ट्रम्प यांचा Intel मधील 10% हिस्सेदारासाठी, अब्जावधी डॉलर्सचा करार

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केले की, “फेडरल ग्रँट्सचे इक्विटीमध्ये रूपांतर करून सरकार Intel कंपनीतील 10% हिस्सेदारी विकत घेणार आहे.” या निर्णयामुळे व्हाईट हाऊसचा कॉर्पोरेट क्षेत्रातील हस्तक्षेप आणखी वाढला आहे.

या करारामुळे, ट्रम्प आणि Intel कंपनीचे सीईओ लिप-बू टॅन यांच्यातील तणाव कमी झाला आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी, टॅन यांच्यावर चीनशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली होती. आता या करारामुळे इंटेलला सुमारे $10 अब्ज निधी मिळणार आहे, जो अमेरिकेतील फॅक्टऱ्या उभारण्यासाठी वापरला जाईल.

CHIPS Act संबंधित निधीचा वापर

अमेरिकेन सरकार, एकूण 433.3 दशलक्ष शेअर्स, $20.47 डॉलर्स प्रती शेअर दराने विकत घेणार आहे, जो शुक्रवारच्या शेवटच्या $24.80 डॉलर्सच्या शेअर किमतीपेक्षा सुमारे $4 डॉलर्सनी कमी आहे.

ही खरेदी: $5.7 अब्ज डॉलर्स (CHIPS Act) + $3.2 अब्ज डॉलर्स (Secure Enclave Program), याआधी मंजूर केलेल्या निधीतून केली जाणार आहे.

बायडन प्रशासनाच्या कार्यकाळातील योजना, आता ट्रम्प प्रशासनाकडून इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.

शेअर बाजारातील हालचाल: डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर, इंटेलचे शेअर्स नियमित ट्रेडिंगमध्ये 5.5% वाढले, आणि नंतरच्या सत्रात आणखी 1% वाढ झाली.

$10 अब्ज डॉलर्सच्या कराराचा विजय

शुक्रवारी, ट्रम्प आणि टॅन यांची भेट झाली, असे व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यानी सांगितले. यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी, ट्रम्प यांनी Intel कंपनीचे सीईओ लिप-बू टॅन यांची भेट घेतली होती, कारण त्यांनी टॅन यांना चीनमधील कंपन्यांशी असलेल्या संबंधांवरून राजीनामा देण्याची मागणी केली होती.

“टॅन आपली नोकरी वाचवण्यासाठी आमच्याकडे आले, आणि त्यांनी अमेरिकेसाठी 10 अब्ज डॉलर्स ऑफर दिले. त्यामुळे आपण 10 अब्ज डॉलर्सच्या कराराचा विजय झाला,” असे ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले.

वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी, X (माजी ट्विटर) द्वारे सांगितले की, “टॅन यांनी इंटेलसाठी आणि अमेरिकन जनतेसाठी सुयोग्य करार केला आहे.”

वाढता कॉर्पोरेट धोका

इंटेलची गुंतवणूक, ही अमेरिकन कंपन्यांसोबत झालेल्या काही असामान्य करारांपैकी एक आहे. यामध्ये अमेरिकन सरकारने, AI चिप कंपनी Nvidia ला चीनमध्ये त्यांचे H20 चिप्स विकण्यास परवानगी दिली आहे, याच्या बदल्यात त्या विक्रीतून 15% हिस्सा सरकारला मिळणार आहे.

इतर अलीकडील करारांमध्ये, Pentagon आणि एक लहान खनिज कंपनी MP Materials यांच्यातील करार आहे, ज्यानुसार Pentagon त्या कंपनीतील सर्वात मोठा भागधारक बनणार आहे, जेणेकरून पृथ्वीच्या दुर्मिळ चुंबकांचे उत्पादन वाढवता येईल. तसेच, US सरकारने एक “golden share” मिळवली आहे, ज्यामध्ये काही विशिष्ट व्हेटो अधिकार आहेत, ज्याचा वापर जपानच्या Nippon स्टीलला, US Steel खरेदी करण्यास परवानगी देण्यासाठी करण्यात आला आहे.

कॉर्पोरेट व्यवहारांमध्ये फेडरल सरकारचा वाढता हस्तक्षेप, हा काही टीकाकारांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या कारवायांमुळे कॉर्पोरेट धोक्यांचे नवीन प्रकार उद्भवत आहेत.

SoftBank ची गुंतवणूक

सोमवारी, जपानच्या SoftBank ने Intel सोबत अमेरिकेचा करार होण्यापूर्वी, या चीप निर्मात्या कंपनीमध्ये $2 billion ची भागीदारी स्वीकारली.

मात्र, काही उद्योग निरीक्षक अजूनही Intel त्याच्या अडचणींवर मात करू शकेल का, याबाबत साशंक आहेत.

Synovus Trust चे वरिष्ठ पोर्टफोलिओ व्यवस्थापक Daniel Morgan यांनी सांगितले की, “इंटेलच्या अडचणी या SoftBank कडून मिळणाऱ्या रोख गुंतवणुकीपेक्षा किंवा सरकारकडून मिळणाऱ्या इक्विटी इंटरेस्टपेक्षा अधिक गंभीर आहेत.” त्यांनी इंटेलच्या कॉन्ट्रॅक्ट चिप मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाकडे लक्ष वेधले, ज्याला त्याचा “foundry unit” म्हणून ओळखले जाते.

वाजवी दर, मर्यादित अपेक्षा

“सरकारची मदत किंवा दुसरा आर्थिकदृष्ट्या मजबूत भागीदार नसल्यास,इंटेलच्या foundry unit साठी पुरेशी भांडवली गुंतवणूक उभारणे कठीण जाईल, ज्यामुळे ते वाजवी दराने नवीन कारखाने उभारू शकतील,” असे त्यांनी सांगितले.

Intel ला “तंत्रज्ञानाच्या दृष्टीने TSMC सोबत स्पर्धा करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना अधिक व्यवसाय मिळवता येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

सरकारची गुंतवणूक, ही निष्क्रीय असेल आणि त्यामध्ये कोणतेही बोर्डचे स्थान समाविष्ट नसेल, असे Intel ने सांगितले. ज्या वेळी भागधारकांची मंजुरी आवश्यक असेल, तेव्हा सरकारला Intel च्या बोर्डसोबत मतदान करणे बंधनकारक असेल, “मर्यादित अपवाद” वगळता. मात्र, हे अपवाद नेमके कोणते आहेत, याबाबत Intel ने स्पष्ट माहिती दिलेली नाही.

अतिरिक्त 5% भागभांडवलासाठी पर्याय

या इक्विटी गुंतवणुकीमध्ये, प्रति शेअर $20 डॉलर्स या दराने – अतिरिक्त 5% Intel स्टॉक्स खरेदी करण्यासाठीची पाच वर्षांची वॉरंटदेखील समाविष्ट आहे. जर Intel ने त्याच्या foundry व्यवसायावरील नियंत्रण गमावले, तर US सरकार हा पर्याय वापरू शकते.

विश्लेषकांनी सांगितले की, “फेडरल सरकारकडून मिळणारा पाठिंबा Intel ला त्याचा तोट्यात चालणारा foundry व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी थोडा मोकळा श्वास देऊ शकतो.” मात्र, कंपनीने AI बाजारपेठ Nvidia ला सोपवली असून, मध्यवर्ती प्रोसेसर (central processor) व्यवसायात, गेल्या काही वर्षांपासून तिचा वाटा Advanced Micro Devices कडे गेला आहे. तसेच, नवीन कारखान्यांमध्ये ग्राहक आकर्षित करण्यातही कंपनीला अडचणी येत आहेत.

लिप-बू टॅन, जे मार्चमध्ये इंटेलचे सीईओ झाले, त्यांच्यावर हा अमेरिकेन ‘चिपनिर्माती ब्रँड’ पुन्हा उभे करण्याची जबाबदारी आहे. 2024 मध्ये, कंपनीने $18.8 billion चा वार्षिक तोटा नोंदवला होता, जो 1986 नंतरचा पहिला वार्षिक तोटा होता. तर, कंपनीने 2021 मध्ये, शेवटचा सकारात्मक समायोजित मुक्त रोख प्रवाह (adjusted free cash flow) नोंदवला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)

+ posts
Previous articleलष्करप्रमुख अल्जेरिया दौऱ्यावर जाणार; द्विपक्षीय लष्करी सहकार्याला चालना
Next articleट्रम्प यांनी गोर यांना भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून नामनिर्देशित केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here