मार्कोस यांच्या भारत दौर्‍यामध्ये ‘Akash-1S’ क्षेपणास्त्राची चर्चा केंद्रस्थानी

0

फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर, आज नवी दिल्लीत दाखल झाले असून, येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. संरक्षण सहकार्य हा या बैठकीचा प्रमुख विषय असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः ‘Akash-1S’ (आकाश-1एस) ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या चिनी हस्तक्षेपामुळे मनीलाला आपली संरक्षण क्षमता वाढविण्याची गरज आहे.

संबंधित चर्चांची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, ‘Akash-1S’ क्षेपणास्त्राच्या खरेदीबाबत सध्या सकारात्मक दिशेने चर्चा सुरू आहेत. ही प्रणाली DRDO ने विकसित केली असून, भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) मार्फत उत्पादित केली जाते. हे एक मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (SAM) असून, यामध्ये स्वदेशी सक्रिय रडार साधक (active radar seeker) बसविण्यात आला आहे. ही प्रणाली 30 किमी अंतर आणि 20 किमी उंचीपर्यंत एकाचवेळी अनेक हवाई धोक्यांचा सामना करू शकते.

‘Akash-1S’ ही प्रणाली भारताच्या लढाऊ क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची सिद्ध कामगिरी असलेली परंपरा पुढे चालवत आहे. विशेषतः ऑपरेशन सिंदूर दरम्यान, या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या ‘फतेह-1’ मार्गदर्शित रॉकेटला यशस्वीपणे पाडले, ज्याची श्रेणी 140 किमी होती आणि रडारवर दिसण्याची क्षमता (low radar cross-section) फार कमी होती. भारतीय हवाई दलाने शिल्लक अवशेष सादर करत ही कारवाई सिद्ध केली, ज्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीवर विश्वास वाढला आहे.

‘Akash-1S’ च्या कराराचा अंदाजित खर्च- 230 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे, जो अलीकडे अर्मेनियाला करण्यात आलेल्या समांतर निर्यातीपेक्षा मोठा असेल. चर्चांमध्ये किंमत, रडार प्रणाली, आणि प्लॅटफॉर्म इंटिग्रेशन यांचा समावेश आहे, परंतु दोन्ही देशांनी अद्याप विशिष्ट प्रमाण जाहीर केलेले नाही.

जर हा करार अंतिम झाला, तर तो 2022 मध्ये झालेल्या $375 दशलक्ष ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल करारानंतरचा भारताचा फिलिपीन्ससोबतचा दुसरा मोठा संरक्षण निर्यात करार ठरेल.

BrahMos: दुसरी तुकडी वितरित; आणखी तुकड्या लवकरच

ब्राह्मोस मिसाइल करार अंमलात आणला जात असून, फिलिपीन्स सध्या भारतासोबत त्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेचा विस्तार करण्यासाठी प्रगत चर्चा करत आहे. जुलै 2025 मध्ये भारताने दुसरी तुकडी समुद्रमार्गे फिलिपीन्सला वितरित केली, तर एप्रिल 2024 मध्ये, पहिली तुकडी हवाई मार्गे पाठवण्यात आली होती. संपूर्ण करारात तीन बॅटऱ्या (batteries), प्रशिक्षण आणि देखभाल यांचा समावेश आहे.

भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘ब्राह्मोस’ मिसाइलची गती Mach 2.8 इतकी असून, श्रेणी 290 किमी आहे. ती जमीन, समुद्र, हवा आणि पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून डागता येते, ज्यामुळे ती एक अत्यंत बहुपर्यायी प्रणाली बनते.

सध्या फिलिपीन्स मरीन कॉर्प्स ब्राह्मोस प्रणालीचा वापर करत आहे. जनरल रोमेओ ब्रॉर्नर यांनी सांगितले की, फिलिपीन्स आणखी बॅटऱ्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे भारतासोबतची भागीदारी आणखी दृढ होणार आहे.

इंडो-पॅसिफिक भागातील संरक्षण सहकार्य दृढ होत आहे

हे संरक्षण सहकार्य दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाचे ठरते, जिथे चीनच्या वाढत्या दाव्यांमुळे फिलिपीन्सने आपल्या संरक्षण भागीदारांना अधिक विविध करणे आवश्यक मानले आहे. भारत हा आता एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास येत आहे.

कधीकाळी जगातील सर्वात मोठा ‘शस्त्र आयातदार’ असलेला भारत, आता धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संरक्षण निर्यातदार बनू लागला आहे. 2023–24 मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत 150% वाढ होऊन ती $2.4 अब्जवर पोहोचली. सरकारने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत 2029 पर्यंत ₹3 लाख कोटी (सुमारे $36 अब्ज) संरक्षण उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे.

नवी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकींमध्ये जर ‘Akash-1S’ खरेदी करारावर स्वाक्षरी झाली, तर तो एक प्रतीकात्मक आणि धोरणात्मक टप्पा ठरेल. यामुळे केवळ इस्रायली स्पायडर प्रणालींवर अवलंबून असलेल्या फिलीपिन्सच्या स्तरित हवाई संरक्षण प्रणालीला बळकटी मिळेल असे नाही, तर अत्याधुनिक, युद्ध-सिद्ध तंत्रज्ञान प्रदान करण्याच्या भारताच्या क्षमतेवरील वाढत्या विश्वासाचे संकेत देखील मिळतील.

भारतासाठीही हा करार दक्षिणपूर्व आशियातील संरक्षण बाजारात एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून देईल, ज्यात फिलिपीन्स हे भारताच्या सामरिक विस्ताराचे केंद्र ठरेल. सध्या भारत इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि युएईसोबतही अशाच चर्चांमध्ये आहे, त्यामुळे भारताची संरक्षण निर्यात धोरणं आता अधिक वेग घेत आहेत.

इंडो-पॅसिफिकमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-फिलिपीन्स संरक्षण संबंध अधिक मजबूत होणार असून, त्यांची मुळे सामायिक सुरक्षा स्वारस्ये व तांत्रिक सहकार्य यांत आहेत.

– हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleबोईंग: भारतातील संरक्षण व्यवसायासाठी अलेय पारिख यांची नियुक्ती
Next articleबोईंग लढाऊ विमाने तयार करणारे, 3,200 हून अधिक कर्मचारी संपावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here