भारताकडून ‘Agni 5’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0

बुधवारी, भारताने ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) वरून, ‘Agni 5’ (अग्नि-5) या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीतून भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या रणनीतिक क्षमतेला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या चाचणीमध्ये सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष यशस्वीरित्या सिद्ध झाले असून, Strategic Forces Command च्या अधिपत्याखाली ही चाचणी पार पडली.

चाचणी घेण्यात आलेले हे ‘Agni 5’ क्षेपणास्त्र, भारताच्या ICBM (इंटरनॅशनल बॅलिस्टिक मिसाईल्स) च्या प्रकारांपैकी एक आहे, ज्याची मारक क्षमता 7,000 किमीहून अधिक आहे. ‘DRDO’ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने, या प्रणालीचा विकास केला असून, काळानुरुप त्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत.

जून महिन्यातील अहवालानुसार, DRDO एक वाढीव रेंज असलेल्या क्षेपणास्त्राचा प्रकार विकसित करत आहे, जो 7,500 किमी रेंजपर्यंतचे लक्ष्य गाठू शकतो.

11 मार्च, 2024 रोजी झालेल्या चाचणीत, MIRV (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक वेगवेगळ्या लक्ष्यांवर स्वतंत्र वॉरहेड डागता येतात. त्यावेळी टेलिमेट्री आणि रडार स्टेशननेही चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले होते.

भारताने 19 एप्रिल 2012 रोजी, पहिल्यांदा ‘Agni 5’ ची चाचणी केली होती. तेव्हापासून हे क्षेपणास्त्र भारताच्या अणु प्रतिकार धोरणाचा मुख्य आधार बनले आहे.

हे क्षेपणास्त्र 1.5 टन पर्यंतचा अणु वॉरहेड नेण्यास सक्षम आहे. त्यात हलक्या वजनाचे कॉम्पोझिट मटेरियल वापरल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.

मार्गदर्शन प्रणालीमध्ये ‘रिंग लेसर गायरोस्कोप बेस्ड इंटरनल नेव्हिगेशन सिस्टीम (RLG-INS)’, ‘मायक्रो इंटरनल नेव्हिगेशन सिस्टीम (MINGS)’ तसेच NavIC आणि GPS सॅटेलाईट्स यांचा समावेश आहे, ज्यामुळे अत्यंत अचूक लक्ष्यभेदन शक्य होते.

अग्नि-5 मध्ये, त्रि-स्तरीय ठोस इंधन प्रणाली आहे आणि ते कॅनिस्टराइज्ड प्लॅटफॉर्म वरून लॉन्च केले जाते. यामुळे ते जलद तैनाती, सोपे वाहतूक, आणि जास्त सुरक्षितता प्रदान करते.

अलीकडच्या वर्षांत, यामध्ये अ‍ॅव्हिऑनिक्स, रि-एंट्री शिल्डिंग आणि मार्गदर्शन प्रणाली मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत.

बुधवारी झालेल्या चाचणीद्वारे, भारताने प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि रणनीतिक सज्जता, यामध्ये आपली प्रगती पुन्हा सिद्ध केली आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleपाकिस्तानचे आर्थिक केंद्र कराचीला, पाऊस आणि पुराचा जोरदार फटका
Next articleभारताकडे तेल विक्रीसोबतच चीन-भारत-रशिया संवादाचा रशियाचा प्रस्ताव 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here