लंडनमधील नर्सरींवर सायबर हल्ला, हजारो लहानग्यांचे रेकॉर्ड्स धोक्यात

0

लंडनमध्ये, लहान मुलांसाठी एकाहून अधिक नर्सरीज चालवणाऱ्या ‘किडो इंटरनॅशनल’ या संस्थेवर सायबर हल्ला झाल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. हॅकर्सनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली असून, त्यांनी याबाबत डार्क वेब फोरमवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये 8,000 हून अधिक लहान मुलांचा डेटा चोरीला गेल्याचे म्हटले आहे.

स्वत:ला रेडियंट म्हणवणाऱ्या या हॅकर्सच्या टोळीने, ग्रेटर लंडनमध्ये स्थित- किडो इंटरनॅशनलच्या 18 नर्सरीजपैकी, एका नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एकूण 10 मुलांची नावे, त्यांचे फोटो, घरचा पत्ता आणि कुटुंबातील एका व्यक्तीचा संपर्क क्रमांक फोरमवर उघड करत, आपला दावा सिद्ध केला आहे. 

हॅकिंगच्या या घटनेमुळे, लहान मुलांची सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली असून, या वर्षात ब्रिटनमधील विविध व्यवसायांना हादरवून टाकणाऱ्या गंभीर रॅन्समवेअर अटॅक्सच्या पार्श्वभूमीवर हा नुकताच झालेला अटॅक आहे.

रेडियंट ग्रुपने लीक वेबसाईटवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नर्सरीतील मुले आणि एकूण 100 कर्मचाऱ्यांपैकी अजून 30 जणांच्या प्रोफाईल उघड करणे, हे आमचे पुढचे पाऊल असेल.”

लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “याप्रकरणी चौकशी सुरु असून, ती मेट्स सायबर युनिटच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोहचली आहे. अद्याप कुणालही अटक करण्यात आलेली नाही.”

नर्सरी डेटा हॅकर्सनी, एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवेबद्दल बोलताना सांगितले की, ते गेल्या आठवड्याभरापासून किडो इंटरनॅशनलच्या नेटवर्कमध्ये घुसून बसले होते.

सायबर गुन्हेगारांचे जाळे

ज्यावेळी या हॅकर्सना त्यांच्या स्थळाविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी आपण रशियांमध्ये असल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या या विधानाचे समर्थन करणारा कुठलाही पुरावा त्यांनी सादर केला नाही.

रॅन्समवेअर हे सॉफ्टवेअर, सायबर गुन्हेगारांद्वारे एखाद्या कंपनीचा किंवा संस्थेचा गोपनीय डेटा एन्क्रिप्ट करुन, तो प्रकाशित करण्यासाठी आणि त्याबदल्यात पैसे मागण्यासाठी वापरले जाते. दरम्यान, हॅकर्सनी किडो इंटरनॅशनलकडून किती रक्कम मागितली आहे, हे सांगण्यास नकार दिला.

“सायबर गुन्हेगारांनी पैसे कमवण्यासाठी, अशाप्रकारे लहान मुलांचा डेटा हॅक करणे आणि मुलांचे संगोपन करणाऱ्यांना वेठीस धरणे ही अतिशय गंभीर बाब आहे,” असे ब्रिटनच्या GCHQ गुप्तचर संस्थेचा भाग असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा केंद्राचे जॉनथन एलिसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

गुरूवारी, एका सरकारी सूत्राने सांगितले की, सायबर हल्ल्यामुळे ‘जग्वार लँड रोव्हर’ या कार उत्पादक कंपनीच्या पुरवठादारांना, काही काळ उत्पादन थांबल्यामुळे जे नुकसान झाले होते, ते भरून काढण्यासाठी ब्रिटनचे सरकार आर्थिक मदत करण्याच्या विचारात आहे. कंपनीवरील हा शटडाऊन ऑक्टेबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

किडो इंटरनॅशनलवरील सायबर हल्ल्याच्या एक दिवस आधीच, स्थानिक पोलिसांनी सांगितले की: “त्यांनी RTX च्या मालकीच्या कॉलिन्स एअरोस्पेस कंपनीवर झालेल्या रॅन्समवेअर हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.” त्या सायबर हल्ल्यामुळे ब्रिटनमधील सर्वात व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या, लंडनच्या हीथ्रो विमानतळावरील स्वयंचलित चेक-इन सिस्टीम पूर्णत: कोलमडल्या होत्या, ज्यामुळे युरोपमधील अन्य विमानतळांच्या ऑपरेशन्समध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

याआधी एप्रिलमध्ये, स्कॅटर्ड स्पायडर नावाच्या हॅकर्सच्या एका गटाने, ब्रिटिश रिटेलर मार्क्स अँड स्पेन्सर्सवर हल्ला केला होता, ज्यामुळे ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध रिटेलर्सपैकी एक असलेल्या मार्क्स अँड स्पेन्सर्सचा ऑनलाईन व्यवहार अनेक आठवड्यांसाठी ठप्प होता.

कंपनीने मे महिन्यात भाकित केले होते, की ‘या हॅकिंगमुळे 2025-26 या आर्थिक वर्षात कंपनीला सुमारे 300 दशलक्ष पौंड ($405 दशलक्ष) ऑपरेटिंग नफ्याचे नुकसान होईल.’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleUN सुरक्षा परिषदेचा इराणवरील निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्णय
Next articleव्यापार करार अंतिम करण्याबाबत, भारत आणि अमेरिकेमध्ये रचनात्मक चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here