ड्रोन आणि सायबर हल्ल्यांच्या धोक्यामुळे, युरोपातील उड्डाणे विस्कळीत

0

युरोपातील प्रमुख विमानतळांवर झालेल्या सायबर हल्ल्यांच्या मालिकेमुळे, तसेच कोपनहेगन आणि ओस्लोमध्ये झालेल्या ड्रोनच्या घुसखोरीमुळे, या प्रदेशातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांमधील त्रुटी उघड केल्या आहेत. त्यामुळे समन्वित हल्ल्यांच्या शक्यतेमुळे व्यापक अडथळ्यांची भीती निर्माण झाली आहे.

सोमवारी, डेन्मार्कमध्ये कोपनहेगनच्या मुख्य विमानतळावर ड्रोन आढळून आल्यामुळे अनेक तास उड्डाणे थांबवली गेली. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी, या घटनेचा संबंध युरोपमधील संशयित रशियन ड्रोन घुसखोरी आणि इतर हल्ल्यांशी जोडला आहे.

याच घटनेसोबत, नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्येही ड्रोनची एक घटना घडली. याआधी काही दिवसांपूर्वी, हॅकर्सनी लंडनच्या हिथ्रो, बर्लिन आणि ब्रुसेल्ससह युरोपमधील सर्वात व्यस्त विमानतळांवरील चेक-इन सिस्टीमवर रॅन्समवेअर हल्ला केला होता.

‘हायब्रिड धोका’

या हल्ल्यांमागे कोण होते, हे तपासकर्त्यांनी अद्याप सांगितले नसले तरी, तज्ञांना हे हल्ले ‘हायब्रिड थ्रेट’चा (संकरित धोक्याचा) भाग वाटतात. या हल्ल्यांचा उद्देश, संबंधित देश त्यांच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कशाप्रकारे हाताळतात, हे तपासणे आहे.

युरोपियन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर काउंटरिंग हायब्रिड थ्रेट्सचे नेटवर्क संचालक, जुका साओलेनेन यांनी सांगितले की, “हे सर्व अशा पद्धतीने घडवून आणले जाते, की त्याचा परिणाम काय होतो हे सर्वप्रथम पाहिले जाते, जसे की या प्रकरणात विमानतळ बंद होणे. दुसरा भाग म्हणजे आपली प्रतिक्रिया तपासणे.”

डेन्मार्कमधील रशियाचे राजदूत व्लादिमीर बार्बिन, यांनी रॉयटर्सला पाठवलेल्या निवेदनात सांगितले की: “या हल्ल्यांमधील रशियाच्या सहभागाचे आरोप कुठल्याही आधाराशिवाय केले गेले आहेत. दरम्यान, ड्रोनची घुसखोरी आणि विकेंडच्या हॅकिंगमागे कोण होते, याची रॉयटर्स स्वतंत्रपणे पुष्टी करू शकलेले नाही.”

हल्ल्यांमुळे विमान वाहतूक क्षेत्राची असुरक्षितता उघड

या हल्ल्यांमुळे, नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे कामकाज किती असुरक्षित आहे हे उघड झाले आहे. पुरवठा साखळीतील बिघाडामुळे विमानतळ आणि एअरलाइन ऑपरेशन्समध्ये अडथळे निर्माण झाले, ज्यामुळे शेकडो उड्डाणे उशिराने झाली किंवा रद्द झाली.

ड्रोन, जीपीएसमध्ये हस्तक्षेप आणि हॅकिंग यासारख्या ‘हायब्रिड वॉर’चे धोके वाढत असताना, तज्ञांचे म्हणणे आहे की: “विमान वाहतूक नियामक संस्थांनी सायबर सुरक्षा, नेव्हिगेशन सिस्टीम आणि एकूणच सुरक्षिततेसाठी धोके कमी करण्यासाठी अधिक सक्रिय पावले उचलण्याची गरज आहे.”

US सायबर सुरक्षा फर्म F5 चे- बार्ट सालेट्स् यांनी, कोलिन ॲरोस्पेसच्या चेक-इन सॉफ्टवेअरवरील हॅकिंग हल्ल्याबद्दल बोलताना सांगितले की, “हा हल्ला हे दर्शवतो की- विमान वाहतूक सारखे अति-जोडलेले उद्योग किती असुरक्षित असू शकतात.”

रॉयटर्सने ज्या विश्लेषक आणि तज्ञांशी संवाद साधला, त्यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये युरोपमध्ये संभाव्य रशियन घटकांकडून वाढलेल्या हालचालींकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले की, “नियामक संस्थांनी अधिक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे द्यावीत आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी अधिक कृती करण्यास प्रोत्साहन द्यावे.”

सुरक्षा गुप्तचर आणि विमान वाहतूक सल्लागार फर्म ‘डयामी’चे संचालक एरिक शाउटेन म्हणाले की, “ड्रोनच्या हालचाली अधिक गंभीर होत आहेत आणि माझ्या मते त्या थांबणार नाहीत.”

“या प्रकरणात, एअरलाइन्स सरकारांकडे आणि अधिकाऱ्यांकडे पाहत आहेत, आणि विमानतळेही तसेच करत आहेत.”

युरोपमध्ये कोणत्याही हायब्रिड हल्ल्याची जबाबदारी मॉस्कोने सातत्याने नाकारली आहे.

युरोपच्या हवाई वाहतूक नियंत्रण संस्थेने ‘युरोकंट्रोल’ (Eurocontrol) म्हटले की, अशा घटनांचा परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी ते स्थानिक हवाई वाहतूक नियंत्रण आणि राष्ट्रीय प्राधिकरणांना समर्थन देत आहेत.

विमान वाहतूक सुरक्षा सल्लागार ‘ऑस्प्रे’ (Osprey) चे गुप्तचर अधिकारी मॅथ्यू बोरी यांनी रॉयटर्सला सांगितले की, “ऑपरेटर त्यांच्या कार्याचे धोके गतिशीलपणे (dynamically) तपासण्यास सक्षम असले पाहिजेत, त्यांच्याकडे पर्यायी योजना आणि धोका कमी करण्याच्या उपाययोजना तयार असाव्यात.”

नियामकांनी मानके अधिक कठोर करणे आवश्यक आहे

रशियाने 2022 मध्ये, युक्रेनवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर युरोपच्या पूर्व सीमेवर युद्ध सुरू असताना, नागरी हवाई हद्दीतील सुरक्षा चिंता वाढत असतानाही, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचा खर्च आणि भार यामुळे विमानतळांना वेगाने प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकतो.

हॅक्स आणि ड्रोनपासून धोके कमी करण्यासाठी विमानतळांवरील तंत्रज्ञान जसे की- जॅमिंग साधने, लेझर उपकरणे आणि ट्रॅकर्स अपग्रेड करण्यासाठी लाखो डॉलर्सचा खर्च येऊ शकतो आणि ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे, जी सर्व पायाभूत सुविधा ऑपरेटर लगेच करायला तयार नाहीत.

एअरलाइन व्यापार संघटना ‘आयएटीए’ (IATA) ने असेही म्हटले की, ड्रोन-विरोधी तंत्रज्ञान अजूनही विकसित होत आहे आणि ते अनेकदा विमानतळाच्या बजेटच्या बाहेरचे असते. युनायटेड स्टेट्समध्ये, ‘एफएए’ (FAA) म्हणते की त्यांना प्रत्येक महिन्यात विमानतळांजवळ ड्रोन दिसण्याच्या 100 पेक्षा जास्त घटनांची माहिती मिळते.

स्लोव्हाकियाच्या सायबर सुरक्षा फर्म ‘ईएसईटी’ (ESET) चे सल्लागार जेक मूर म्हणाले की, “जेव्हा विमान वाहतूक पुरवठा साखळ्यांवर हल्ला होतो, तेव्हा जागतिक स्तरावर गोंधळ निर्माण होतो. नियामकांनी अत्यावश्यक विमानवाहतूक IT पुरवठादारांसाठी नियम अधिक कठोर करणे गरजेचे आहे.”

“हा विमान सेवा विस्कळीत करण्यासाठी जाणूनबुजून केलेला हल्ला होता, आर्थिक उद्देशाने केलेला रॅन्सम होता किंवा मोठी तांत्रिक त्रुटी होती. कारण काहीही असो, याचा परिणाम दर्शवतो की डिजिटल युगात अशा प्रणाली किती नाजूक आहेत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleTwo Defence Giants, One Stealth Mission: L&T and BEL Form Consortium for AMCA Project
Next articleIndia-UK Defence Ties Set to Deepen Ahead of British PM’s October Visit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here