भारत अमेरिकेसोबत व्यापार करारावर चर्चा करत आहे: पियुष गोयल

0

भारताने रशियाकडून तेल आयात सुरू ठेवल्याने वॉशिंग्टनने भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट केल्यानंतर काही दिवसांनी, भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर (BTA-Bilateral Trade Agreement ) चर्चा करत आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी दिली.

राजधानी दिल्लीत, एका औद्योगिक कार्यक्रमात बोलताना गोयल यांनी सांगितले की,”भारत एकाचवेळी युरोपियन युनियन (EU), चिली, पेरू, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांसोबतही नव्या व्यापार भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर EFTA गट, युके आणि UAE यांच्यासोबत करार पूर्ण झाले आहेत.”

“भारताने आतापर्यंत अनेक टप्पे गाठले आहेत, मात्र अजून बरेच काही बाकी करणे आहे,” असे सांगत, पियुष गोयल यांनी भारत आता जागतिक आर्थिक वाढीपैकी 18% वाटा उचलत असल्याचे सांगितले.

28 ऑगस्ट रोजी, द इकॉनॉमिक टाईम्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारत लवकरच अमेरिकेसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याची अपेक्षा करत आहे. मात्र, भारतीय उत्पादनांवरचे 50% अमेरिकन शुल्क, हा करार पूर्ण होण्यातील मुख्य अडथळा ठरत आहे.

ब्लुमर्गच्या मते, दोन्ही देशांदरम्यान अनौपचारिक चर्चा सुरू आहेत, जरी भारताने अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क वाढीला उत्तर म्हणून, कोणतेही पर्यायी उपाय जाहीर केलेले नाहीत.

ट्रम्प यांची शुल्कवाढ: भारतीय निर्यातदारांना मोठा फटका

27 ऑगस्ट रोजी, अमेरिकेने भारताकडून होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या आयातींवर अतिरिक्त 25% शुल्क लावले, ज्यामुळे एकूण शुल्क 50% झाले.

हा निर्णय भारताच्या रशियाकडून कच्चे तेल आणि संरक्षण सामग्रीच्या खरेदीशी संबंधित आहे, ज्याचा यूक्रेन युद्धात रशियाला अप्रत्यक्षपणे लाभ होतो, असा अमेरिका सरकारचा आरोप आहे.

अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकारी, जसे की व्हाईट हाऊसचे ट्रेड अॅडव्हाईसर- पिटर नवारो आणि ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी, भारतावर रशियाच्या युद्धप्रयत्नांना समर्थन देत असल्याचा आरोप केला आहे.

BTA मधील चालू वाटाघाटी

25 ऑगस्ट रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित BTA कराराच्या सहाव्या फेरीची चर्चा, अमेरिकन शिष्टमंडळाने अचानक मागे घेतल्यानंतर रद्द करण्यात आली.

याआधी दोन्ही सरकारांनी, चर्चेच्या पहिल्या टप्प्याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला होता. 2025 च्या अखेरीपर्यंत, द्विपक्षीय व्यापार $191 billion वरून $500 billion करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अमेरिकेने भारताकडे मक्याच्या दाणे, सोयाबीन, सफरचंद, बदाम आणि इथेनॉल यांसारख्या कृषी उत्पादनेवरचे आयात शुल्क कमी करण्याची, तसेच दुग्धजन्य उत्पादनांसाठी बाजार खुला करण्याची मागणी केली आहे.

भारताने मात्र ही मागणी फेटाळली असून स्पष्ट सांगितले आहे की, ‘यामुळे लाखो लहान शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात येईल.’

ट्रम्प यांचा “शून्य शुल्क” दावा

दरम्यान, Truth Social या प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारताने आता “शून्य शुल्क” (Zero-Tariff) लागू करण्याची तयारी दर्शवली आहे.

“त्यांनी हे वर्षांपूर्वीच करायला हवे होते, पण आता कदाचित खूप उशीर झाला आहे,” असेही ट्रम्प यांनी त्यात म्हटले आहे.

हा दावा प्रत्यक्षात कितपत मान्य केला गेला आहे हे स्पष्ट झालेले नाही, आणि व्हाइट हाऊस पुन्हा चर्चा सुरू करेल का, हेही अजून अनिश्चित आहे.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे वॉशिंग्टनची भूमिका काही प्रमाणात सौम्य होण्याची शक्यता आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स आणि IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleRussia, India in Talks for Additional S-400 Missile Systems: TASS
Next articleरशिया आणि भारतात अतिरिक्त S-400 Missile प्रणालीसाठी चर्चा सुरू- TASS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here