भारताशी फक्त व्यापार करार, व्हिसा कराराचा आत्ता विचार नाही: स्टारमर

0
सध्या आपण भारतासोबत कोणताही व्हिसा करार करणार नाही असे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी स्पष्ट केले. त्यांनी या वर्षीच्या द्विपक्षीय व्यापार करारानंतर आर्थिक संबंध मजबूत करण्यावर त्यांचे सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले.

त्यांनी असेही म्हटले की, स्थलांतर किंवा गतिशीलता व्यवस्था सुलभ करण्याऐवजी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि व्यावसायिक भागीदारी मजबूत करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले आहे.

स्टारमर बुधवारपासून भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले  आहेत. त्यांच्यासोबत व्यापार कराराला प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिकांचा एक गटही आला आहे. मे महिन्यात हा व्यापार करार उभय देशांनी मान्य केला होता, त्यावर जुलैमध्ये स्वाक्षरी झाली आणि पुढील वर्षी तो अंमलात येणार आहे.

स्टारमर म्हणाले की, व्हिसामुळे व्यापार करारावर शिक्कामोर्तब करण्याचे मागील प्रयत्न थांबले होते आणि व्हिसाचा परिणाम होत नसलेल्या करारावर पोहोचल्यानंतर, गुरुवारी चर्चेसाठी  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असताना या मुद्द्यावर पुन्हा चर्चा करण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिसा योजनेचा भाग नाही

भारत भेटीवर जाताना पत्रकारांना व्हिसाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, “हा आमच्या योजनेचा भाग नाही,” आणि हा दौरा “आम्ही आधीच केलेल्या मुक्त व्यापार कराराचा फायदा घेण्यासाठी” आहे.

“व्यवसायाला त्याचा फायदा होणार आहे. पण मुद्दा व्हिसाचा नाही.”

स्टारमर या मुद्द्यावरून लोकांमध्ये वाढलेल्या चिंतेमुळे दोन्ही इमिग्रेशनवर अधिक प्रतिबंधात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्न करीत आहेत‌. त्यांची लेबर पार्टी निवडणुकीत लोकप्रियतावादी रिफॉर्म यूके पक्षापेक्षा मागे आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच 1B व्हिसावरील शुल्क वाढवल्यानंतरही, भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी व्हिसाबाबतची चर्चा टेबलवर येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. अर्थात  आपल्याला ब्रिटनमध्ये “उच्च प्रतिभा” हवी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

परदेशी गुन्हेगारांना परत न घेणाऱ्या किंवा हद्दपार करू इच्छिणाऱ्या देशांमधून येणाऱ्यांना व्हिसा देणे थांबवणार का असे विचारले असता, स्टारमर म्हणाले की परतावा करार असल्याने भारतासोबतचा हा “नॉन-इश्यू” आहे, परंतु तो असा विषय आहे ज्याकडे त्यांना अधिक व्यापकपणे पाहायला आवडेल.

“व्हिसा आणि परतावा करारांमध्ये काही संबंध असावा का याचाही आम्ही विचार करत आहोत,” असे ते म्हणाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीन आणि भारतातील वाढत्या अक्षय उर्जा क्षमतेमुळे, नव्या विक्रमाची नोंद
Next articleइक्वेडोर: राष्ट्राध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक आणि गोळीबार, पाच जणांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here