीही, तपासकर्त्यांना “अजूनही सर्व घटकांचा शोध घ्यावा लागेल” आणि वेळखाऊ अशा इतर संभाव्य घटकांना नाकारावे लागेल, असे ते म्हणाले.

एअर इंडियाच्या अपघातामुळे विमानांमध्ये फ्लाइट डेक कॅमेरे, ज्याला कॉकपिट इमेज रेकॉर्डर म्हणून ओळखले जाते, जोडण्याबाबतचा वाद पुन्हा सुरू झाला आहे.

एअर इंडियाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटचे व्हिडिओ फुटेज असते तर त्याचा तपासकर्त्यांना खूप फायदा झाला असता असे नॅन्स म्हणाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia’s 1st Submarine Rescue Diving Support Vessel INS Nistar Commissioned
Next article‘द रेझिस्टन्स फ्रंट’ जागतिक दहशतवादी गट असल्याचे अमेरिकेकडून घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here