Nepal Protest: तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ओली यांचा राजीनामा

0

सोशल मीडियावरील बंदीमुळे नेपाळमध्ये झालेल्या तीव्र आंदोलनांदरम्यान, 19 लोकांचा मृत्यू झाला, भ्रष्टाचारविरोधी आंदोलकांनी देशभरातील संचारबंदीचे उल्लंघन केले आणि पोलिसांसोबत त्यांची चकमकही झाली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, अखेर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असे त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले.

सोमवारी, पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुर आणि रबर बुलेट्सचा वापर केला, ज्याच 19 लोकांचा मृत्यू झाला आणि 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले, त्यानंतर ओली सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवली.

भारत आणि चीनच्या मध्ये असलेला हा हिमालयीन देश, सध्या अनेक दशकांतील सर्वात मोठ्या अशांततेतून जात आहे. 2008 मधील आंदोलनांमुळे इथली राजघराणेशाही संपुष्टात आली आणि त्यानंतर आजपर्यंत हा देश राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेशी झगडत आहे.

‘पंतप्रधानांनी राजीनामा दिला’

“पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे,” असे पंतप्रधान ओली यांचे सहकारी प्रकाश सिलवाल यांनी रॉयटर्सला सांगितले. या कृतीमुळे देशात पुन्हा राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे.

मंगळवारी सकाळी, ओली यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांना “हिंसा देशाच्या हिताची नाही, आपण कोणत्याही समस्येवर शांततापूर्ण संवादातून तोडगा काढला पाहिजे,” असे म्हटले होते.

परंतु, सरकारविरोधी संताप कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या अनिश्चित संचारबंदीचे उल्लंघन करत आंदोलक राजधानी काठमांडूमधील संसद आणि इतर ठिकाणी जमा झाले.

काही रस्त्यांवरती आंदोलकांनी टायर जाळले, दंगल नियंत्रण पोलिसांवर दगडफेक केली आणि अरुंद रस्त्यांमधून त्यांना पळवून लावले. यावेळी काही लोक आपल्या मोबाईल फोनवर या चकमकींचे व्हिडिओ काढत होते, तर काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते.

आंदोलकांच्या एका सदस्याने रॉयटर्सला फोनवरून सांगितले की, “भारत-नेपाळ सीमेवरील काही शहरांमधून शेकडो लोक आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी काठमांडूच्या दिशेने निघाले आहेत.”

राजकारण्यांची घरे जाळली

प्रत्यक्षदर्शींनी असेही सांगितले की, आंदोलक काठमांडूमधील काही राजकारण्यांची घरे जाळत होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही मंत्र्यांना लष्करी हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. रॉयटर्स या माहितीची तात्काळ पडताळणी करू शकले नाही.

“आम्ही आमच्या भविष्यासाठी इथे उभे आहोत, आम्हाला हा देश भ्रष्टाचारमुक्त हवा आहे, जेणेकरून प्रत्येकाला शिक्षण, रुग्णालये, वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतील… आणि एका उज्ज्वल भविष्यासाठी,” असे आंदोलक रॉबिन श्रेष्ठ यांनी रॉयटर्स टीव्हीला सांगितले.

हवाई वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी सांगितले की, “आंदोलकांनी जवळपासच्या भागात जाळलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे दृश्यमानता खराब झाली, ज्यामुळे काठमांडू विमानतळावर (नेपाळचे मुख्य आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार) दक्षिणेकडील बाजूने येणाऱ्या विमानांचे आगमन बंद करण्यात आले आहे.

या आंदोलनांच्या आयोजकांनी, जे देशाच्या इतर शहरांमध्येही पसरले आहेत, ते ‘Gen Z’ असल्याचे म्हटले जात आहे. तरूण आंदोलकांचे म्हणणे आहे, की सरकार भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी आणि आर्थिक संधी वाढवण्यासाठी पुरेसा प्रयत्न करत नाहीये.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia Holds Firm at LAC as Winter Nears, Despite Diplomatic Thaw with China
Next articleचीनसोबतचे राजकीय संबंध सुधारत असले, तरी भारत LAC च्या मुद्द्यावर ठाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here