भारताने अमेरिकेशी शस्त्रास्त्र वाटाघाटी थांबवल्याचे दावे खोटे: संरक्षण मंत्रालय

0

गुरुवारी, संरक्षण मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, ‘भारताने अमेरिकेशी संरक्षण खरेदीबाबतच्या चर्चा थांबवल्या असल्याच्या सर्व बातम्या, सर्व दावे हे खोटे आहेत.’ शस्त्रास्त्र तसेच लढाऊ वाहने खरेदी प्रक्रियेतील सर्व प्रकरणे प्रचलित कार्यपद्धतीनुसार पुढे नेली जात आहेत, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याआधी रॉयटर्सने, काही भारतीय अधिकाऱ्यांच्या (नाव गुप्त ठेवत) हवाल्याने वृत्त दिले होते की, भारताने जनरल डायनॅमिक्स लँड सिस्टिम्स कंपनीच्या – ‘स्ट्रायकर लढाऊ वाहनांची’ आणि रेथियॉन तसेच लॉकहीड मार्टिन यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या- ‘जॅव्हलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रांची’ खरेदी थांबवली आहे. या अहवालानुसार, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी भारताच्या निर्यातींवर लादलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे, द्विपक्षीय संरक्षण संबंध दशकातील सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले होते.

“भारत आणि अमेरिकेतील संरक्षण खरेदी चर्चेच्या थांबवण्यासंदर्भातील बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. विविध खरेदी प्रक्रिया प्रचलित प्रक्रियेप्रमाणेच सुरू आहेत,” असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

रॉयटर्सच्या अहवालात, असाही एक दावा करण्यात आला होता की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची वॉशिंग्टन दौऱ्याची योजना, जी काही महत्त्वाच्या संरक्षण करारांच्या घोषणेसाठी होती, ती रद्द करण्यात आली आहे.

याच अहवालात पुढे नमूद करण्यात आले की, ट्रम्प यांनी 6 ऑगस्ट रोजी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25% शुल्क लावले, जे भारताने रशियन तेल खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर होते. त्यामुळे काही वस्तूंवरील एकूण शुल्क 50% पर्यंत पोहोचले आहे.

भारत–अमेरिका संरक्षण भागीदारी

रशिया अजूनही भारताचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार आहे, मात्र गेल्या काही वर्षांत नवी दिल्लीने संरक्षण खरेदीसाठी विविध स्रोतांकडे मोर्चा वळल्यामुळे, रशियाचा वाटा काही प्रमाणात कमी झाला आहे. 2008 मध्ये झालेल्या ऐतिहासिक भारत–अमेरिका अणु करारानंतर, अमेरिका भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा संरक्षण भागीदार बनला आहे. सुरुवातीला  दोन्ही देशांमधील संरक्षण व्यापार 1 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होता, जो आता 18 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे.

भारताने अमेरिकेकडून घेतलेल्या प्रमुख शस्त्र प्रणालींमध्ये: C-130J सुपर हर्क्युलीस, C-17 ग्लोबमास्टर III, P-8I पोसिडॉन विमान, AH-64 अपाचे आणि CH-47 चिनूक हेलिकॉप्टर्स, तसेच M777 हॉविट्झर तोफा यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात भारतीय लष्कराने अपाचे हेलिकॉप्टर्सची पहिली बॅच प्राप्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी फेब्रुवारी महिन्यात व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत, दोन्ही देशांनी नवीन संरक्षण खरेदी करार केल्याची, तसेच भारतामध्येच जॅव्हलिन क्षेपणास्त्र आणि स्ट्रायकर वाहनांचे सह-निर्माण करण्याच्या योजनांची घोषणा केली होती. याशिवाय दोन्ही देशांनी, पुढील 10 वर्षांसाठीची नवी ‘मेजर डिफेन्स पार्टनरशिप’ फ्रेमवर्क, वर्षभरात अंतिम करण्यावर सहमती दर्शवली असल्याचेही सांगितले होते. या उपक्रांचा उद्देश- संयुक्त विकास, द्विपक्षीय चर्चांना चालना आणि एकत्रित लष्करी सरावांच्या माध्यमातून परस्पर संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे हा आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी ‘तंत्रज्ञान’ आणि ‘समन्वयाची’ गरज: CDS चौहान
Next articleसविस्तर: भारतीय स्वायत्त नौका, कशी वाढवणार पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here